"भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास ही गोष्ट शोभत नाही"

भाजपची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करत शिवसेनेचं डागलं टीकास्त्र : मोदी-शाहांवर साधला निशाणा
"भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास ही गोष्ट शोभत नाही"
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत.Reuter/indiaToday

चिनी सैन्याकडून झालेला घुसखोरीचा प्रयत्न, निष्फळ ठरललेली चर्चेची 13वी फेरी आणि काश्मिरात दहशतवाद्यांनी घातलेला धुमाकूळ या मुद्द्यांकडे लक्ष वेधत शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचे बाण डागले आहेत. अप्रत्यक्षपणे भाजपची तुलना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत करत शिवसेनेनं काही सवाल उपस्थित केले आहेत. 'आता निवडणुकांचा मोसम नसल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळही खेळता येत नाहीत', असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारला टोला लगावला आहे.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून होत असलेल्या हत्या आणि चीन सीमा या मुद्द्यांवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भूमिका मांडली आहे. 'भारताच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे.'

'कश्मीर खोऱ्यांत निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारले जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त चिंता वाढविणारे आहे. या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले? हा प्रश्नच आहे', असा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

'मोदींचे सरकार असताना कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरू व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही. दहशतवादाच्या भयाने कश्मीरात लोक थांबायला तयार नाहीत. आपली घरेदारे, जमीनजुमले मागे टाकून पळत आहेत. या सगळ्या लोकांचे दुःख पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे', असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत.
Sanjay Raut: गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर पिस्तुल रिकामे केले असते तर...: संजय राऊत

'एकाच वेळी पाच जवानांना कंठस्नान घातले जाते. निरपराध हिंदू पंडितांना, कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांना मारले जाते. त्याचा बदला घेतला नाही तर आपल्या भूमीवर सांडलेले रक्त आणि अश्रू वायाच गेले असे होऊ नये. इतर देशांत असे घडले असते तर त्या देशाने सैनिकांच्या हत्येचा बदला लगेच घेतला असता. आता निवडणुकांचा मोसम नसल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळही खेळता येत नाहीत', असा टोलाही शिवसेनेनं मोदी सरकारला लगावला आहे.

'देशात किसानही सुरक्षित नाही व जवानही बलिदानच देत आहेत. जे कश्मीरात तेच चीनच्या सीमेवर. पूर्व लडाखमध्ये घुसविलेले सैन्य माघारी घ्यायला चीन तयार नाही. दोन देशांतील चर्चेच्या 13 फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत, पण तोडगा निघायला तयार नाही. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने तळ ठोकून आहे. उत्तराखंडमधील बाराहोती क्षेत्रात, अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चीनने सरळ सरळ घुसखोरी केली आहे. यांगत्झे भागात दोन देशांचे जवान मागच्याच आठवड्यात समोरासमोर आले व गलवान व्हॅलीप्रमाणे रक्तपाताची पुनरावृत्ती होते की काय अशी स्थिती निर्माण झाली. हे प्रकार वाढले आहेत व चीन कोणताही करारमदार पाळायला तयार नाही', अशी शिवसेनेनं अग्रलेखातून व्यक्त केली आहे.

'चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. ते घुसखोरी करीत आहेत व आपण चर्चेच्या 'फेऱ्या' मोजत बसलो आहोत. पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची 'अलोकशाही' राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे.'

'भारताने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे', असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे भाजपची तुलना भारतावर राज्य केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे.

Related Stories

No stories found.