'ठाकरे-पवार-थोरातां'ना महाराष्ट्रातही हा उपक्रम राबवावा लागेल; राऊतांचा आघाडी सरकारला सल्ला

संजय राऊतांचे भाजपला चिमटे : 'महाराष्ट्रात सत्ताबदल शक्य नाही, हे सत्य विरोधी पक्ष स्वीकारेल तो दिवस त्यांच्या उत्कर्षाचा ठरेल'
'ठाकरे-पवार-थोरातां'ना महाराष्ट्रातही हा उपक्रम राबवावा लागेल; राऊतांचा आघाडी सरकारला सल्ला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात.PTI

विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच गुजरात आणि पंजाबमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालं. दोन्ही राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात आले. मात्र, पंजाबमधील संघर्ष त्यानंतरही सुरूच आहे. देशात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून भाष्य केलं आहे. त्याचबरोबर गुजरात, पंजाबमध्ये करण्यात आलेले बदल महाविकास आघाडीने राज्यातही करायला हवेत, असा सल्लाही दिला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

'पंजाबातील राजकीय घडामोडींनी वातावरण पुन्हा तापवले. माणसे किती बेभरवशाची असू शकतात हे नवज्योतसिंग सिद्धू यांच्या वर्तनाने दिसले. कॅ. अमरिंदर यांना अहंकार होता व भाजपास आता पंजाब जिंकण्यासाठी अकार्यक्षम अमरिंदर हवे आहेत. पंजाब, दिल्ली, गुजरातेत उलथापालथी झाल्या. त्यातून नवे काय घडणार?', असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नक्षलवादविरोधी बैठकीसाठी रविवारी दिल्लीत गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःच हायकमांड आहेत व त्यांना वारंवार दिल्लीत जायची गरज नसते. केंद्र सरकारशी संबंधित बैठकांना हजेरी लावणे यात राजकारण शोधणे हास्यास्पद आहे. अमित शहा यांच्याच कारकिर्दीत शिवसेना-भाजपची युती 2014 साली तुटली. दुसऱयांदा ती 2019 साली तुटली व राज्यात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले सरकार आहे हे एवढेच विरोधी पक्षाने लक्षात ठेवले पाहिजे', राऊतांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांना का समजू नये?

'मुख्यमंत्री ठाकरेंपेक्षा राज्यातील विरोधी पक्षाचे नेते सगळय़ात जास्त दिल्ली वाऱया करतात. भाजपचे नेते दिल्लीत जातात व मोदी-शहांना भेटतात. अशा भेटीतून राज्यात सत्ता परिवर्तन होणार नाही. त्यातले काहीजण सीबीआय किंवा ईडी कार्यालयाची पायधूळ झाडतात. घटनाविरोधी पद्धतीने काम करून ठाकरे सरकार घालवता येणे शक्य नाही. मोदी हे अमेरिकेत जाऊन स्वदेशातील लोकशाहीचे गोडवे गाऊन आले आहेत. त्यामुळे विरोधकांची सरकारे पाडणे, त्यांना काम करण्यापासून रोखणे ही लोकशाही नाही हे आपल्या पंतप्रधानांना जेवढे समजते तेवढे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना का समजू नये?', असा टोला राऊतांनी भाजपला लगावला.

हुकूमशहांनाही लोकांसमोर शरणागती पत्करावी लागते

'लोकशाहीत बहुमत चंचल असते. हुकूमशहांनाही लोकांसमोर शरणागती पत्करावी लागते. जर्मनीच्या संसदीय निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. 16 वर्षे सत्तेत राहिलेल्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या पक्षाचा पराभव जर्मनीच्या जनतेने केला आहे. अँजेला मर्केल या कार्यक्षम व लोकप्रिय नेत्या होत्या. जर्मनीच्या विकासात त्यांचे योगदान होते. तरीही त्या पराभूत झाल्या, हे आपल्या देशातील सगळय़ांनी लक्षात घेतले पाहिजे', असं म्हणत राऊतांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

'लोक सत्तेच्या खुर्च्या उबवतात व पिढ्यानपिढ्यांची वतनदारी निर्माण करतात. जे गुजरातमध्ये झाले त्याचाच वेगळा प्रयोग राहुल गांधी यांनी पंजाबात केला. 'मी म्हणजेच पंजाब, मी म्हणजेच काँग्रेस. हायकमांड वगैरे कुणी नाही' या अहंकारात असलेल्या मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांना राहुल गांधी यांनी बदलले व एका नवख्या दलित नेत्यास पंजाबच्या सत्तेची सूत्रे दिली. हे धाडसच आहे', असं म्हणत राऊत यांनी राहुल गांधींच कौतुक केलं.

