
कश्मीर खोऱ्यात दहशतवादी पुन्हा कश्मिरी पंडितांना निशाणा बनवू लागले आहेत. त्यामुळे कश्मिरी पंडितांमध्ये भीतीचं वातावरण असून, पलायन सुरू झालं आहे. यावरूनच शिवसेनेनं मोदी-शाहा यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्सवी राजा म्हणत शिवसेनेनं मोदींवर टीकास्त्र डागलं.
कश्मिरी पंडितांच्या हत्या, वाढलेले हल्ले आणि भाजप व सरकारचं मौन यावरून शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदी-शाह यांच्यावर टीका केलीये.
"भारतीय जनता पक्ष एक अजब रसायन आहे. ही मंडळी एरवी राष्ट्रीय किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरडी ताणून बोलत असतात, पण जेव्हा खरोखरच हिंदू संकटात येतो तेव्हा तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसलेले दिसतात. कश्मीर खोऱ्यांत हिंदू पंडितांच्या हत्यासत्रावर आणि पलायनावर भाजप व त्यांचे दिल्लीतील मालक तोंड दाबून बसले आहेत," असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
"आठ वर्षांत फक्त मोदी सरकारने देशाचे कसे नंदनवन केले याचे दाखले दिले जात आहेत. कश्मीरातील 370 कलम हटवले, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला, दहशतवादाचे कंबरडे मोडले वगैरे वगैरे सांगितले जात आहे, पण हे भजन-कीर्तन सुरू असताना कश्मीर खोऱ्यांत लागलेल्या आगीचे चटके या उत्सवी लोकांना बसू नयेत याचे आश्चर्य वाटते."
"कश्मिरी पंडित मारले जात आहेत. हिंदूंनी सामुदायिक पलायन सुरू केले आहे. कश्मीरच्या रस्त्यांवर उतरून पंडित मंडळी भाजपला शिव्याशाप देत आहेत. सत्तेचा आठवा वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी आता या पंडित मंडळींना देशद्रोही किंवा पाकड्यांचे हस्तक ठरवू नये म्हणजे झाले. पंडितांचा आक्रोश उत्सवी राजाच्या कानावर पोहोचलेला दिसत नाही," असं म्हणत शिवसेनेनं सरकारला डिवचलं आहे.
"सरकारने आता काय करावे? कश्मीर खोऱ्यांत घुसलेल्या पाकड्या दहशतवाद्यांचा बीमोड करण्याऐवजी 177 पंडित शिक्षकांच्या बदल्या म्हणे सुरक्षित ठिकाणी केल्या. हा तर ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ असाच प्रकार आहे. अशाने ‘टार्गेट किलिंग’ थांबण्यापेक्षा ‘सामुदायिक’ किलिंगचा मार्ग मोकळा होईल. शिक्षकांच्या हत्या सुरू आहेत म्हणून पंडित शिक्षकांना एकजात एकाच मुख्यालयात आणून सरकारने कोणते शौर्य गाजवले?"
"मोदी-शहा नामक जादूची छडी फिरताच कश्मीरातील अतिरेकी पळून जातील, पण उलटेच घडले. हिंदू जनताच कश्मीरमधून पळून जाताना दिसत आहे. मोदी-शहांच्या राज्यात कश्मीरातील हिंदूंना वाली कोण? त्यांचे रक्षण कोणी करायचे? मोदी व त्यांचे लोक ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘पृथ्वीराज’ अशा सिनेमांच्या प्रसिद्धीतच अडकून पडले आहेत. हे ‘चमचेगिरी’छाप चित्रपट लोकांना दाखवून त्यांची मने भडकवायची, देशात नवा धर्मवाद निर्माण करायचा व मतांचा बाजार जिंकायचा, पण त्यामुळे कश्मीरातील हिंदूंना आधार मिळाला का, तर अजिबात नाही," असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
"सर्जिकल स्ट्राइकचे बॉम्ब नक्की कोठे फुटले तेही रहस्यच आहे. 370 कलम हटवल्यानंतर कश्मीरात किती लोकांनी जमीन खरेदी केली? आम्ही तर म्हणतो, भाजप किंवा संघाने त्यांचे दुसरे मुख्यालय कश्मीर खोऱ्यांत हलवल्याशिवाय ‘‘कश्मीर हमारा है’’ यावर शिक्कामोर्तब होणार नाही. कश्मीरातून हिंदूंचे पलायन सुरू असताना एकतरी ‘माय का लाल’ पंडितांच्या मदतीसाठी पुढे आला आहे काय? ज्ञानवापी मशीद, ताजमहालखालचे शिवलिंग शोधणारे, गोवंशहत्येसाठी झुंडबळी घेणारे सर्व नवहिंदुत्ववादी कश्मीरातील हिंदूंच्या हत्या आंधळे, बहिरे बनून पाहत आहेत," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.