तुमचाही नेत्यानाहू होईल; पंतप्रधान मोदींना शिवसेनेचा (UBT) गर्भित इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav thackeray-pm modi
Uddhav thackeray-pm modi
social share
google news

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीतील शासकीय निवासस्थानही रिकामे करण्यास सांगण्यात आले. राहुल गांधींविरुद्ध करण्यात आलेल्या या कार्यवाहीवरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली आहे. “नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास मोदी सरकारने इतक्या निर्घृण-खुनशी पद्धतीने बेघर करावे हे हिंदुत्वाच्या संस्कार आणि संस्कृतीस शोभणारे नाही”, अशा शब्दात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदींना लक्ष्य केलं आहे.

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखात म्हटले आहे की, “पाकिस्तानात ज्या निर्घृण पद्धतीने राज्य चालविले जाते तीच निर्घृण पद्धत मोदी राज्यात हिंदुस्थानात सुरू झाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याची पूर्ण तयारी झाली आहे, त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवले जात आहे. हे असे सूडाचे निर्घृण राजकारण पाकिस्तानसारख्या देशात परंपरेने चालूच असते. राजकीय विरोधक हा जन्मजन्मांतरीचा शत्रू असल्याचे मानून त्यास खतम केले जाते, पण हिंदुस्थानही पाकिस्तानचाच मार्ग स्वीकारणार असेल तर कसे व्हायचे?”, असा सवाल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपस्थित केला आहे.

दिल्लीत कोरोनाचं सावट, महाराष्ट्रात वाढला मृतांचा आकडा!

“एका मानहानी खटल्यात राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी रद्द व्हावी म्हणून त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली व आता लगेच चोवीस तासांत सरकारने गांधी यांना दिल्लीतील निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावली आहे. एखाद्यात अतिआत्मविश्वास असू शकतो, पण हा इतका अतिनिर्घृणपणा एखाद्याच्या अंगात संचारतो कसा, हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे. इंग्रजांचे जुलमी सरकार भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वीर सावरकर अशा क्रांतिकारकांशी ज्या निर्घृण पद्धतीने वागले, त्याच निर्घृण रीतीने मोदींचे सरकार आपल्या राजकीय विरोधकांशी वागत आहे”, अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारवर हल्ला चढवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“राहुल गांधी यांची खासदारकी तर घालवून दाखविलीच, पण आता त्यांच्या डोक्यावरचे छप्परही काढून घेतले. हा आसुरी आनंद ज्यांना आज झाला आहे, त्यांना भविष्यात कर्माची फळे भोगावी लागतील हे नक्कीच. इतक्या खुनशीपणाने आपल्या देशात कदाचित मोगलांनीही राज्य केले नसावे. आज संपूर्ण दिल्लीतील अनेक सरकारी बंगल्यांवर भाजप व संघ परिवाराचा अवैध कब्जा आहे. निवृत्त होऊन, पराभूत होऊन कधीच ‘माजी’ झालेल्या भाजप खासदारांनी त्यांचे बंगले सोडले नाहीत.

डॉ. एकनाथ शिंदे : 3 वर्षांपूर्वी पदवीधर अन् आता थेट डी. लीट, नेमकी कशी मिळाली पदवी?

हिंदुत्त्वाच्या संस्काराला शोभणारे नाही, शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब) मोदी सरकारवर टीकेची तोफ

शिवसेनेने म्हटलं आहे की, “पंडित नेहरू व त्याआधी मोतीलाल नेहरू यांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान अतुलनीय आहे. प्रयागराजमधील (आधीचे अलाहाबाद) नेहरू कुटुंबाची ‘आनंद भवन’ ही भव्य वास्तू स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थानच होते. ही वास्तू नेहरूंनी राष्ट्राला समर्पित केली. या वास्तूचे आजचे मूल्य साधारण दोन हजार कोटी इतके आहे याची नोंद घ्यावीच लागेल. पंडित नेहरूंनी त्यांच्या पुस्तकांतून मिळविलेले लाखो रुपयांचे उत्पन्नही सामाजिक कार्यास बहाल केले. 1965 च्या युद्धानंतर इंदिरा गांधींनी आपले सर्व दागिने सैनिक कल्याण निधीस दान केले. अशा नेहरू-गांधी कुटुंबातील तरुण नेत्यास मोदी सरकारने इतक्या निर्घृण-खुनशी पद्धतीने बेघर करावे हे हिंदुत्वाच्या संस्कार आणि संस्कृतीस शोभणारे नाही.”

ADVERTISEMENT

“गौतम अदानी यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मदतीने देश लुटला हे आता उघड झाले आहे. त्यांच्या कोणत्याही संपत्तीवर जप्ती आली नाही. राहुल गांधी यांनी ज्या सर्व ‘मोदीं’चा नामोल्लेख करून त्यांच्या चौर्यकथांचा पर्दाफाश केला त्यांचीही घरे-बंगले शाबूत आहेत, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी यांची खासदारकी व घरही आता काढून घेण्यात आले. देशाची लोकशाही किती कठीण कालखंडातून जात आहे त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. अदानी यांनी एलआयसी, स्टेट बँकेचे पैसे उडवलेच, पण कष्टकऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजे कर्मचारी भविष्य निधीचे पैसेही मोदी सरकारने अदानी यांच्या खात्यात वळवून हाहाकार माजवला आहे. हा जनतेचा पैसा आहे. या लुटीच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांचा छळ केला जात आहे”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा मोदींना अडाणींच्या मुद्द्यांवरून लक्ष्य केले आहे.

ADVERTISEMENT

नागपूर : 1 कोटींच्या लाचेची मागणी; MIDC चा टेक्नीशियन लाचलुचपतच्या जाळ्यात, आमदाराचही नाव

अदानी-मोदी संबंधांची चौकशी कधी करणार ते सांगा?; शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सवाल

“मुंबई महानगरपालिकेतील कारभाराची चौकशी करू असे सांगितले गेले, पण अदानी-मोदी संबंधांची चौकशी कधी करणार ते सांगा? उलट आता राहुल गांधी यांच्याच मागे ससेमिरा लावला. देशात अभूतपूर्व अशी अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी किंवा घर काढून घेतले हा तर प्रश्न आहेच, पण त्याचवेळी देशात लोकशाहीचा जो खूनखराबा सुरू आहे तो चिंतेचा विषय आहे. अर्थात हिंदुस्थान म्हणजे पाकिस्तान नाही व पाकिस्तानप्रमाणे येथे विरोधकांना बेगुमानपणे चिरडता येणार नाही”, असा इशारा सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.

“इस्रायलप्रमाणे येथील जनतादेखील लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. इस्रायलच्या जनतेने संपूर्ण देशात एक आदर्श निर्माण केला. जेव्हा एक हुकूमशहा लोकशाहीला उखडून फेकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतो, न्यायालये खिशात ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात व मोदींचे मित्र, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना पळून जावे लागते. उद्या कदाचित हेच नेत्यानाहू आपले मित्र मोदी यांच्याकडे राजकीय आश्रय मागतील व मोदी त्यांना दिल्लीतील एखादा बंगला बहाल करून कर्तव्यास जागतील, पण राहुल गांधींना मात्र बेघर करतील, नव्हे केलेच आहे. इस्रायल देशात जे घडते आहे, त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा. नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल! देश त्याच दिशेने निघाला आहे”, असा गर्भित इशारा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT