...हेच काँग्रेसमधील या 'म्हाताऱ्या अर्कां'ना खटकतंय; शिवसेनेच्या कानपिचक्या

इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर...; अमरिंदर सिंग यांच्यावर शिवसेनेचं टीकास्त्र
...हेच काँग्रेसमधील या 'म्हाताऱ्या अर्कां'ना खटकतंय; शिवसेनेच्या कानपिचक्या
काँग्रेसच्या अध्यक्षांना पत्र लिहिणारे जी २३ गटातील काँग्रेस नेते...India Today

विधानसभा निवडणुका तोंडावर येत असताना पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. या घडामोडींवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. काँग्रेस नेतृत्वाला सल्ला दिल्यानंतर आज शिवसेनेनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील भेटीबद्दलही शिवसेनेनं शंका उपस्थित केली आहे.

काँग्रेसमधील अस्वस्था आणि काँग्रेस नेतृत्वाबद्दल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं होतं. त्यानंतर आज कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

"आता मी काँग्रेसमध्ये थांबणार नाही व भाजपतही जाणार नाही, असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. कॅ. अमरिंदर हे भाजपत जाणार नाहीत, पण बाहेर राहून काँग्रेसचा घात करणार, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांनी ठरवलेलं दिसते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर अमरिंदर दिल्लीस आले. ''भाजप नेत्यांना तुम्ही भेटणार काय?'' या प्रश्नावर अमरिंदर म्हणाले, ''मी भाजप नेत्यांना भेटणार नाही. दिल्लीत माझ्या सामानाची आवराआवर करायला आलो आहे.'' पण लगेच दुसऱ्या दिवशी ते अमित शहांना भेटले. शेतकरी आंदोलन, सीमा सुरक्षा यावर आपण चर्चा केली, असं धादांत खोटे ते बोलतात', असा संताप शिवसेनेनं व्यक्त केला.

'हे विषय खरोखरच महत्त्वाचे असतील तर गृहमंत्र्यांनी पंजाबच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांशीच चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली? केंद्र सरकार हे नवे पायंडे पाडत आहे ते बरे नाही. काँग्रेसचे जे व्हायचे किंवा करायचे ते त्यांचे नेतृत्व करील, पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरटय़ा मारण्याचे उद्योग सुरू आहेत. पंजाबात सध्या जे घडवले जात आहे ते प. बंगाल, महाराष्ट्राच्या बाबतीतही घडविण्याचा प्रयत्न होतच असतो', असा दावा शिवसेनेनं केला आहे.

'पंजाबात काँग्रेस फुटली तशी प. बंगालात भाजप फुटला आहे. गोव्यातील भाजपत असंतोष खदखदत असून मायकल लोबोसारख्या भाजप मंत्र्यांना दिल्लीत बोलावून त्यांची मनधरणी करावी लागली. नाराजी ही सर्वच पक्षांत असते. फक्त वरचे नेतृत्व किती प्रबळ आहे यावर 'पळवापळवी'चे माप ठरलेले असते. इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर कॅ. अमरिंदर यांची असे काही करण्याची हिंमत झालीच नसती', असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

'आज मोदी व शहांच्या हाती सत्ता आहे म्हणून मूठ घट्ट आहे. उद्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले, तर त्याचे पडसाद भाजपमध्येही उमटायला वेळ लागणार नाही. प. बंगाल विधानसभा निवडणूक निकालाने अनेकांचे नाक चांगलेच कापले गेले, हे विसरता येणार नाही. ममता बॅनर्जींच्या विजयानंतर दिल्लीच्या राजकारणात काही काळ सन्नाटाच पसरला होता व इतरांचे ढोल वाजत होते. त्यामुळे पंजाबातील घडामोडी या अंतिम नव्हेत, राजकारणात सोय आणि स्वार्थ यावर कोणतीही मात्रा निर्माण झालेली नाही. पुन्हा मतलब साधणारे लोक सर्वत्रच आहेत', असं शिवसेनेनं सुनावलं आहे.

'काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पदे भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱ्या म्हातार महामंडळाने 'जी-23' नावाचा गट स्थापन केला व ते काँग्रेसची अंतर्गत भांडणे चव्हाट्यावर आणत आहेत. राहुल गांधींनी देशातील 'जनतेचा आवाज' बनू नये, असाही या म्हातार महामंडळाचा आग्रह असतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राहुल यांची तोफ केंद्र सरकारच्या विरोधात सतत धडधडतच असते. मीडियावरूनही मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. बहुधा हेच काँग्रेसमधील या 'म्हाताऱ्या अर्कां'ना खटकत आहे. त्यामुळेच राहुल यांच्या समोरील अडचणी कशा वाढतच राहतील असा त्यांचा आटापिटा सुरू असतो. हा सगळा खटाटोप राहुल गांधी यांनी आपला सल्ला ऐकावा, पक्षात, सत्तेत जी काही नवी पदे निर्माण होतील ती पुन्हा आपल्यालाच मिळावीत यासाठी सुरू आहे', असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

'अमरिंदर यांच्या निमित्ताने या म्हातार मंडळाने उचल खाल्ली. राहुल गांधी यांनी जसे या म्हातार महामंडळाच्या झांशात येऊ नये तसे नवज्योत सिद्धूसारख्या येडबंबूच्या नादालाही लागू नये. काँग्रेस पक्षात जुने भरवशाचे लोक म्हातारचळ लागल्याप्रमाणे वागत आहेत, तर सिद्धूसारख्या लोकांचे चित्त ठिकाणावर नाही. पंजाबातील काँग्रेसचा उरलासुरला पायाही हे येडबंबू खतम करतील. पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. पंजाबातील अशांतता व असंतोषामुळे देशाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. हजारो लोकांचे रक्त त्यात सांडले. भिंद्रनवाले प्रकरण हा काळा अध्याय होता. ते सर्व पर्व संपवून पंजाबने नवा अध्याय सुरू केला. पंजाबात पुन्हा राजकीय अशांतता निर्माण झाली तर अतिरेकी प्रवृत्ती डोके वर काढतील, याचे भान केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठेवण्यातच देशाचे हित आहे.'

'कॅ. अमरिंदर येतील व जातील. त्यांनी सत्तेची सर्व सुखे काँग्रेस पक्षातच भोगली आहेत. आता भोगायला उरले नाही तरीही खुर्चीचा मोह सुटत नाही. भाजप अशा अमरिंदर सिंगांना मांडीवर बसवून काय मिळवणार? केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंजाबच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना डावलून काँग्रेसने दूर केलेल्या व आमदारांचा पाठिंबा गमावलेल्या अमरिंदर सिंग यांच्याशी सीमा सुरक्षेबाबत चर्चा करणे बरोबर नाही. देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, पण अमरिंदर आता जी चिंता व्यक्त करीत आहेत त्याप्रमाणे पंजाबच्या सीमेवर काय घडले आहे? लडाख, कश्मीर सीमेप्रमाणे त्या सीमेवरही कोणी घुसखोरी करू लागले आहे काय? कुठे चीन तर कुठे पाकिस्तान रोज घुसखोरी करीत आहे, पण मुख्यमंत्रीपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली. देशाच्या गृहमंत्र्यांनाही त्याबद्दल जी बहुमोल माहिती मिळाली ती देशाला समजेल काय? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानेच अमरिंदर यांच्याप्रमाणेच आम्हालाही चिंता वाटते!', असा टोला शिवसेनेनं अमित शाह आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांना लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in