'महाविकास आघाडीमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकला', राऊतांनी गितेंना सुनावलं

Sanjay Raut answer to Shiv Sena leader Anant Geete: शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आता संजय राऊत यांनी त्यांना सुनावलं आहे.
'महाविकास आघाडीमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकला', राऊतांनी गितेंना सुनावलं
Sanjay Raut answer to Shiv Sena leader Anant Geete(फाइल फोटो)

नवी दिल्ली: 'शिवसेनेचा मुख्यमंत्री हा फक्त महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळेच झालेला आहे. तसंच हे शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते हे या सरकारमधील सहभागी असणाऱ्या पक्षातील प्रमुख नेते आहेत.' अशी म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंना सुनावलं आहे.

'राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय. त्यामुळे आपण त्यांच्या विचाराचे होऊ शकत नाही. दुसरा कुठलाही नेता मग त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत. त्याला कुणी जाणता राजा म्हणो.. कुणी आणखीन काय म्हणो, पण आमचा गुरू तो होऊ शकत नाही.' असं वक्तव्य करत शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका केली होती. त्यांच्या याच वक्तव्याबाबत संजय राऊतांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

अनंत गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने आता आपली अधिकृत भूमिका खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. 'महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकला. त्यामुळे याबाबत जर कुणी मत व्यक्त करत असेल तर ते त्याचं वैयक्तिक मत आहे.' असं संजय राऊत यांनी अनंत गीते यांना ठणकावून सांगितलं आहे. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत होते.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत हे सध्या राजधानी दिल्लीत असून तेथील पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जेव्हा त्यांना अनंत गीते यांच्या वक्तव्याविषयी विचारलं असता ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत संजय राऊतांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

'सध्या महाराष्ट्रात जी व्यवस्था आहे ती पाच वर्ष चालेल आणि या व्यवस्थेला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे.'

'मला गीतेंच्या वक्तव्याविषयी माहित नाही. उद्धव ठाकरे त्याविषयी निर्णय घेतील. ते पक्षाचे प्रमुख आहेत तेच याविषयी निर्णय घेतील. या क्षणी आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत आणि सरकार चांगल्या प्रकारे चालेललं आहे. राज्यात सध्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकला. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा सरकारशी काही संबंध नाही. सरकार उद्धव ठाकरे चालवतात. त्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख घटक आहेत.'

'शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे राज्यातील प्रमुख इतर पक्षांचे लोकं आहेत. याशिवाय अजित पवार असतील, अशोक चव्हाण असतील. हे सगळे सोबत आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे. तसंच चांगल्या प्रकारे समन्वय असल्यामुळे हे सरकार टिकलं आहे. आता दोन वर्ष झाली या सरकारला. त्यामुळे कोणाची काही मतं असतील ती व्यक्तिगत मतं असतील.' अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Sanjay Raut answer to Shiv Sena leader Anant Geete
राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय; शिवसेना नेत्याचा पवारांवर निशाणा

अनंत गीते नेमके काय म्हणाले होते?

'राज्यात आपलं सरकार आहे. आपलं सरकार कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी हे काय आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे ना की शिवसेनेचं? सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. आपल्याला गाव सांभाळायचं आहे.'

-'गाव सांभाळत असताना आघाडीचा विचार करायचा नाही. फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. आघाडीत तीन घटक आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही काँग्रेस काँग्रेसच. कधी एकमेकांचं तोंड बघत होते का? यांचं एकमेकांचं जमत का? यांची विचारांची सांगड बसतेय का? यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना कदापि होऊ शकत नाही. मूळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खूपसून झाला आहे. त्यामुळे आपण त्यांच्या विचाराचे होऊ शकत नाही.'

-'आज तुम्हाला आदेश देणार आहे. जरी राज्यात आघाडी सरकार असलं, तरी आम्ही आघाडी सैनिक नाही. शिवसैनिकच राहणार आहोत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. दुसरा कुठलाही नेता मग त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत. त्याला कुणी जाणता राजा म्हणो... कुणी आणखीन काय म्हणो, पण आमचा गुरू तो होऊ शकत नाही. आमचे गुरू फक्त बाळासाहेब ठाकरे!'

-'ही सत्तेची तडजोड. जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी काय? तुटावी असा मी काही शाप देत नाही. पण ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी आपल्याच घरी येणार ना? आपण शिवसेनेच्याच घरी येणार ना? बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या घरी येणार. मग आपलं घर टिकवायचं की नाही. आपलं घरं सांभाळायचं की नाही. आपलं घरं भक्कम करायचं की नाही.'

-'तुम्हाला आघाडीचा विचार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमचा गाव सांभाळायचा आहे. तुमची ग्रामपंचायत सांभाळायची आहे. तुमची जिल्हा परिषद सांभाळायची आहे. राज्यात काय करायचं ते नेते बघून घेतील. ते समर्थ आहेत बघायला. तुम्हाला मला चिंता करायचं कारण काय? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही.' असं अनंत गिते म्हणाले होते.

Related Stories

No stories found.