"अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच सांगावे लागेल"

पंतप्रधान नरेंद्र मोदी-पोप फ्रान्सिस भेट : शिवसेनेनं भाजपला काढला चिमटा
"अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच सांगावे लागेल"
रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची गळाभेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.PMO/Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीवेळी पोप फ्रान्सिस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या धर्मग्रंथ बायबल दिले. या भेटीवेळी मोदींनी बायबल मस्तकी लावले. त्यावरून शिवसेनेनं भाजपला चिमटा काढला आहे. 'कधी नवाज मियाँ तर कधी पोपसाहेब यांना भेटून मोदी हे स्वतःची प्रतिमा सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे असल्याचे सिद्ध करीत असतात', असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे.

शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदींच्या दौऱ्यांबद्दल आणि पोप फ्रान्सिस यांच्या भेटीबद्दल भाष्य केलं आहे.

'युरोप दौऱयावर असलेले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटण्यासाठी व्हॅटिकन सिटीत गेले. मोदी हे साधारण तासभर पोपसाहेबांच्या सहवासात होते. पोपसाहेबांनी मोदी यांना पवित्र धर्मग्रंथ बायबल दिला व मोदी यांनी अत्यंत श्रद्धेने बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदींनी दाखवलेल्या या श्रद्धेबद्दल अंधश्रद्धाळू भक्तांना काय म्हणायचे आहे? मोदी यांनी पोप यांना भारतात यायचे खास आमंत्रणही दिले. मोदी हे इटलीत गेले व अचानक पोप यांना भेटले. चारेक वर्षांपूर्वी मोदी हे विमान प्रवासात असताना अचानक इस्लामाबादेत उतरले होते व नवाज शरीफ यांना भेटायला गेले होते. कधी नवाज मियाँ तर कधी पोपसाहेब यांना भेटून मोदी हे स्वतःची प्रतिमा सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे असल्याचे सिद्ध करीत असतात', असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

'व्हॅटिकनची आर्थिक ताकद मोठी आहे. व्हॅटिकनची आर्थिक उलाढाल चार अब्ज युरो इतकी आहे. व्हॅटिकनची स्वतःची बँक आहे. त्या बँकेची उलाढाल आपल्या रिझर्व्ह बँकेच्या पन्नासपट आहे. जगातील सगळ्यात श्रीमंत धर्म म्हणून ख्रिश्चन धर्माचाच उल्लेख करावा लागेल. जगातील 55 टक्के संपत्तीचे मालक ख्रिश्चन धर्मीय आहेत. त्याखालोखाल 5.8 टक्के मुस्लीम, हिंदू 3.4 टक्के, ज्यू 1.2 टक्के असा क्रम लागतो. म्हणजे जगातील श्रीमंत धर्मगुरूंना भेटायला आपले पंतप्रधान गेले. मोदी व पोप यांच्यात म्हणे जगातील गरिबी निर्मूलन तसेच हवामान बदलावर चर्चा झाली. पोप यांच्या व्हॅटिकन सिटीतून सर्वसमावेशक लोकशाही आहे. येथील ख्रिश्चन समुदायाने राजकारण, चित्रपट, व्यवसाय, सशस्त्र सेना यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. भाजपने पोप तसेच ख्रिस्ती समुदायाविषयीचे हे विचार सदैव कायम ठेवावे, इतकीच जगाची अपेक्षा आहे', असं म्हणत शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे.

'पोप यांच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्म प्रसाराचे काम चालते, असे भाजप व त्यांच्या अंगीकृत संघटनांचे मत होते व आहे. हिंदुस्थानातील धर्मांतरांमागे मिशनरी आहेत असे आरोप भाजपच्या अंगीकृत संघटनांकडून होत असतात. भाजप व संघ परिवाराची पोप तसेच व्हॅटिकनविषयी अंतःस्थ मते काहीही असली तरी पंतप्रधान मोदी हे पोप यांना भेटल्यामुळे ही भेट क्रांतिकारक, ऐतिहासिक आणि जगाला दिशादर्शक वगैरे ठरलीच आहे. मोदी-पोप भेटीने गरिबी निर्मूलन होईलच व हवामान बदलाच्या समस्येवरही मार्ग निघेल. पोपसाहेबांनी मोदींचे निमंत्रण स्वीकारले व ते दिल्लीत येतील. 1999 साली तेव्हाचे पोप दिल्लीत अवतरले होते. तेव्हाच्या पोप यांना सोनिया गांधी भेटल्या म्हणून तत्कालीन भाजपने भलतेच काहूर माजवले होते, पण पंतप्रधान मोदी पोप यांना नुसतेच भेटले नाहीत तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली.'

'आपला हिंदू धर्म हेच तर शिकवितो. स्वधर्माचे संरक्षण तर आपण केलेच पाहिजे, पण परधर्माविषयीही आदरभाव ठेवला पाहिजे. अन्य धार्मिक ग्रंथ मस्तकी लावले पाहिजेत अशीच आपल्या धर्माची शिकवण आहे. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. देशात लोकशाही आहे. देश धर्मनिरपेक्ष आहे, असेच मोदींनी 'व्हॅटिकन'मधून जगाला कळवले. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता व शुद्धीकरण मोहिमा सुरू झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल!', असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in