1947 च्या फाळणीत ताटातूट झालेले भाऊ 74 वर्षांनी भेटले, दोघांनाही अश्रू आणि आनंद अनावर!

जाणून घ्या नेमकं काय घडलं? कशी झाली दोन भावांची भेट?
1947 च्या फाळणीत ताटातूट झालेले भाऊ 74 वर्षांनी भेटले, दोघांनाही अश्रू आणि आनंद अनावर!
Separated by Partition, brothers meet at Kartarpur Corridor after 74 yearsफोटो-इंडिया टुडे

1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण त्याचवेळी दोन देशांमध्ये एक रेष कायमची ओढली गेली. भारत आणि पाकिस्तान हे दोन देश या एका रेषेने वेगळे झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा जितका आनंद आपल्याला आहे तितक्याच या फाळणीच्या जखमांचं दुःखही आहे. सीमेजवळ राहणाऱ्या बहुतांश लोकांच्या वाट्याला हे दुःख आलं. याच फाळणीत ताटातूट झालेले दोन भाऊ 74 वर्षांनी भेटले आणि दोघांनीही एकमेकांना मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

या दोन भावांच्या भेटीचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. जेव्हा हे दोन भाऊ एकमेकांना भेटले तेव्हा तो क्षण फक्त त्यांच्यासाठी नाही तर तिथे असलेल्या प्रत्येकासाठीच भावना दाटून येणारा होता. या दोन भावांचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानातील फैसलाबादमध्ये सिद्दीकी राहतात. तर त्यांचा मोठा भाऊ असलेले हबीब हे भारतातील पंजाबमध्ये फुलनवाल या ठिकाणी राहतात. सिद्दीकी हे पाकिस्तानातून आपल्या मोठ्या भावाची भेट घेण्यासाठी आले होते. करतारपूरमध्ये ही भेट झाली.

फोटो-इंडिया टुडे

करतारपूर कॉरिडॉर हा पाकिस्तानला भारताच्या सीमेशी जोडणारा भाग आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा सिद्दीकी लहान होते, त्यावेळी ते पाकिस्तानात गेले आणि त्यांचा मोठा भाऊ हबीब भारतात आले. 74 वर्षांनी या दोन भावांची भेट झाली हा क्षण अत्यंत भावनिक होता. यावेळी हबीब यांनी करतारपूर कॉरिडॉरचे कौतुक केले. हा कॉरिडॉर सुरू झाल्याने ताटातूट झालेल्या भावाला भेटू शकलो असंही त्यांनी म्हटलं आहे.

फोटो-इंडिया टुडे

हबीब यांनी आपला धाकटा भाऊ असणाऱ्या सिद्दिकीला या कॉरिडॉरच्या माध्यमातून आपण भेटत राहू असे सांगितले. करतारपूर कॉरिडॉर उघडल्याबद्दल या दोन्ही भावांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे आभार मानले. कारण हा कॉरिडॉर सुरू केल्यामुळेच आम्हा दोघा भावांची भेट झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये करतारपूर कॉरिडॉर उघडण्याचा निर्णय घेतला होता. 4.7 किलोमीटर लांबीचा हा करतारपूर कॉरिडॉर आहे. मात्र, नंतरच्या काळात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला. त्यामुळे खबरदारी म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in