'महाविकास आघाडी सरकार'पेक्षा 'पुलोद'चं सरकार चालवणं अधिक सोप्प होतं, कारण... -शरद पवार

sharad Pawar On Mumbai Tak : शरद पवारांनी मजेशीर किस्से सांगत सांगितला दोन्ही सरकारमधील फरक
 ‘मुंबई तक’ला शरद पवारांची विशेष मुलाखत.
‘मुंबई तक’ला शरद पवारांची विशेष मुलाखत.

प्रचंड घुसळण होऊन राज्यात २०१९मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पुलोद सरकारवेळी झालेल्या राजकीय प्रयोगाची पुनरावृत्ती यानिमित्ताने बघायला मिळाली. त्यावेळचं पुलोद सरकार आणि आता महाविकास आघाडी सरकार याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची निरीक्षणं नोंदवत भाष्य केलं.

इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विशेष मुलाखत दिली. 'इंडिया टुडे'चे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई आणि कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी शरद पवार यांच्याशी संवाद साधला.

यावेळी 'पुलोद'चं सरकार व आता महाविकास आघाडीचं सरकार यात काय फरक जाणवतो? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, 'यात फार फरक आहे. कारण या सरकारमधील दोन्ही काँग्रेसने आधी दहा वर्ष एकत्र सरकार चालवलं आहे. आम्ही एकाच विचारधारेचे लोक आहोत. आमचा विचार गांधी-नेहरूंचा, फक्त कार्यपद्धतीबद्दल मतभेद होते. त्यामुळे त्यात वेगळेपण नव्हतं', असं पवार यांनी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'यावेळी शिवसेना सोबत आली. शिवसेना सुरूवातीपासूनच काँग्रेसच्या इतक्या विरोधात नव्हती. आणीबाणीच्या काळात बाळासाहेबांनी स्वच्छपणे पाठिंबा दिला होता. त्यानंतर जी निवडणूक झाली. त्या निवडणुकीत महाराष्ट्रात अंतुले मुख्यमंत्री झाले. त्या निवडणुकीत शिवसेनेनं अशी भूमिका घेतली होती की, काँग्रेसविरुद्ध उमेदवार दिलेला नव्हता. आज महाराष्ट्रात आम्ही एकत्र आलोय, पण यापूर्वीही शिवसेनेनं अशी भूमिका घेतलेली होती. त्याच मुख्य कारण कदाचित अति डाव्याच्या विरोधात असल्यामुळे ते झालं असावं', असं पवारांनी सांगितलं.

'हे भाजपचं वैशिष्ट्ये'

राजदीप सरदेसाई यांनी शरद पवार यांना हे सरकार तीन चाकी आहे. हे सरकार किती काळ राहणार आहे? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर पवार म्हणाले,'हे भाजपचं वैशिष्ट्ये आहे की, एखादी गोष्ट बाहेर पसरवायची असेल, तर भाजपच्या सहकार्याचं कर्तृत्व मोठं आहे. हे सरकार टिकणार नाही, हे भाजपने पहिल्या दिवसांपासून सुरू केली. आधी एक महिना, दोन महिने नंतर सहा महिने असं त्यांनी सांगितलं; आता ते थांबलं आहे', असं भाष्य पवार यांनी केली.

 ‘मुंबई तक’ला शरद पवारांची विशेष मुलाखत.
आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी- शरद पवारांचं परखड भाष्य

यालाच जोडून सरकारचा पुढचा आता फॉर्म्युला काय? असा राजदीप सरदेसाई यांनी विचारला. त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, '1977 चं सरकार आणि आताच सरकार यांच्यात आणखी फरक आहे, तो म्हणजे त्यावेळचं सरकार चालवायला अधिक सोप्प होतं. मुख्यमंत्री होतो, माझे सर्व सहकारी ते एका चौकटीबाहेर जाणारे लोक नव्हते. चर्चेत ठरलं, ते ठरलं. त्यावर जास्त चर्चा करायची गरजच पडत नव्हती. सरळ स्वभावाची लोक होते. सरकार बनलं हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती.'

'मला आठवत की एक दिवस एक मंत्री माझ्याकडे आले आणि त्यांना लिफ्ट जवळ थांबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विचारलं की 'का थांबवलं?' त्यावर ते म्हणाले की, मला सांगण्यात आलं की, मंत्री येणार आहेत आणि तुम्ही बाजूला व्हा. नंतर आणखी दोन-तीन लोकांच्या तक्रारी आल्या. त्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलला. त्यावेळचे मंत्री इतके साधे होते की लिफ्टजवळ अडवलं जायचं', असा किस्साही पवारांनी यावेळी ऐकवला.

यावर पूर्वीचे मंत्री सरळ स्वभावाचे होते, यावरून तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? असा प्रश्न साहिल जोशी यांनी पवारांना प्रश्न केला. 'आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी आली होती. लोकांना काय सवय होती, काँग्रेसचं मंत्रिमंडळ. महाराष्ट्रात 1977 चं सरकार हे पहिलं संमिश्र सरकार होतं. त्यानंतर मनोहर जोशींचं पाच वर्षांचं काँग्रेसविरोधी सरकार होतं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं काँग्रेसविरोधी सरकार राहिलं. 77च्या सरकारमुळे गैरकाँग्रेसी नेतृत्वात एक आत्मविश्वास आला. त्यांना एकदा, दोनदा सरकारं चालवण्याची संधी मिळाली', असं उत्तर पवारांनी दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in