
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळं,बागा, रिकामी मैदानं, समुद्रकिनारे या ठिकाणी जाण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. सुरूवातीला पोलिसांनी 7 जानेवारी 2022 पर्यंत जमावबंदी लागू केली होती आता कलम 144 चा कालावधी पोलिसांनी 15 जानेवारीपर्यंत वाढवला आहे. याबाबतीत सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले, '31 डिसेंबरच्या अनुषंगाने नागरिकांनी पॅनिक होऊ नये. मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. घातपाताच्या अनुशंगाने सर्व मेजर काळजी घेण्यात आलेली आहे. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार महापालिकेच्या पथकासोबत पोलिसही कारवाईत सहभागी राहणार आहेत. याबाबत सर्व पोलिस पथक, पोलीस ठाण्याना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.' नागरिकांनी घरी राहून यंदाचा 31 डिसेंबर साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबईच्या जूहू चौपाटीवर मुंबईकरांनी सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी केली आहे. या चौपाटीवर 250 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच कोस्ट गार्ड, लाईफ गार्डही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. खासगी सुरक्षा रक्षाकांनाही याठिकाणी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पार्टी-सेलिब्रेशनला बंदी
वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्तराँ, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही.
बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी
पोलीस बाहेरून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. जे वाहनचालक कोरोना नियमांचे आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा येते आहे. वाहनधारकांना मुंबईमध्ये येण्याचे कारण, तसेच वाहनांच्या कायदेशीर कागदपत्रांची देखील पोलिसांकडून विचारणा केली जाते आहे. नववर्षाच्या निमित्ताने मुंबईमध्ये अनेक जण येतात. सध्या राज्यात ओमिक्रॉनची साथ चालू आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तसेच संभाव्य घातपात टाळण्यासाठी तपासणी मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.