"अनेक चंद्रू तुरुंगात खितपत पडलेत, 'जय भीम' कुणाला म्हणावं?"

'जय भीम'ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार?; खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून उपस्थिती केला सवाल...
"अनेक चंद्रू तुरुंगात खितपत पडलेत, 'जय भीम' कुणाला म्हणावं?"
जय भीम सिनेमाचं पोस्टर, सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी आणि सुधा भारद्वाज.

दाक्षिणात्य अभिनेता सूर्या याची प्रमुख भूमिका असलेला जय भीम सिनेमाची सर्वत्र चर्चा होत आहे. या सिनेमाबद्दल आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलं आहे. आपल्या रोखठोक सदरातून सिनेमातील आशयावर भाष्य करताना राऊत यांनी सध्या तुरुंगात असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे राजकीय सोहळे सुरूच आहेत, पण समाजातील मोठ्या वर्गाने अद्याप स्वातंत्र्याची किरणे अनुभवलीच नाहीत. 'जय भीम' चित्रपटाच्या पडद्यावर हे जळजळीत वास्तव मला दिसले. एका चंद्रू वकिलाने सत्य आणि कायद्याची ताकद दाखवली, पण फादर स्टॅन स्वामी तुरुंगात मारले गेले. सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखांसारखे अनेक चंद्रू तुरुंगात खितपत पडले आहेत. 'जय भीम' कोणाला म्हणावे?", असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊतांनी रोखठोकमध्ये काय म्हटलंय?

"स्वातंत्र्याचा सूर्य कसा उगवतो? त्या सूर्याची किरणे देशातील असंख्य दलित, आदिवासींपर्यंत पोहोचलीच नाहीत. 'जय भीम' हा चित्रपट तामीळसह पाच भाषांतून पडद्यावर झळकला आहे. त्यात स्वातंत्र्याची किरणे न पाहिलेल्या वर्गाची सत्यकथा आहे. 'जय भीम'मधील सत्यकथन इतकं प्रभावी आहे की, तो कोणत्याही भाषेत असला तरी भारतातील शोषित-पीडितांची ती खरी कहाणी आहे. 'जय भीम' चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. हा चित्रपट पाहून मी स्वतः सुन्न झालो."

"स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही देशातील आदिवासी, दलित, पीडितांना काय मिळाले? या लोकांच्या डोक्यावर हक्काचं छत नाही. आजही त्यातील अनेकांना कायमस्वरूपी पत्ता नाही. त्यामुळे रेशनकार्ड नाही. जंगलात राहणाऱ्या या लोकांना मत देण्याचा अधिकार नाही किंवा त्यांची मते दुसरेच कुणीतरी आधीच टाकून मोकळे होतात. ही आपली लोकशाही! 'आदिवासींना शिक्षण आणि मत टाकण्याचा अधिकार कशासाठी हवा? त्यांना भीकच मागायची आहे. प्रौढ शिक्षणासारखे उपक्रम बेकार आहेत. ते बंद करा. हे लोक जास्त शिकले तर जास्त बकवास करतील, प्रश्न विचारतील', हा 'जय भीम' चित्रपटातील संवाद एका भीषण वास्तवाची जळजळीत जाणीव करून देणारा आहे."

"जय भीम चित्रपटाच्या पडद्यावर एका सत्यकथेचा विद्रोह घडताना पाहणं रोमांचक आहे. 'सत्यमेव जयते'चा खरा अर्थ या चित्रपटाच्या शेवटी समजतो. 'जय भीम' म्हणजे काय, तर कायद्याचा विजय! तो आजही होतोच असं नाही. त्यासाठी अंतापर्यंत लढण्याची तयारी हवी व लढणारा एक चंद्रू हवा.

"जंगल क्षेत्रात दुर्गम, ग्रामीण भारतात आजही 'जात' किती विषारी आहे हे 'जय भीम'ने परखडपणे दाखवलं. कायदाही जात पाहून न्याय करतो. 'जय भीम'चा पहिलाच 'सीन' काय सांगतो? काही गुन्हेगार जेलमधून बाहेर येतात. त्यांची गरीब कुटुंबं बाहेर वाट पाहत असतात. हे लोक बाहेर पडताच 'त्यांची' जात विचारून पोलीस अधिकारी काय करायचे ते ठरवतात. जे दलित, आदिवासी किंवा खालच्या जातीचे असतात त्यांना पुन्हा जुन्याच प्रकरणात आरोपी बनवून पोलिसांच्या ताब्यात देतात."

"तुम्ही गुन्हेगार आहात, गुन्हेगार म्हणूनच रहा. सुधारण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करू नका असाच त्याचा अर्थ. 'उचल्या'कार लक्ष्मण माने यांनी एकदा मोर्चा काढून पारधी समाजासाठी 'चोरी'चे परमिट पोलिसांकडून मागितलं होतं. कारण पोलीस पारधी, उचल्यांसह अनेक जमातींवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसायला तयार नाहीत. त्यांना माणूस म्हणून जगू देत नाहीत. कुठेही चोरी झाली, खून झाला तर याच समाजाच्या पोरांना उचलून आणतात व न केलेला गुन्हा कबूल करायला लावतात. या सगळ्या अन्यायाविरुद्ध वकील चंद्रू लढा देत असतो."

"अभिनेता सूर्याने 'जय भीम'चा नारा बुलंद करून अन्यायाविरुद्ध लढा दिला. खोटी प्रकरणे, खोट्या केसेसमध्ये अडकवून जंगलातील आदिवासींना एकतर तुरुंगात सडवले जाते किंवा पोलीस चकमकीत ठार मारले जाते. राजकन्नूला तामीळनाडू पोलिसांनी असेच मारले. जंगलातला हा अत्याचार आणि कायद्याची बेबंदशाही रोखणारे 'चंद्रू'सारखे आज कुणी उभे राहतात तेव्हा त्यांना देशद्रोही, वामपंथी, राज्य उलथविण्याचा कट रचणारे ठरवून पोलिसी शिकार व्हावे लागते."

