
मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 28 दिवसांनंतर त्याच्या घरी म्हणजे 'मन्नत'वर पोहोचला आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर चाहत्यांनी मन्नतच्या बाहेर चक्क ढोल वाजवून फटाके लावून आर्यनचे स्वागत केले. 2 ऑक्टोबर (आर्यनची अटक) ते 30 ऑक्टोबर (आर्यनची तुरुंगातून सुटका) या प्रकरणात नेमकं काय-काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर.
2 ऑक्टोबर: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया (Cordelia) क्रूझवर एनसीबीचा छापा. जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. पार्टी सुरू होण्यापूर्वीच आर्यन खान, अरबाज मर्चंटसह 8 जणांना एनसीबीने घेतले होते ताब्यात. आर्यन खानसह सर्व आरोपींना 2 ऑक्टोबरची संपूर्ण रात्र कोठडीत ठेवण्यात आलं होतं.
3 ऑक्टोबर: आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, एनसीबीने तिघांनाही अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना 1 दिवसाची एनसीबी कोठडी दिली.
4 ऑक्टोबर: आर्यन आणि उर्वरित आरोपींना पुन्हा दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. एनसीबीने आर्यनच्या फोनवरून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी, ड्रग्ज चॅटचे पुरावे सापडल्याचा दावा करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली.
7 ऑक्टोबर : आर्यन आणि इतरांची एनसीबीला कोठडी देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय सुनावण्यात आला. आर्यन खानची त्याच दिवशी आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. दुसरीकडे आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी त्याच्या जामिनासाठी अर्ज केला.
8 ऑक्टोबर : आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला. त्याच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
9 ऑक्टोबर : आर्यन खानच्या जामिनावर सेशन्स कोर्टात सुनावणी झाली. आर्यनच्या वकिलाने असा युक्तीवाद केला की, एनसीबीने आर्यनकडून कोणतेही अंमली पदार्थ जप्त केले नाही. जे एनसीबीनेही मान्य केले आहे.
11 ऑक्टोबर : आर्यन खानच्या वकिलाने जामीन अर्जावर लवकर सुनावणीची मागणी केली. न्यायालयाने एनसीबीला 13 ऑक्टोबरला उत्तर दाखल करण्यास सांगितले.
13 ऑक्टोबर: मुंबई सत्र न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर 14 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती.
14 ऑक्टोबर : मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा जामिनावर अर्जावरील निर्णय हा 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला.
20 ऑक्टोबर : मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. तीनही आरोपींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
21 ऑक्टोबर : शाहरुख खान पहिल्यांदाच तुरुंगात मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. दोघांमध्ये 18 मिनिटे चर्चा झाली, ही भेट खूपच भावूक होते. दोघे इंटरकॉमवर बोलत होते. दोघांमध्ये काचेची भिंत आणि ग्रील होती.
25 ऑक्टोबर : शाहरुख खाननंतर त्याची पत्नी गौरी खान आर्थर रोड जेलमध्ये मुलाला भेटायला गेली.
26-28 ऑक्टोबर: आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी झाली. मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची केस लढवली.
28 ऑक्टोबर : आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटला जामीन मंजूर. मात्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही, त्यामुळे कारागृहातून बाहेर येऊ शकला नाही.
30 ऑक्टोबर : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची 28 दिवसांच्या संघर्षानंतर आर्थर रोड जेलमधून ड्रग प्रकरणी तुरुंगातून जामीनावर सुटका झाली. 28 दिवसांनंतर आर्यन खान त्याच्या घरी म्हणजे 'मन्नत'वर परतला. शाहरुख खानचा अंगरक्षक रवी आर्यनला तुरुंगातून घरी घेऊन गेला.