'देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक चरोटाही अंगावर मारून न घेणारे वीर सावरकरांना माफीवीर ठरवत आहेत'

शिवसेना खासदार संजय राऊत यांची रोखठोकमधून भाजवर टीका
'देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक चरोटाही अंगावर मारून न घेणारे वीर सावरकरांना माफीवीर ठरवत आहेत'

वीर सावरकर यांना खलनायक ठरवण्यामागे एक नियोजित कट आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामनातील रोखठोक या सदरातून केलं आहे. काही दिवसांपूर्वीच राजनाथ सिंह यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की वीर सावरकरांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून माफी मागितली होती. या वक्तव्यावरून बराच वादंग झाला होता. दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या वक्तव्याचा समाचार घेत महात्मा गांधी आणि वीर सावरकर यांची नावं घेण्याची कुणाचीही लायकी नाही असं म्हणत खडे बोल सुनावले होते. आता संजय राऊत यांनीही राजनाथ सिंह यांच्या त्या वक्तव्यावर परखड भाष्य केलं आहे.

'देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक चरोटाही अंगावर मारून न घेणारे वीर सावरकरांना माफीवीर ठरवत आहेत'
'मला वाटत नाही की महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत' वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांचं वक्तव्य

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

'स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक ठरवण्याचे प्रयत्न सतत सुरूच राहिले आहेत. गुलाम हिंदुस्थानचे नायक असलेले सावरकर स्वतंत्र हिंदुस्थानचे खलनायक ठरवण्यामागचे एक नियोजित कट होता. त्या कटाच्या कारवाया आजही सुरूच आहेत. वीर सावरकरांनी माफी मागितली आणि सुटले असे म्हणणे चुकीचे आहे. सावरकर शेवटपर्यंत ब्रिटिशांना खेळवत होते आणि हे ब्रिटिशांनी ओळखले होते.'

'विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारांचे मुकुटमणी होते. स्वातंत्र्यापूर्वी त्यांना परकियांनी छळले आणि आज स्वकिय त्यांचा छळ करत आहेत. वीर सावरकरांचे उत्तुंग क्रांतिकार्य, देशासाठी केलेला त्यांचा त्याग विसरून काही लोक सावरकरांचा उल्लेख माफी मागून सुटलेला वीर अशी संभावना करत आहेत. हा एक कट आहे. वीर सावरकरांच्या माफीबाबत ज्या दंतकथा आहेत त्या अर्ध्याअधुऱ्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नुकतेच एका भाषणात सांगितलं की गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफी मागितली. यावरून वाद निर्माण झाले आणि वीर सावरकर यांच्या चारित्र्यहननाचे नवीन उद्योग सुरू झाले. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अंगावर एक चरोटाही मारून घेतला नाही, असे लोक सावरकरांचा उल्लेख माफीवीर म्हणून करत आहेत.'

'वीर सावरकरांसारख्या क्रांतिकारांनी ब्रिटीश साम्राज्यशाही विरोधात क्रांतिकारांची एक फौज निर्माण केली. 1980 च्या सुमारास भारतातील काही मान्यवर फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी राष्ट्रीय स्मारके आणि संग्राहालयं पाहात असताना फ्रेंच अधिकाऱ्याबरोबर चर्चा करत होते. गप्पांचा ओघ भारत आणि वीर सावरकर यांच्याकडे वळला. एक फ्रेंच अभ्यासक अधिकारी म्हणाला की वीर सावरकर जर फ्रान्समध्ये जन्माला आले असते तर आणि त्यांनी तुमच्या स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे फ्रान्सने संघर्ष केला तर वीर सावरकरांना स्वातंत्र्यानंतर लगेच देशाचं राष्ट्राध्यक्षपद दिलं असतं. वीर सावरकर यांच्याविषयीचा हा आदर जगभरातील इतिहासकारांना आहे त्यांनी वीर सावरकरांचा त्याग, शौर्य आणि क्रांती पाहिली आहे. ते माफीपत्राची चिटोरी चिवडत बसले नाहीत.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in