२४ तासात शहाजीबापूंचा यु-टर्न, म्हणाले मरेपर्यंत मी शिवसेनेतच राहणार!

मी केलेलं वक्तव्य बबनराव शिंदेंच्या अनुषंगाने - शहाजीबापूंचं स्पष्टीकरण
२४ तासात शहाजीबापूंचा यु-टर्न, म्हणाले मरेपर्यंत मी शिवसेनेतच राहणार!

घर की मुर्गी डाळ बराबर आणि भाजपच्या पाठींब्याने आमदार झालो असं म्हणत भर कार्यक्रमात आपली खदखद व्यक्त करणाऱ्या शिवसेना आमदार शहाजीबापू पाटलांनी २४ तासात यु-टर्न घेतला आहे. मी अजिबात नाराज नाही. आमदार बबनराव शिंदेंना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी केलेलं वक्तव्य माझ्या नावावर चिकटवण्यात आल्याचं सांगत शहाजीबापूंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

प्रसारमाध्यमांमध्ये शहाजीबापूंच्या वक्तव्याची दखल घेतल्यानंतर लगेचच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. "बाळासाहेबांची अंत्ययात्रा पाहून मी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस नेत्यांशी कसलाही वाद नसताना मी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत आलो. घर की कोंबडी डाळ बराबर हे वाक्य मी बबनराव शिंदेंच्या अनुषंगाने बोललो होतो. ते ३० वर्ष आमदार आहेत, त्यांना मंत्रीपदासाठी संधी मिळायला हवी होती असं मी म्हणालो. परंतू हे वक्तव्य माझ्या नावाने चिटकवण्यात आलं."

भाजपच्या पाठींब्यावर आमदार झाल्याच्या वक्तव्यावरही शहाजीबापू पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप यांची युती होती. त्यावेळी कुठे भाजप उमेदवाराला शिवसेनेने मदत केली तर कुठे शिवसेना उमेदवाराला भाजपने मदत केली. या ओघात मी बोलून गेलो, परंतू मरेपर्यंत मी शिवसैनीक म्हणून काम करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात २४० कोटींची कामं मजूर केली आहेत. माझी निष्ठा ही कायम उद्धव ठाकरेंसोबत असेल असं म्हणत शहाजीबापूंनी आपली बाजू मांडली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in