‘…तर तुमचे पंचप्राण कंठाशी येतील’; ‘घराणेशाही’वरून शिवसेनेचे थेट नरेंद्र मोदींना उलट सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. पंतप्रधानांनी लालकिल्ल्यावरून केलेल्या भाषणात भ्रष्टाचार आणि घराणेशाही या दोन मुद्द्यांचाही उल्लेख केला. यातील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आता थेट नरेंद्र मोदींवरच पलटवार केलाय. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदींना काही उलटसवालही केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. विशेषतः पंतप्रधान मोदींनी उपस्थित केलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर शिवसेनेनं पंतप्रधान मोदींनाच काही प्रश्न विचारले आहेत.

नरेंद्र मोदींच्या लालकिल्ल्यावरील भाषणावर शिवसेनेनं काय म्हटलंय?

शिवसेनेनं म्हटलं आहे की, “पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार व घराणेशाहीवर घणाघात केला, पण गेली नऊ वर्षे आपलेच राज्य आहे! आपण आपल्या उद्योजक मित्रपरिवाराचे 10 लाख कोटींचे बँक कर्ज माफ केले. यास नक्की काय म्हणावे? इकडे तुमचे ‘ईडी-पिडी’ राजकीय विरोधकांना चवली-पावलीच्या व्यवहारांत पकडून तुरुंगात डांबत आहेत. मग हे कर्जमाफीचे काय प्रकरण आहे?”, असा सवाल शिवसेनेनं मोदींना केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Aditya Thackeray: खरे मुख्यमंत्री कोण? तेच कळत नाही.. तुम्हीच सांगा म्हणत उडवली खिल्ली

घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची मोदींवर टीका

“कोण कोणाच्या बाजूने आहे यावर तुमच्या राष्ट्रभक्तीच्या व भ्रष्टाचाराच्या व्याख्या ठरणार असतील तर हा देश अंधाराच्या खोल गर्तेत ढकलला जात आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून घराणेशाहीवर हल्लाबोल झाला, पण घराणेशाहीपेक्षा एक-दोन लोकांची एकाधिकारशाही अधिक घातक ठरते. सध्या तेच घडत आहे. देशावर व महाराष्ट्रावर अशाच टोळ्यांचे राज्य आणून स्वातंत्र्य व लोकशाहीला बटिक बनवले गेले. कोणत्या घराणेशाहीची बात आपण करता?”, अशा शब्दात शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.

ADVERTISEMENT

ठाकरेंच्या घराणेशाहीवर तुमच्या सत्तेचा डोलारा उभा होता -शिवसेना

एनडीएतील प्रादेशिक पक्षांच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. “ठाकऱ्यांच्या घराणेशाहीवर कालपर्यंत तुमच्या सत्तेचा डोलारा उभा होता. ओडिशात नवीन पटनायक, आंध्रात जगन मोहन रेड्डी आणि कालपर्यंत बिहारचे पासवान, अशा अनेक घराणेशाह्यांनी तुमच्या सत्तेच्या तंबूस टेकू दिले व तुम्ही घेतले, पण सध्याच्या केंद्र सरकारला विस्मृतीचा झटका आला आहे. अगदी महाराष्ट्रात विखे-पाटलांची घराणेशाही सध्या महसुलाची आमसुले चोखत बसली आहेच. बाकी यादी द्यायचीच तर ती लांबतच जाईल व तुमचेच पंचप्राण कंठाशी येतील”, अशा शब्दात शिवसेनेनं मोदींवर पलटवार केला आहे.

ADVERTISEMENT

“मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू, इंदिरा गांधी अशी स्वातंत्र्यसमरातील घराणेशाही तुमच्याकडे असेल तर दाखवा. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे अशी महाराष्ट्र स्वाभिमानाची तरी घराणेशाही तुम्ही दाखवू शकता काय?”, असा सवाल शिवसेनेनं मोदींना केला आहे.

Amol Mitkari : “मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का? त्याचीच आधी चौकशी करा”

राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस -शिवसेना

“लोकांना देशभक्तीच्या नावाखाली रस्त्यावर भिकाऱ्यासारखे उभे करायचे. एकीकडे अग्निवीर अग्निवीर म्हणून बेरोजगार तरुणांना राष्ट्रसेवक वगैरे म्हणायचे आणि दुसरीकडे ते भरतीसाठी आले की, त्यांचा अपमान करायचा. उपाशी-तापाशी लोकांना ‘वंदे मातरम्’चे नारे द्यायला लावायचे. हे धंदे बंद करा. बेकायदेशीर, घटनाद्रोही कृत्यांची लाज बाळगा. जिथे तिरंगा फडकवायचा तिथे हातभर शेपटा घालून आपल्या मोहल्ल्यांत तिरंगा यात्रा काढायच्या हे ढोंग आहे. राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे”, अशा शब्दात शिवसेनेनं सरकारच्या धोरणावर टीकास्त्र डागलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT