‘आझाद कश्मीर फाईल्स’ : "पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याची मोदी सरकारची तयारी आहे का?"

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा शिवसेनेकडून समाचार; "निर्वासित, बेघर, बेरोजगार पंडितांसाठी राजकीय अश्रू ढाळणाऱ्यांनी काय केले?"
 ‘आझाद कश्मीर फाईल्स’ : "पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याची मोदी सरकारची तयारी आहे का?"
(फाइल फोटो)

पाकव्याप्त कश्मीर भारतात आणण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प असल्याचं विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेत शिवसेनेनं मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. ‘आझाद कश्मीर फाईल्स’ चित्रपट तयार करून पाकव्याप्त कश्मीर स्वतंत्र होणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं द कश्मीर फाईल्सवरून मोदी सरकारला टोला लगावला.

सध्या द कश्मीर फाईल्स चित्रपटावरून राजकीय वादंग शिगेला पोहोचलं आहे. त्यातच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पाकव्याप्त कश्मीर भारतात आणण्याचा मोदींचा संकल्प असल्याचं विधान केलं. शिवसेनेनं या विधानावर सामना अग्रलेखातून भाष्य करताना सरकारला उलट सवाल केले.

शिवसेनेनं काय म्हटलं आहे?

"पाकव्याप्त कश्मीर ‘आझाद’ करण्याचा संकल्प मोदी सरकारने सोडला आहे. ज्याप्रमाणे कश्मीरातून 370 कलम रद्द केले, त्याचप्रमाणे पाकच्या ताब्यात गेलेला कश्मीरचा भूभाग परत आणण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारच्या या भव्य राष्ट्रीय संकल्पाबद्दल आम्ही सगळेच आनंदाने गदगदून गेलो आहोत व त्या सुवर्ण दिवसाची वाट पाहत आजपासूनच राहिलेले दिवस ढकलीत आहोत. जितेंद्र सिंह हे ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहून इतके भारावून गेले आहेत की, त्यांना आता काय करावे व करू नये असा भ्रम निर्माण झाला आहे."

"पाकच्या ताब्यातील कश्मीर परत यावा असे कोणत्या सच्च्या भारतीय नागरिकास वाटणार नाही? पुन्हा मोदी यांच्यासारखे बुलंद मनाचे व जिद्दीचे पंतप्रधान गादीवर विराजमान असल्याने पाकव्याप्त कश्मीर ‘आझाद’ करण्याचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल, याविषयी कुणाच्या मनात तीळमात्र शंका असण्याचे कारण नाही. कलम 370 रद्द होईल असे कुणाला वाटले होते काय? पण केंद्र सरकारने तो संकल्प पूर्ण केला. आता पुढचे पाऊल पाकव्याप्त कश्मीर आझाद करण्याचे, असे आपले केंद्रीय मंत्री सांगतात, त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे."

"पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेण्याआधी सरकारला कश्मीरातील बऱ्याच गोष्टी स्थिरस्थावर कराव्या लागतील. आपल्या कश्मीरात आजही अशांतता व तणाव आहे. 370 कलम हटवले हे खरे. पण त्यानंतर एकही नवा उद्योग कश्मीरात आला नाही, गुंतवणूक झाली नाही व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे कश्मीरातील तरुणांत असंतोष आहे. हजारो कश्मिरी पंडितांच्या ‘घर वापसी’चा संकल्प मोदी यांनी सात वर्षांपूर्वी सोडला होता. तो अपूर्णच आहे. आपल्या पंडितांना आपल्याच कश्मीरात स्थिरस्थावर करता आलेले नाही, तेव्हा पाकव्याप्त कश्मीरचे नवे प्रश्न कसे सोडविणार?"

"उरीः द सर्जिकल स्ट्राईक, ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटांचा प्रचार करून इथले खरे प्रश्न सोडविता येणार नाहीत. कश्मिरी पंडितांसाठी असलेल्या पुनर्वसन व घरकुल योजनाही मोदी सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. सात वर्षांत फक्त 17 टक्के कश्मिरी पंडितांना घरे मिळाली हे धक्कादायक आहे. अतिरेक्यांनी पंडितांचे बळी घेतले, पण निर्वासित, बेघर, बेरोजगार पंडितांसाठी राजकीय अश्रू ढाळणाऱ्यांनी काय केले? पंडितांच्या रक्त आणि अश्रूंचा राजकीय सौदाच केला. हजारो पंडित आजही निर्वासित छावण्यांतच राहत आहेत व भाजपचे सरकार दिल्लीत आले म्हणून त्यांच्या जीवनात फरक पडल्याचे दिसत नाही. पंडितांना घरे सहज देता आली असती. मोदी सरकारला अजून कश्मिरी पंडितांना घरे देता आलेली नाहीत, तेव्हा त्यांची सुरक्षित घर वापसी तर दूर की बात!"

"पाकव्याप्त कश्मीर घ्यायचे म्हणजे मोदी सरकारला पाकिस्तानशी थेट युद्ध करावे लागेल. सर्जिकल स्ट्राईकचे लवंगी फटाके फोडून पाकव्याप्त कश्मीर आपल्या ताब्यात येणार नाही. आपण अद्याप पाक तुरुंगातील कुलभूषण जाधव यांना सोडवू शकलेलो नाही. इकडे ऊठसूट ‘‘दाऊद दाऊद’’ असे करायचे, पण त्या दाऊदचा ताबाही आपल्याला मिळविता आलेला नाही. त्यामुळे पाकच्या ताब्यातील कश्मीर घेण्याचा संकल्प कसा पूर्ण होणार? आता रशिया-युक्रेन युद्धातही आपण पंडित नेहरूंचेच अलिप्तवादाचे धोरण स्वीकारून गप्प बसलो आहोत. त्यामुळे पाकव्याप्त कश्मीर आझाद करण्यासाठी पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याची तयारी मोदी सरकारची आहे काय?"

"पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊन अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करण्याचा मोदी सरकारचा संकल्प चांगलाच आहे, पण तो पूर्णत्वास कसा नेणार? ‘आझाद कश्मीर फाईल्स’ चित्रपट निर्माण करून व त्याबाबतचा प्रचार करून, त्या प्रचारावर निवडणुका जिंकून पाकव्याप्त कश्मीर ‘आझाद’ होणे शक्य नाही. कश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्याआधी सोडवावा लागेल. कश्मीरातील (आपल्या) बेरोजगारीचा प्रश्न कायमचा संपवावा लागेल. मुख्य म्हणजे सैन्याची तयारी करावीच लागेल. लडाखमध्ये घुसलेले चिनी सैन्य आपण अद्याप बाहेर काढू शकलेलो नाही. दहशतवाद जसा पाकिस्तानचा आहे, त्यापेक्षा जास्त चीनचा आहे. त्याचा विसर पडलेले लोक नवे संकल्प सोडत आहेत. कश्मिरी पंडितांचे व कश्मीरचे राजकारण थांबवून पुढचे पाऊल कधी टाकणार ते सांगा!"

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in