'फकीर' म्हणवून घेणारा लढ्यात उतरतो, पण नेहरूंसारखं...; संजय राऊतांनी सुनावले खडेबोल

ICHR Poster Azadi ka Amrut mahotsav : 'पंडित नेहरूंशी वैर का घेता? याचे उत्तर देशाला द्यावेच लागेल', राऊतांचं टीकास्त्र
नेहरूंच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर प्रकाश टाकत संजय राऊतांनी मोदी सरकारला सुनावले खडेबोल.
नेहरूंच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर प्रकाश टाकत संजय राऊतांनी मोदी सरकारला सुनावले खडेबोल.India Today

भारतीय इतिहास संशोधन परिषद अर्थात आयसीएचआरने (Indian Council Of Historical Research) 'आजादी का अमृत महोत्सव'च्या पोस्टरवरून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरूंचं चित्र वगळलं. यावरून मोदी सरकार टीकेचे धनी ठरले आहे. आयसीएचआरकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरवरून शिवसेनचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून नेहरूंच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावर प्रकाश टाकत मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

संजय राऊत काय म्हणालेत?

'देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासही बदलला जात आहे काय? यावर आता राजकीय वादळ उठले आहे. ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यातच धन्यता मानतात, ही जगभराची 'रीत' आहे. भारतीय स्वातंत्र्याचं सध्या 75 वं म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या 'इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च' (ICHR) या संस्थेनं 'आजादी का अमृत महोत्सव'च्या पोस्टरवरून पंडित नेहरूंचं चित्र वगळलं.'

'या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्रं ठळकपणे आहेत, पण पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आलं. नेहरू, आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरूंना खासकरून वगळून विद्यमान सरकारनं आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविले. ज्यांचा इतिहास घडविण्यात सहभाग नव्हता व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्र्य लढ्याचे एक नायक पंडित नेहरूंनाच स्वातंत्र्य लढ्यातून दूर केले जात आहे. हे बरे नाही', अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

'पंडित नेहरू व त्यांच्या काँग्रेस पक्षाविषयी मतभेद असू शकतात. नेहरूंच्या राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय भूमिका कदाचित कुणाला मान्य नसतील, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचं स्थान राजकीय द्वेषापायी पुसून टाकणे हा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे', असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut Criticized to PM Modi
Sanjay Raut Criticized to PM Modi

इतिहास म्हणजे काय?

विद्यमान मोदी सरकारचे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींशी राजकीय भांडण असायला हरकत नाही. सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणाऱया 'खेलरत्न' पुरस्काराचे नावही बदलून आपला द्वेष जगजाहीर केला, पण पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्य लढय़ातील आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान हा अमर इतिहास आहे. तो नष्ट करून काय साध्य होणार?', असा सवाल संजय राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे.

'नेहरू केंब्रिजला शिकले, बॅरिस्टर झाले. अलाहाबाद हायकोर्टात वकिली करू लागले. 1912 मध्ये बंकीपूर काँग्रेसमध्ये त्यांनी राजकीय जीवनाला प्रारंभ केला. 1921 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. 1928 साली सायमन कमिशनविरुद्ध निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करीत असताना त्यांच्यावर लाठीमार झाला. 14 एप्रिल 1930 साली मिठाच्या कायदेभंग मोहिमेत त्यांना अटक झाली व सहा महिन्यांचा कारावास घडला. 1932 साली त्यांना पाचव्यांदा कारावास घडला. 31 ऑक्टोबर 1940 साली पुन्हा अटक व चार वर्षांची सजा. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात 'भारत छोडो' ठराव मांडला, वातावरण पेटले. नेहरूंना पुन्हा अटक झाली. अटक करून त्यांना नगरच्या किल्ल्यात ठेवले. तो अखेरचा आणि सर्वात दीर्घ तुरुंगवास होता', असं म्हणत संजय राऊतांनी नेहरूंच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागावरही प्रकाश टाकला.

'भारत छोडो आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा जनसंघाचे संस्थापक कुठेच नव्हते. नेहरू, पटेल या आंदोलनात तुरुंगात गेले. या घटनेवर प्रकाश टाकणारे एक पुस्तक 'काँग्रेस रेडिओ' असे प्रसिद्ध झाले. उषा ठक्कर त्याच्या लेखिका आहेत. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातून नेहरूंचे चित्र वगळणाऱया ICHR ने हे पुस्तक नजरेखालून घातले पाहिजे', असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

'नेहरूंच्या स्वातंत्र्य लढ्याला न्यायाचे अधिष्ठान होते. नेहरू हे श्रीमंतीत जन्मास आले व श्रीमंतीत वाढले. इंग्लंडच्या 'हॅरो' शाळेत ते शिकले. केंब्रिजमध्ये पुढचे शिक्षण घेऊन ते बॅरिस्टर झाले. बॅरिस्टरीचा झगा चढवून ते खोऱ्याने पैसा मिळवू शकले असते, पण त्यांनी त्या सगळ्याचा त्याग केला व स्वातंत्र्य लढ्यात उतरले. 'फकीर' म्हणवून घेणारा लढ्यात उतरतो ती गोष्ट वेगळी, पण सर्वस्व झोकून नेहरू, सावरकरांसारखे बॅरिस्टर सुखाचा त्याग करतात तेव्हा त्यांचे योगदान नाकारणारेच इतिहासाचे खलनायक ठरवले जातात', असा इशारा संजय राऊतांनी मोदी सरकारला दिला.

'नेहरूंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून सरकार मजा मारीत आहे. नेहरूंनी राष्ट्रीय संपत्ती निर्माण केली नसती तर देशात बेरोजगारी, उपासमारीचे अराजक माजले असते. नेहरूंच्या दूरदृष्टीपणामुळे हे संकट टळले. याबद्दल सध्याच्या सरकारने पंडित नेहरूंचे आजन्म ऋणी राहायला हवे, पण याउलट देशाच्या स्वातंत्र्य समरातून नेहरूंचे नावच गायब केले गेले. देशात सूडाच्या राजकारणाचे प्रवाह उसळत आहेत व द्वेषाचे बुडबुडे फुटत आहेत. पंडित नेहरूंशी वैर का घेता? याचे उत्तर देशाला द्यावेच लागेल', असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in