सिद्धू हा अशांत, अतृप्त आत्मा आहे

'राजकारण किती बेभरवशाचे असते, हे पंजाबातल्या घडामोडींवरून दिसते. कॅ. अमरिंदर यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यासाठी ज्यांनी मोहीम राबवली ते नवज्योतसिंग सिद्धूच जास्त बेभरवशाचे निघाले. अमरिंदर यांना हटवूनही त्यांचे मन शांत झाले नाही. पंजाबातील मंत्रिमंडळात त्यांच्या मनाप्रमाणे प्यादी बसवता आली नाहीत, तेव्हा सिद्धू यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचाच राजीनामा दिला. सिद्धू हे कॉमेडियन आहेत हे त्यांनी स्वतःच दाखवून दिले. सिद्धू हा अशांत, अतृप्त आत्मा आहे', असा टोला राऊत यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना लगावला.

'गुजरातमध्ये व पंजाबात जे घडले त्यावर आता जास्त चर्चा होऊ नये. वतनदाऱया मोडून काढल्याशिवाय राजकारण शुद्ध होणार नाही. कधीतरी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही 'ठाकरे-पवार-थोरातां'ना हा उपक्रम राबवावा लागेल. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक बिल्डरांवर आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत. हे सर्व बिल्डर मंत्र्यांचे छुपे भागीदार असल्याचा डंका पिटला जात आहे. वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्याने असे संबंध निर्माण होतात, पण भारतीय जनता पक्षाशी संबंधित बिल्डर केंद्रीय तपास यंत्रणांना दिसू नयेत याचे आश्चर्य वाटते. मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला. त्यात बहुतेक सर्व प्रस्थापितांना घरी बसविले. राज्यकर्त्याभोवती वर्षानुवर्षे तेच तेच चेहरे दिसले की ते तिरस्काराचे धनी होतात. त्यातून असंतोष वाढतो', असं म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे मंत्रिमंडळ विस्ताराचा सल्ला आघाडी सरकारला दिला आहे.

तो दिवस विरोधकांसाठी उत्कर्षाचा ठरेल

'महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. शेती आणि माणसेही वाहून गेली. राज्यावर संकटांमागून संकटे कोसळत आहेत. कोरोनाचे संकट आहेच, त्यात दोन वर्षांपासून वादळ, पूर, महाप्रलयाचे थैमान सुरू आहे. महाराष्ट्रासारखे राज्य संकटाच्या हत्तीशी झुंज देत असताना राज्यातील विरोधी पक्ष पुनः पुन्हा राजकीय उलथापालथीचाच पाठलाग करीत आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल शक्य नाही, हे सत्य विरोधी पक्ष स्वीकारेल तो दिवस त्यांच्या उत्कर्षाचा ठरेल', असा चिमटा राऊतांनी भाजप नेत्यांना काढला आहे.

...तेव्हा काय करायचे?

'दिल्लीत सेंट्रल विस्टा म्हणजे नव्या संसद भवनासारखे प्रकल्प उभे राहात आहेत. यालाच कोणी विकास म्हणत असतील, तर ते बरोबर नाही. महागाई, बेरोजगारीचे संकट सगळ्यात मोठे आहे. त्यावर सेंट्रल विस्टाचे प्रवर्तक काहीच बोलायला तयार नाहीत. लोकशाहीची नवी मंदिरे उभी राहतील, पण लाखो शेतकरी दोन वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर आक्रोश करीत आहेत. त्यांचे आवाज त्या मंदिरात पोहोचत नाहीत, तेव्हा काय करायचे?', असा चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.