Ganesh Utsav 2021 : पुण्यापाठोपाठ मुंबईत जमावबंदीचे आदेश, कलम 144 लागू

जाणून घ्या काय म्हटलं आहे पोलिसांनी
Ganesh Utsav 2021 : पुण्यापाठोपाठ मुंबईत जमावबंदीचे आदेश, कलम 144 लागू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सवा दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबईत 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू नयेत यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून यासंदर्भातल्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव या काळात होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी लोकांना एकत्र येण्यावर मज्जाव करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग पुन्हा वाढतोय का असं चित्र निर्माण झालं आहे कारण मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत त्याशिवाय इतर काही जिल्ह्यांमध्येही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव या काळात गर्दी वाढली तर कोरोना संसर्ग वाढण्याचीही भीती आहे. त्यामुळेच कलम 144 मुंबईत लागू करण्यात आलं आहे. पुण्यातही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समितीनच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी लोकांची गर्दी टाळता कशी येईल याबाबत चर्चा झाली होती.

दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.

Covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.

उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. या स्वरूपाच्या या गाईडलाईन्स आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in