Advertisement

"शरद पवार शेतकऱ्यांचा खजिना लुटण्यात माहीर, त्यांच्या मुखात राम अन् बगलेत सुरी"

"शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम असतो तर बगलेत सुरी असते"
राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. India Today

'उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. यामागे महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हात आहे. त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू. शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम असतो तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सदाभाऊ खोत दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी (२८ सप्टेंबर) रात्री भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारचे 3 नवीन कृषी कायदे, उसाची एफआरपी, आरोग्य विभागाचा कारभार अशा विविध विषयांवर त्यांनी मते मांडत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं.

"शरद पवारांची भूमिका दुटप्पी"

सदाभाऊ खोत म्हणाले, 'महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेत 2005 मध्ये करार शेतीचे एक विधेयक आले होते. हे विधेयक म्हणजेच आज केंद्राने पारित केलेले 3 नवीन कृषी कायदे आहेत. गेली अनेक वर्ष या तिन्ही कृषी कायद्यांचा खरा फायदा कुणी घेतला असेल, तर तो शरद पवारांच्या बारामती ऍग्रो कंपनीनं घेतला आहे. स्वत: कायद्यांचा लाभ घ्यायचा. मात्र, आता फायदा घेण्याची शेतकऱ्यांची वेळ आल्यावर माझ्या कुटुंबाशिवाय कुणालाही लाभ मिळू नये, अशी दुटप्पी भूमिका पवार घेत आहेत, असा आराेप सदाभाऊ खाेत यांनी केला.

'कृषी कायद्यांच्या विराेधात भारत बंद पुकारण्यात आला. परंतु, या बंदमध्ये शेतकरी कुठेही दिसला नाही. जनतेनं या बंदकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदे तयार करून 70 वर्षांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा आशावाद निर्माण केला आहे', असं खाेत म्हणाले.

'शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. म्हणून मी त्यांना कधीही जाणता राजा म्हणत नाही. ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नाहीत. शेतकऱ्याचा खजिना लुटण्यात ते माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्यास केंद्राला सांगितलं', असा दावा खोत यांनी यावेळी केला.

एफआरपीसाठी लवकरच आंदाेलन-

'राज्य सरकारची एफआरपीबाबत असलेली भूमिका दुटप्पी आहे. याबाबत आम्ही लवकरच एल्गार पुकारणार आहोत. एफआरपीच्या मुद्द्यावरून आम्ही लवकरच साखर आयुक्तालयासमाेर निदर्शने करणार आहोत. हा मुद्दा केंद्राकडेही प्राधान्याने मांडणार आहे', अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in