"रामनवमी-हनुमान जयंतीला दंगली घडवण्यात आल्या कारण..." संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या...
"रामनवमी-हनुमान जयंतीला दंगली घडवण्यात आल्या कारण..." संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप
शिवसेना खासदार संजय राऊत फोटो सौजन्य-ट्विटर

रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन्ही दिवशी देशात काही राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता भाजपवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत आता संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत.

काय म्हणाले संजय राऊत?

"सध्या देशात असं वातावरण आहे की भाजपच्या ट्रॅपमध्ये मीडिया अडकतोय. १० राज्यांमध्ये दंगली झाल्या त्यावर कुणीही काहीही का बोलत नाही? रामनवमी आणि हनुमान जयंतीला दंगली ऐकल्या आहेत का? यावर्षी त्या झाल्या. कारण या सगळ्यांना देशातलं वातावरण बिघडावयचं आहे. देशात महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. इतर अनेक समस्या आहेत. त्याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ नयेत म्हणून धर्म नावाची अफूची गोळी दिली जाते आहे." असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत
भाड्याने हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, संजय राऊत यांना राज ठाकरेंना टोला

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर आणि त्याआधीही हिंदुत्वाच्या मुद्दा आम्ही घेतला होता. पण आम्ही विकासाचंही राजकारण केलं. हिंदुत्व ही आमची संस्कृती आणि विचारधारा आहे. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत पण कधीही बिगर हिंदूंचा निषेध आम्ही करत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे आजचं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या मनात ते कायमच होतं. बाळासाहेबांनी मराठीचा मुद्दा उचलून धरला होता तरीही हिंदुत्वाचा कोपराही त्यांच्या मनात कायम होता. शिवसेनेने मागच्या ३५ वर्षांपासून हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही. पण धार्मिक विद्वेष आम्ही निर्माण केला नाही. ज्या पद्धतीने आज मुस्लिमांना टार्गेट केलं जातं आहे ते आम्ही केलं नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत
भाजपसाठी राज ठाकरे महाराष्ट्राचे ओवेसी-संजय राऊत

राज ठाकरेंबाबत काय म्हणाले संजय राऊत?

राज ठाकरेंनी भोंग्यावरून अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्यावर पर्याय काढून, मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन सरकारकडून भोंग्याचा मुद्दा संपवण्याचा प्रयत्न होतो आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, "भोंग्यांचा मुद्दा फार गंभीर नाही. महाराष्ट्रात तर मुळीच नाही. मशिदीवरचे भोंगे आणि रस्त्यावरचे नमाज हा शिवसेनेने काढलेला विषय होता. बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे याविरोधात भूमिका घेतली होती. आमची सत्ता आली तर नमाज बंद करू असं वचन बाळासाहेब ठाकरेंनी दिलं होतं. त्यांनी आकांडतांडव केलं नाही. त्यांनी मुस्लिम नेत्यांना बोलावलं आणि पर्याय काय असू शकतात विचारले. मुस्लिम नेत्यांचं म्हणणं हे होतं की मशिदी लहान असल्याने आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. मशिदीच्या जागा वाढवण्यासाठी एफएसआय वाढवून देण्याची मागणी केली. ती मागणी मुख्यमंत्र्यांना सांगून पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रस्त्यावरचे नमाज बंद करण्यात आले.

राज ठाकरे आज तीच भूमिका घेत आहेत हा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, "राज ठाकरे नक्कल करत आहेत. आम्ही ओरिजनल आहोत.. तुम्ही त्यांची आणि आमची तुलना करू नका. जे आहे ते आहे. आम्ही कुणाचा पाठलाग करत नाही. आम्ही दुसऱ्याने तयार केलेल्या मार्गावरून चालत हा आमचा रस्ता असं सांगत नाही. भोंग्यांचा विषय महत्त्वाचा नाही. आता शिवतीर्थावरही सभा होत असत. डेसिबलचा मुद्दा तेव्हाही समोर आला होता. आमच्यावर गुन्हे दाखल झाले होता. धार्मिक विषय नाही हे राज ठाकरेही म्हणत आहेत. पण याबाबत गृहमंत्री काय तो निर्णय घेतील."

Related Stories

No stories found.