"क्रूझवरील 'रेव्ह' पाटर्याप्रमाणे, भाजप कार्यकर्त्यांचं अस्तित्व काश्मिरातही दिसावं"

काश्मिरातील रक्तपातावरून शिवसेनेचं मोदी सरकारच्या धोरणांवर बोट : ईडी, सीबीआय, आयटी आदी केंद्रीय यंत्रणांच्या वापरावरून साधला निशाणा
"क्रूझवरील 'रेव्ह' पाटर्याप्रमाणे, भाजप कार्यकर्त्यांचं अस्तित्व काश्मिरातही दिसावं"
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत.

काश्मीर खोऱ्यानं पुन्हा एकदा देशाची चिंता वाढवली आहे. काश्मिरात दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं असून, दहशतवाद्यांकडून दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी एका शाळेतील शिक्षकांना लक्ष्य करण्यात आलं. या वाढत्या घटनांवरून शिवसेनेनं केंद्राच्या नोटाबंदी, कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं आहे. त्याचबरोबर एनसीबीच्या कारवाईत सहभागी असलेल्या भाजप कार्यकर्त्यांबद्दल खडेबोल सुनावले आहेत.

शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदी सरकारला निशाणा केलं आहे. 'भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच आहेत. फक्त ते कश्मीर खोऱ्यात दिसत नाहीत. कश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांत भयंकर असा रक्तपात घडला आहे. सात नागरिकांना अतिरेक्यांनी दिवसाढवळ्या ठार केले. दहशतवादी गावात घुसतात, ओळखपत्रे तपासून हिंदू किंवा शिखांना ठार करतात असे हत्यासत्रच सध्या कश्मीरमध्ये सुरू आहे.'

'श्रीनगरला शाळेच्या महिला प्राचार्यांना अतिरेक्यांनी ठार केले. या प्राचार्या कश्मिरी शीख समाजाच्या होत्या. दीपक चांद नावाच्या शिक्षकास गोळ्या घालून मारले. ते कश्मिरी पंडित होते. फक्त कश्मिरी पंडित, हिंदू, शीखच नाहीत, तर पोलीस खात्यात कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांनाही अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे', असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

'कश्मीर पुन्हा हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभे आहे. नोटाबंदी केल्यामुळे दहशतवाद थांबेल असे केंद्र सरकार सांगत होते. नोटाबंदीमुळे बनावट नोटांचे उत्पादन थांबेल व अतिरेक्यांची आर्थिक रसद तुटेल असे सांगितले गेले, ते खरे ठरले नाही. त्यानंतर 370 कलम हटवले. 370 कलम हटवल्याने खोऱ्यातील हिंसाचारालाच आळा बसेल व पाकड्यांचे धाबे दणाणेल, असा दावा केला जात होता. तोदेखील फोल ठरला.'

'कश्मीर खोऱ्यातील लोक जीव मुठीत धरूनच जगत आहेत. कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत. हिंदुत्वाचा फुका अभिमान मिरवता, पण कश्मीरातील हिंदूंना वाचविण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात. लखीमपूर खेरीतही चार हिंदू, शीख त्यांनी चिरडून मारले आणि कश्मीरातील हिंदूंना वाऱ्यावर सोडले आहे', अशी टीका शिवसेनेनं मोदी सरकारवर केली आहे.

'कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक आणि हाताबाहेर जाताना दिसत आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून फुटीरतावाद्यांना जोर चढला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार हे पाकड्यांचे पाप आहे व त्यांच्या मदतीने कश्मीरवर चढाई करू, असे पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या चिंधड्या कशा उडविणार आहात ते सांगा. पोकळ भाषणे, आश्वासने व निवडणुकांच्या तोंडावरील 'सर्जिकल स्ट्राईक'चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही व हिंदूंचे रक्षण होणार नाही. पुन्हा येथे नोटाबंदीचे सर्जिकल स्ट्राईक चालले नाही, हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे', असं टीकास्त्र शिवसेनेनं डागलं आहे.

'एकंदरीत कश्मीरबाबतच्या धोरणांचा साफ फियास्को झाला आहे. कश्मीर प्रश्नाचे नको तितके राजकारण झाले. कश्मीर हा देशातील मतपेटीचा विषय बनला. ''पाकव्याप्त कश्मीरही भारताला जोडू'' असे सांगून मते मिळवली गेली, पण आपल्या कश्मीरात भारतीयांना जगणं कठीण झालं आहे. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी कश्मीरप्रश्नी आरपारची लढाई करावी, असे देशातील जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. कारण कश्मीर खोरे रोज निरपराध्यांच्या रक्ताने भिजत आहे. त्यांच्या किंकाळ्या व आक्रोशाने थरारत आहे. शिवाय अतिरेक्यांना भय उरले नाही हे तर आहेच, पण कायद्याचे राज्यदेखील खोऱ्यात अस्तित्वात नाही', असं भाष्य शिवसेनेनं केलं आहे.

'इतर राज्यांत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांच्या नाड्या आवळता येतात, पण कश्मीर खोऱ्यातील अतिरेक्यांच्या बाबतीत तेही करता येत नाही. मुंबईतील 'एनसीबी'च्या धाडसत्रात भाजपचे कार्यकर्ते सामील झाल्याचं समोर आलं. ईडी, सीबीआय, आयटीसारख्या यंत्रणाही भाजपबरहुकूम चालत आहेत. या तपास यंत्रणांचा ताबा जणू भाजपने घेतला आहे. सध्या भाजप सर्वत्रच दिसतोय. फक्त कश्मीर खोऱ्यात निरपराध्यांच्या हत्या सुरू असताना केंद्र सरकार, भाजपचे अस्तित्व दिसत नाही', असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

'भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील 'रेव्ह' पाटर्यात, जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱ्यातही दिसावं. भाजपचे लोक नशेखोरांना अमली पदार्थांच्या साठ्यासह पकडून देतात, ईडीला कारवाया पुढे रेटण्यात मदत करतात. एवढेच नव्हे, तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 'शांत' करण्यासाठी 'खासगी आर्मी' उभारावी असे जाहीर सल्लेही त्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना देतात', अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

'हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीच मध्यंतरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 'जशास तसा' धडा शिकविण्यासाठी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात 'दंडा फोर्स' म्हणजे खासगी आर्मी उभारावी, असे म्हटले होते. तुमचा हा 'दंडा फोर्स' देशातल्या गरीब आणि न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात वापरण्यापेक्षा कश्मीरातील दहशतवाद्यांविरोधात वापरा. कश्मीर खोऱ्यात सध्या दहशतवाद्यांकडून निरपराध पंडित आणि शिखांच्या हत्या केल्या जात आहेत. तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे. त्यांची वाहव्वाच होईल!', अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे.

Related Stories

No stories found.