
अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे दोघंही आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत मातोश्रीसमोर
हनुमान चालीसा २३ एप्रिलला म्हणणार असल्याचा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.आता याबाबत संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देत या दोघांचाही उल्लेख बंटी-बबली असा केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"बंटी आणि बबली पोहचले असतील तर पोहचू द्या. हे फिल्मी लोकं आहेत. ही स्टंटबाजी करणं, मार्केटिंग करणं हे त्यांचं काम आहे. भाजपला मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज असते. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही. आम्हाला हिंदुत्व काय आहे ते व्यवस्थित माहिती आहे. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत" असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"कुणाला स्टंटच करायचं असेल ते करू द्या. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. त्यांना शिवसेनेची मुंबईतली ताकद काय आहे ते कळलेलं नाही. आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. हनुमान चालीसा वाचणं, रामनवमी साजरं करणं हे धार्मिक आणि श्रद्धेचे विष आहेत पण अलिकडे भाजपला स्टंटबाजी करायला आवडतं आहे. लोक त्यांच्या हिंदुत्वाला, नाटकाला गांभीर्याने घेत नाहीत" असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मातोश्रीसमोर हनुमाना चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही दिलं आहे. त्यासाठीच ते दोघं मुंबईत दाखल झाले आहेत. अशात शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांनाही रोखण्यासाठी आज संध्याकाळपासूनच बडनेरा स्टेशनच्या बाहेर जमणार होते. तसंच सोशल मीडियाद्वारे रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं.
रवी राणा यांचं काय म्हणणं आहे?
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातली संकटं वाढली आहेत. मुख्यमंत्री बाहेर पडत नाही. संकटांमधून बाहेर पडण्यासाठीच त्यांनी हनुमान चालीसा वाचावी असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. अमरावती ते मातोश्री अशी वारी श्रद्धेने करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं होतं.
२३ एप्रिलला म्हणजेच उद्या रवी राणा नवनीत राणा हे दोघे मुंबईतल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्याधी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा वाचणार असल्याचं आवाहन रवी राणा आणि नवनीत राणा यांनी केलं होतं. त्यावेळी शिसवैनिकांची मातोश्रीबाहेर तुफान गर्दी झाली होती.