
मुंबई: 'राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकमध्ये जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. तर आपण काय राष्ट्रपतींचाही राजीनामा मागणार आहात का? हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे.' असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. त्याच मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. तसंच भाजप ढोंगी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
'इथले भाजपचे जे लोकं आहेत त्यांना असं वाटतं की, फक्त त्यांनाच इतिहासाची माहिती आहे. आम्हाला इतिहासाचं काहीच ज्ञान नाही. हे जे नवा इतिहास लिहायला बसलेत ना इतिहासाचार्य ते संपूर्ण इतिहास बदलण्यासाठी बसले आहेत. आम्हाला माहिती आहे टिपू सुलतान. आम्हाला माहिती आहे की, टिपूने काय-काय केलं आहे. कसं धर्मांतर केलं आहे, काय केलंए ते कसे अत्याचार केलाय, कशी लढाई केली. हे सगळं माहिती आहे. हे आम्हाला भाजपकडून शिकण्याची गरज नाही.'
'महाराष्ट्रात जर ते लोकं बोलत असतील की, जर टिपूचं नाव दिलं असेल तर आम्ही हे करु ते करु. इथलं सरकार समर्थ आहे इथले निर्णय घेण्यास. आपण नवा इतिहास नका लिहू. जो दिल्लीत इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे तो सुरु ठेवा. इथे नको..'
'राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकमध्ये जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. टिपू सुलतान हा ऐतिहासिक योद्धा आहे, एक स्वातंत्र्यसेनानी आहे टिपू सुलतान. तर आपण काय राष्ट्रपतींचाही राजीनामा मागणार आहात का? हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे. हे ढोंग आहे. ही एक नौटंकी आहे. आम्हाला माहिती आहे की, या महाराष्ट्रातील सरकार, बीएमसी याबाबत निर्णय घेण्यासाठी खूप सक्षम आहे.'
'जे दंगल करण्याच्या बाता करत आहेत त्यांनी दंगल करुन दाखवावी. इथे ठाकरे सरकार आहे. हिंमत असेल तर दंगल करुन दाखवाच. सोशल मीडियावरील जी माध्यमं आहेत त्यांच्यावर नक्कीच सरकारचा दबाव आहे.' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे:
मुंबईतल्या मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा वाद समोर आला होता. संकुलाच्या बाहेर भाजप आणि बजरंग दलाने घोषणाबाजी करत आंदोलन केलं होतं. भाजप आणि बजरंग दलाकडून या नावला विरोध केला जात आहे.
देशात एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखेही लोक होऊन गेलेत त्यांचं नाव द्या. पण टिपू सुलतानचं नाही. अशी मागणीही आंदोलन करणाऱ्यांनी केली आहे.
मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख काय म्हणाले?
'शेर ए मैसूर टिपू सुलतान हे नाव भाजपच्या नगरसेवकाने दिलं होतं. त्यानंतर 2013 मध्येही भाजपच्या नगरसेवकाने वीर टिपू सुलतान मार्ग असं एका रस्त्याचं नामकरण केल्याचंही मी ऐकलं आहे. आता ज्या ग्राऊंडवरून वाद होतो आहे ते मागच्या पंधरा वर्षांपासून टिपू सुलतान नावानेच ओळखलं जातं. आता त्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट तयार केलं, फुटबॉल ग्राऊंड तयार केलं, इतर सोयी सुविधा केल्या. ही माझी कामं लोकांपर्यंत पोहचू नयेत म्हणून भाजपकडून वाद निर्माण केला जातो आहे.'
'टिपू सुलतानने इंग्रजांच्या विरोधात लढाई केली होती. गेल्या 70 वर्षात कधीही या नावावरून वाद झाला नाही. सगळ्या राज्यांमध्ये रोड, म्युझियम यांना नावं देण्यात आली. मात्र तेव्हा काही वाद झाला नाही. आता भाजपला विकास नको आहे. त्यामुळे ते नावाचं राजकारण करत आहेत.' असा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे.
भाजपचा आरोप काय?
'अस्लम शेख हे अनधिकृत बांधकाम करत आहेत. त्यांनी मालवणी परिसराचं पाकिस्तान केलं आहे. ते हिंदूंना या परिसरातून हाकलून लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.' असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.
यावेळी बजरंग दल आणि भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांच्या या आंदोलनाचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता. आंदोलकांनी बस थांबवत चाकातील हवा देखील काढून टाकली होती. तसेच या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लावलेले बॅनर आणि फलक आंदोलकांनी फाडून टाकले होते. या आंदोलनामुळे या संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.