'समाजात विकृत मनोवृत्ती असते, तिची दखल घ्यायची नाही'; शरद पवारांचा विक्रम गोखलेंना टोला

अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाने केलेल्या वक्तव्याचं समर्थन करत तिला पाठिंबा दर्शवला... विक्रम गोखलेंनी घेतलेल्या भूमिकेवरुन शरद पवारांनी लगावला टोला
'समाजात विकृत मनोवृत्ती असते, तिची दखल घ्यायची नाही'; शरद पवारांचा विक्रम गोखलेंना टोला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अभिनेते विक्रम गोखले.

भारतीय स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादाची धूळ खाली बसत नाही, तोच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाला समर्थन दिलं. त्यामुळे नव्याने या वादाला तोंड फुटलं असून, विक्रम गोखले यांनी मांडलेल्या भूमिकेवर शरद पवारांनी टोला लगावला आहे. 'अशा लोकांच्या अशा वक्तव्यांची दखलही घ्यावी वाटतं नाही', असं पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अभिनेते विक्रम गोखले.
Vikram Gokhale : विक्रम गोखलेंना काय झालंय...? कंगना रनौतचं केलं समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ अधिवेशनात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी शरद पवार यांना अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगना रनौतचं समर्थन करण्याबद्दलच्या मुद्द्यावरून पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना समाजात विकृती मनोवृत्तीचे लोक असतात, त्यांची दखल घ्यायची नसते, असं म्हणत टोला लगावला.

शरद पवार म्हणाले, 'ज्यांच्याबद्दल तुम्ही बोललात, अशांच्या अशा वक्तव्यांची नोंद सुद्धा घ्यावी असं मला वाटतं नाही. त्याची नोंद आपण घेऊ नये. शेवटी समाजात असे काही लोक असतात. शेवटी समाजात ज्याला इंग्रजीमध्ये परवर्ट (pervert) म्हणतात अशी एक मनोवृत्ती असते. म्हणून त्याची आपण दखल घ्यायची नसते. सोडून द्यायचं असतं", असं म्हणत शरद पवार यांनी विक्रम गोखलेंवर निशाणा साधला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अभिनेते विक्रम गोखले.
'...तर मी पद्मश्री पुरस्कार परत करते' स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील हिंसाचार...

"त्रिपुरामध्ये घडलं म्हणून महाराष्ट्रात असं घडणं योग्य नाही. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात, हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या आहेत. या प्रवृत्तींना किती महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असतांना हे घडू नये. सार्वजनिक शांततेला धक्का बसेल असं काम एकेकाळी सत्तेत असलेले लोक करत आहेत हे दुर्दैव आहे. तीन चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं आहे. याचा फटका सामान्यानांच बसतो', असं म्हणत शरद पवार यांनी नांदेड, मालेगाव, अमरावतीत झालेल्या हिंसाचारावरून अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला.

कंगनाचं आणि विक्रम गोखले काय म्हणाले होते?

"सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो, तर या लोकांना माहित होतं की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे", असं कंगना म्हणाली होती.

तिच्या या भूमिकेचं समर्थन करत अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, "कंगना रनौत जे म्हणाली आहे की, जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते भीक मागून मिळालेलं आहे. त्यावर मी सहमत आहे. हे दिलेलं आहे बरं का? हे ज्या योद्धयांनी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना फासावर जाताना. मोठंमोठे लोक बघत राहिले, त्यांना वाचविले नाही."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in