'..अधिकारी म्हणाले, ही गडकरींची कृपा' शरद पवारांनी केलं नितीन गडकरींचं कौतुक

जाणून घ्या काय म्हणाले शरद पवार?
'..अधिकारी म्हणाले, ही गडकरींची कृपा' शरद पवारांनी केलं नितीन गडकरींचं कौतुक

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या वेगवान कामांसाठी प्रसिद्ध आहेत. सगळ्या पक्षांमध्ये नितीन गडकरी यांचं कौतुक केलं जातं. आज शरद पवारांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं आहे. आज अहमदनगरमध्ये नितीन गडकरी आणि शरद पवार हे एकाच मंचावर होते. यावेळी गडकरींच्या कामाचं कौतुक करत असताना त्यांनी एक अनुभवही सांगितला.

काय म्हणाले शरद पवार?

नितीन गडकरी यांच्याबाबत शरद पवारांनी सांगितलं की, 'देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेले उत्तम रस्ते पाहण्यास मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते गडकरी साहेबांची कृपा आहे असं सांगतात. लोकप्रतिनिधी हातात सत्तेचा अधिकार आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो याचं उत्तम उदाहरण नितीन गडकरींनी दाखवून दिलं आहे.'

नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात असं शरद पवार म्हणाले. संसदेत मी बघतो की गडकरींकडे येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत तर त्यानं आणलेलं विकासकाम काय आहे हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो', असं शरद पवार यावेळी म्हणाले.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

'मला रस्त्याने प्रवास करायला आवडतं, देशाच्या अनेक भागांमध्ये मला जावं लागतं. त्यानिमित्त कारने प्रवास करायला आवडतं. त्यामध्ये आनंद मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे रस्ते बघायला मिळतात. आजूबाजूच्या शेतातलं पीक पाहण्यास मिळतं त्यामुळे मला रस्याने प्रवास करणं आवडतं' असंही शरद पवारांनी सांगितलं. एवढंच नाही तर नितीन गडकरींचं कौतुक करताना पवार म्हणाले की त्यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रालय येण्यापूर्वी देशात 5 हजार किमींचं काम झालं होतं. गडकरींकडे जबाबदारी आल्यावर हे प्रमाण 12 हजार किमीच्या पुढे गेलं आहे.

'..अधिकारी म्हणाले, ही गडकरींची कृपा' शरद पवारांनी केलं नितीन गडकरींचं कौतुक
नितीन गडकरी म्हणतात, 'जे मुख्यमंत्री झाले तेही दुःखी, कारण...'

नितीन गडकरी काय म्हणाले?

'गरीब गरीब असतो. गरीबाला जात, धर्म, भाषा नसते. गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेल ज्या भावात हिंदूंना मिळतं, त्याच भावात मुस्लिमांनाही मिळतं. त्यामुळे या देशातील गरीबी, उपासमार, आणि बेरोजगारी दूर करणं गरजेचं आहे. गाव, गरीब आणि मजुरांचं कल्याण करायचं असेल, तर रोजगाराची निर्मिती केली पाहिजे आणि रोजगाराची निर्मिती करायची असेल, पाणी, वीज, रस्ते आणि संवाद सुविधा असाव्या लागतील', असं गडकरी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in