...नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवू; शरद पवारांचं जाहीर सभेत विधान

50 टक्के जागा महिलांना देणार; भाजप सोडून इतर पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न
...नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवू; शरद पवारांचं जाहीर सभेत विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.

राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढणार की, स्वतंत्र याकडे राज्यातील जनतेचं लक्ष असतानाच आज सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळाचे संकेत दिले.

सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. शरद पवार म्हणाले, 'बऱ्याच दिवसानंतर मी आज सोलापूरला आलोय. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पळापळ सुरू होती. अनेक वर्षे या पक्षात काम केलेले आणि महत्त्वाची पदं ज्यांनी भोगली, असे अनेक लोक पक्ष सोडून गेले. तरुण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. पळपुट्यांच्या विरोधात भूमिका घेण्याची सुरूवात सोलापूरातून केली.'

'त्यावेळी भाजपचं राज्य येणार अशी चर्चा होती. पण आज राज्यात उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकार आलं. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्याचा उपयोगी वेगळ्या पद्धतीने होतोय. आज आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. त्यांना सामोरं जायचं आहे', असं आवाहन पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.

'देशात राष्ट्रभक्तीची सर्व जबाबदारी आज भाजपकडे आहे. लोकशाही पद्धतीने सरकार आलं. त्याबद्दल तक्रार करण्याचं कारण नाही. पण, सत्तेवर आल्यानंतर सत्तेचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करावा लागतो. मात्र, ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा उपयोग वेगळ्या पद्धतीने केला जात आहे', असं टीकास्त्र शरद पवारांनी भाजपवर डागलं.

'इंग्रजांना या देशाच्या विकासात आस्था नव्हती. स्वातंत्र्यानंतर देशाला जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व लाभलं. त्यांनी या देशाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम केलं. त्यांनी मूलभूत काम केलं म्हणून आज त्यांची आठवण होतेय. आजचं केंद्र सरकार काय करतंय? केंद्र सरकारने जे नवीन रेल्वे लाईनसंदर्भात निर्णय घेतला, तर मी अभिनंदन करेन. जे कधीही या देशात घडलं नाही, ते हे सरकार करत आहे. रेल्वे स्टेशनची विक्री करून खासगीकरण करणे, हे राज्यकर्त्यांनी सुरू केलंय', अशी टीका पवारांनी केली.

'आता महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यात लक्ष घालावं लागेल. यापूर्वीच्या निवडणुकीत लक्ष दिलं नाही, त्यामुळे अशा लोकांच्या विचाराच्या हातात महापालिका गेली. त्याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला. आज शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत माझी चर्चा झाली. त्यात अशी चर्चा झाली की, भाजप सोडून इतर पक्षांची आपल्याला एकजूट करावी. एकजूट करण्याचा आपला प्रयत्न राहिल. एकजूट झाली, तर आपण एकत्र निवडणुकीला सामोरं जाऊ. पण ती एकजूट सन्मानाने झाली पाहिजे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. पण, सन्मान नसेल, तर मग आपण स्वतंत्र निवडणूक लढवू. याबद्दल माझ्या मनात शंका नाही', असं म्हणत शरद पवारांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले.

Related Stories

No stories found.