'...म्हणून तुमचं मुख्यमंत्री पद गेलं'; नागपूरच्या मातीवरून राऊत-फडणवीसांमध्ये रंगला कलगीतुरा

Sanjay Raut Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी नागपुरात दिलं प्रत्युत्तर...
'...म्हणून तुमचं मुख्यमंत्री पद गेलं'; नागपूरच्या मातीवरून राऊत-फडणवीसांमध्ये रंगला कलगीतुरा

-योगेश पांडे, नागपूर

'नागपूरच्या माती'वरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. नागपूरच्या मातीचा दाखला देत फडणवीसांनी राऊतांवर टीका केली होती. फडणवीसांनी केलेल्या टीकेवरून राऊतांनीही बाण डागला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत पुन्हा नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या दौऱ्यात शिवसेनेच्या पक्ष बांधणीवर लक्ष्य केंद्रीत केलं जात असून, दौऱ्यावर असलेल्या राऊतांवर फडणवीसांनी निशाणा साधला होता.

राऊतांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'नागपूरच्या मातीत असे गुण आहे की, येथे आल्यावर संजय राऊत यांना सुबुद्धी येईल,' असं म्हटलं होतं.

फडणवीसांनी केलेल्या या टीकेला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एका सभेत बोलताना राऊत म्हणाले, 'नागपूरची माती खरोखरच अशी आहे की, दुर्दैवाने तुम्हालाच सुबुद्धी आली नाही. म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं.'

'जर तुम्हाला त्यावेळी सुबुद्धी आली असती. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. शिवसेना हा आपला हिंदुत्ववादी पक्ष आहे. आपण त्या मैत्रीच्या नात्यानं राहिलं पाहिजे, ही सुबुद्धी आली असती, तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता. पण, तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देत आहात,' अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला.

सभेपूर्वी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले होते, 'जर शिवसेना वाढवायची असेल, तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजेत. नागपूर उपराजधानी आहे. हिंदुत्वाचा गड आहे आणि एकेकाळी शिवसेनेची ताकद येथे चांगली होती.'

'आमच्यासारखे नेते येतात, तेव्हा लोक जमतात. अनेक मान्यवर येतात. या सर्वांना पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याला कसा आकार द्यायचा हे पाहू. आदित्य ठाकरेही शासकीय कामासाठी जाणार असून, त्यावेळी तेदेखील पक्षासंदर्भात काही भूमिका घेतील,' असं राऊत म्हणाले होते.

'आयएनएस विक्रांत हा मोठा घोटाळा आहे. हिशोब घेतला जाईल. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत. बाहेर येऊन कुणी कितीही बडबड केली. लोकांना चुकीची माहिती दिली, तरी प्रत्यक्ष तपासात काय निष्पन्न होतंय याची माहिती आहे. आमचा हवेतला गोळीबार नाही. आम्ही पुराव्यासह बोललो आहेत.'

'राज्यपालांच्या कार्यालयातून आलेलं पत्र हा सर्वात मोठा पुरावा आहे. जमा केलेले कोट्यवधी राजभवनात पोहोचलेले नाही. मग ते कुणाच्या खिशात, जमिनीत गेले आणि आज तिथे काय उभं आहे? याचा हिशोब अंतरिम जामीनावर सुटलेल्या आरोपींना द्यावा लागेल. आमच्यावर आरोप करुन तुमचे आरोप धुतले जाणार नाहीत. मी अत्यंत जबाबदारीने बोलत असून विक्रांत घोटाळा साधा नाही,' असंही राऊथ यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.