"मुंबईच्या तुरुंगात फादर स्टॅन स्वामी वयाच्या 84व्या वर्षी मरण पावले. झारखंडच्या जंगलातील आदिवासी, वेठबिगारांच्या हक्कांसाठी ते लढत राहिले म्हणून राज्यसत्ता उलथवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवून या विकलांग म्हाताऱ्याला आपण तुरुंगातच ठार मारले. छत्तीसगडमध्ये आदिवासींच्या मानवाधिकारासाठी लढणारे प्रा. सुधा भारद्वाज, कवी वरवरा राव हे सगळे मजूर वर्गाच्या हक्कांसाठी लढत राहिले. कारण अनेक राजकन्नू त्यांच्या सभोवती होते. त्यांचा आवाज, त्यांचे हक्क चिरडले गेले तेव्हा स्वामी, सुधा, वरवरा रावसारखे 'चंद्रू' लढत राहिले. त्या सगळ्या लढवय्यांची कहाणी म्हणजे 'जय भीम'!"

"चंद्रू जिंकला, पण सुधा भारद्वाज, वरवरा राव स्वतंत्र भारताच्या तुरुंगात सडत पडले आहेत! खालच्या जातीच्या आदिवासींना जगण्याचा हक्कच नसेल तर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे सोहळे काय कामाचे? तुरुंगात लोकांना सडवले जाते व तुरुंगाबाहेर न्यायाची भीक मागावी लागते असे हे स्वातंत्र्य! चंद्रूसारखे मोजके लोक अन्यायाविरुद्ध लढा देतात. पण फादर स्टॅन स्वामी, सुधा, वरवरा राव मात्र लढा देताना सर्वस्व गमावतात."

"पोलीस, तपास यंत्रणा खोटी प्रकरणं, खोटे पुरावे तयार करून लोकांचा कसा छळ करतात हे मुंबईतल्या 'क्रुझ पार्टी' प्रकरणातही दिसले. कायद्यास आणि न्यायव्यवस्थेसही जातीची, धर्माची वाळवी लागली; पण 'जय भीम' म्हणतो, घटनेचे खांब मजबूत आहेत. चिंता नसावी. 'देशातील गणतंत्र वाचवण्यासाठी कधी कधी हुकुमशाहीचीही गरज लागते.' 'कायदा तर आंधळा आहेच, पण आज हे कोर्टच मुके झाले तर संकट वाढेल.' असे अनेक संवाद 'जय भीम'चे तेज प्रखर करतात."

"चंद्रू हा वकील वामपंथी (डावी विचारसरणी) विचारधारा मानणारा होता. तो लढत राहिला. वामपंथी असणं हा गुन्हा नाही. हे लोक नसतील तर जंगलातील अन्यायाविरुद्ध कोण लढणार? हेच चंद्रू पुढे मद्रास हायकोर्टात न्यायाधीश झाले, पण तरुण वकील असताना त्यांच्या एका याचिकेनं संपूर्ण राज्यव्यवस्थाच हादरून गेली. राजकन्नूच्या मानवी हक्कांचा लढा ते लढले. राजकन्नू आणि सेनगाई दांपत्याची मनं सुन्न करणारी ही कथा. आजही असे असंख्य राजकन्नू मारले जात आहेत व 'चंद्रू' बनून लढणारे फादर स्टॅन स्वामी, सुधा भारद्वाज लढता लढता शहीद होत आहेत."

"सुधा भारद्वाज गेल्या तीन वर्षांपासून भायखळा तुरुंगात आहेत. त्यांना जामीनही नाकारला जातोय. न्याय मागू नका, न्याय मागणाऱ्यांसाठी लढू नका हाच त्यामागचा संदेश! सिनेमातला एक प्रसंग देतो व विषय संपवतो. 20 मार्चच्या (1993) सकाळी पोलीस तामीळनाडूच्या मुदन्नी गावात पोहोचले. त्यांनी सेनगाईच्या दरवाजावर लाथ मारली. पोलिसांनी सेनगाईला विचारले, 'तुझा नवरा कुठे आहे?' सेनगाई म्हणाली, 'तो कामावर गेलाय.' पोलीस पुढे म्हणाले, 'बाजूच्या गावातील सरपंचाच्या घरात दीड लाखाचे दागिने चोरीला गेलेत. त्यासाठीच तुझ्या नवऱ्याला शोधतोय!' हे ऐकून सेनगाई गोंधळली."

"अनेक दिवस तिचा नवरा कामावरून घरी आलाच नव्हता. ती उत्तर देण्याआधीच पोलिसांनी सेनगाई, तिचे मूल, तिचा दीर, बहीण अशा सगळ्यांना पोलीस व्हॅनमध्ये कोंबून नेले. सेनगाईवरही अत्याचार केले. ती गरोदर असतानाच तिच्या पोटावर लाथा मारल्या. तिचा नवरा राजकन्नू याला बाजूच्या गावातून पकडून आणले. त्याला मरेपर्यंत मारले. तो मरण पावला. वकील चंद्रूमुळे त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्या!"

"जय भीमची ही ताकद आहे. काही लोकांना 'जय भीम' म्हणजे जात व राजकारणाचे डबके वाटत असेल तर तो कायद्याचा अपमान आहे. 'जय भीम'ची ताकद आपल्या देशाला कधी समजणार?", असा प्रश्न संजय राऊत यांनी जय भीम सिनेमांच्या समीक्षेतून उपस्थिती केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in