Chhagan Bhujbal यांच्याविरोधात शिवसेना आमदार सुहास कांदेंची कोर्टात धाव, केला गंभीर आरोप

जाणून घ्या नेमका काय आरोप केला आहे सुहास कांदे यांनी?
Chhagan Bhujbal यांच्याविरोधात शिवसेना आमदार सुहास कांदेंची कोर्टात धाव, केला गंभीर आरोप

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. एवढंच नाही तर छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

आमदार कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतली. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात ऐन बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता त्याचा पुढचा अंक थेट कोर्टात पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.

 सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात झाली होती खडाजंगी

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे 11 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी हा दौरा वादळी ठरला. कारण छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची जोरदार खडाजंगी झाली. तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणिआमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाल. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.

सुहास कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी सुहास कांदे यांनी दिली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असं सांगितलं होतं

विधानसभा निवडणुकीत आमदार कांदे यांनी नांदगाव मतदारसंघात पालकमंत्री भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव केला.त्यामुळे भुजबळ विरुद्ध कांदे यांच्यात नेहमी संघर्ष सुरू असतो. पंकज भुजबळ या मतदारसंघात पुन्हा सक्रिय झाल्याने वादाला अधिक फोडणी मिळाली आहे.

नुकतीच छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपातून मुक्तता झाली आहे. अशात आता सुहास कांदे हे त्यांच्या विरोधात कोर्टात गेले आहेत. त्यामुळे आता भुजबळांना पुन्हा न्यायालयीन लढाई लागणार आहे.

Related Stories

No stories found.