"ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पकडून 'कमळ' चिन्हावर उभं केलं पाहिजे"

पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचा भाजपवर टीकास्त्र : "फक्त मोदी नामाचा जप करून निवडणुका जिंकण्याचा काळ संपला"
"ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पकडून 'कमळ' चिन्हावर उभं केलं पाहिजे"
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत.Reuters

देशभरात लोकसभा आणि विविध राज्यातील विधानसभेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपची पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्रातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली, तर महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा उमेदवार संसदेत पोहोचला. नुकत्याच लागलेल्या पोटनिवडणुकांच्या निकालावरून शिवसेनेनं आता भाजपवर टीकेचे बाण डागले आहेत.

शिवसेनेनं नुकत्याच लागलेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा अनेक ठिकाणी पराभव झाला. पराभवांवर बोट ठेवत शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं आहे.

शिवसेनेनं अग्रलेखात काय म्हटलंय?

"ऐन दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले आहेत. हा शुभशकुन नाही. आपणच अजिंक्य आणि अजेय आहोत या त्यांच्या अहंकारासही पोटनिवडणुकांच्या निकालांनी तडा गेला आहे. तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल तेच सांगतात. लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसने मुसंडी मारलीच, पण दादरा-नगर हवेली या लोकसभा मतदारसंघात शिवसेना जोरदार विजयी झाली आहे."

"महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येण्याचा मान दादरा-नगर हवेलीच्या कलाबेन डेलकर यांना मिळाला आहे. मोहनभाई डेलकर हे दादरा-नगर हवेलीचे लोकनेते होते. सात वेळा ते याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. या संपूर्ण भागावर त्यांचा प्रभाव होता हे नक्कीच. ते हिंमतबाज लढवय्ये होते, पण केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या सनकी तानाशाही कार्यपद्धतीस विरोध करणाऱ्या डेलकरांना मानसिक ताणतणाव असह्य झाला व शेवटी मुंबईत येऊन त्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. सात वेळा निवडून आलेला एक खासदार प्रशासनाच्या हुकूमशाहीस कंटाळून आत्महत्या करतो ही देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी लाजिरवाणीच घटना होती."

"डेलकर यांच्या आत्महत्येनं फक्त दादरा-नगर हवेलीचीच जनता नव्हे, तर महाराष्ट्र-गुजरातला धक्का बसला. डेलकर कुटुंब त्या धक्क्यातून सावरेल काय? हा प्रश्न होताच, पण शेवटी शिवसेनेच्या आधारात डेलकर कुटुंब आणि तेथील जनता अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज झाली. त्याच लढ्याची पहिली ठिणगी म्हणून कलाबेन डेलकर यांच्या विजयाकडे पाहिले पाहिजे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची पहिली विजय पताका फडकली आहे व त्या विजय पताकांचे राष्ट्रीय तोरण झाल्याशिवाय राहणार नाही. हा विजय ऐतिहासिक आहे. मुंबईतील 'दादर' ते 'दादरा' असा हा शिवसेनेचा प्रवास दिल्ली दरवाजापर्यंत नक्कीच धडक देईल."

"दादरा-नगरच्या विजयाने शिवसेनेची, हिंदुत्ववाद्यांची,अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची दिवाळी अधिक तेजोमय झाली. शिवसेना महाराष्ट्राबाहेर काय दिवे लावणार? असे प्रश्न ज्यांना पडत होते त्यांनी शिवसेना विजयाचे हे तेजस्वी दीप पाहायलाच हवेत. दादरा-नगर हवेलीचा विकास व भयमुक्त प्रदेश या धोरणानेच शिवसेना तेथे काम करील. शिवसेना शब्दाला, वचनाला जागणारा पक्ष आहे याची प्रचिती डेलकर कुटुंबास आणि दादरा-हवेलीच्या जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. दादरा-नगर हवेलीचा विजय हा नुसता विजय नसून देशातील हुकूमशाही प्रवृत्तीस दे धक्का आहे. असे धक्के देशातील अनेक भागांत बसले आहेत."

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत.
'महाविकास आघाडी निवडणुकीला घाबरत नाही, भाजपचे 105 आमदार आता 40 वर येतील'

"देशभरातील पोटनिवडणुकांच्या निकालांत भाजपची पीछेहाट झाली आहे. प. बंगालमधील चारही जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या. तीन ठिकाणी भाजपला अनामत रक्कमही वाचवता आली नाही. तृणमूल काँग्रेसने प. बंगालातून भाजपला उखडून फेकले आहे. महाराष्ट्रातील नांदेडात देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतूनही भाजपचे ‘आयात’ उमेदवार साबणे यांचा अति दारुण पराभव झाला. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी लाखावर मते मिळवून भाजपच्या आयात उमेदवारास चारीमुंडय़ा चीत केले. भाजपकडे निवडणुका लढविण्यासाठी स्वतःचे उमेदवार नाहीत. इकडून तिकडून उधार-उसनवारी करून ते जितमय्याचा आव आणतात, पण जनता शेवटी त्यांना आपटतेच, हे देगलुरात दिसले."

"भाजपकडे आता त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते फारसे उरले नसून, यापुढे त्यांनी ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पकडून 'कमळ' चिन्हावर उभे केले पाहिजे, असे आता जागोजाग लोक चेष्टेने बोलू लागले असतील तर त्या अधःपतनास भाजप स्वतःच जबाबदार आहे. हिमाचल प्रदेशात भाजपची वाताहत झाली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघासह तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसने भाजपचा पराभव केला."

"महागाईने लोकांच्या घरातील चुली विझल्या आहेत व लोकांनी महागाईविरोधात मतदान केले, असे हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. याचा स्पष्ट अर्थ असा की, फक्त मोदी नामाचा जप करून निवडणुका जिंकण्याचा काळ संपला आहे. लोकांना भेडसावणारे प्रश्न निवडणुकांचे निकाल बदलतात. हिंदी पट्ट्यांत भाजपविरोधी वातावरण आहे हेसुद्धा दिसते. महाराष्ट्रातील भाजपवाले एक तुणतुणे कायम वाजवत असतात, मोदींमुळे शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. त्यांच्यासाठी दादरा-नगर हवेलीचा शिवसेना विजय सत्यकथन करतोय."

"गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता, पोस्टरवर त्यांचे चित्र न लावता शिवसेना जिंकली व देगलुरला 'मोदी मोदी' करूनही भाजपला माती खावी लागली. दिवाळीचे फटाके फुटू लागले आहेत. कुणाला दिवाळीनंतर बॉम्ब फोडायचे असतील तर ते फोडावेत. त्या बॉम्बमध्ये दारू शिल्लक आहे काय तेवढेच एकदा बघा. नाही तर हसे व्हायचे. दिवाळीचा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा असा विजय महाराष्ट्राने मिळवला आहे. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देश पातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र व जनतेची भरभराट होईल, हीच शुभेच्छा!"

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in