"मातोश्रीवर हल्ला करायचा होता, मग कळलं असतं"; राष्ट्रवादीच्या आमदारांचं विधान

परिवहन मंत्रालय अनिल परबांकडे, पवारांचा याच्याशी संबंध नाही; राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय - मोहिते पाटलांची टीका
"मातोश्रीवर हल्ला करायचा होता, मग कळलं असतं"; राष्ट्रवादीच्या आमदारांचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ल्याचा प्रयत्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. एसटी कामगारांनी केलेल्या या हल्ल्याची माहिती पोलिसांना नसल्यामुळे राजकीय नेत्यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज दिवसभर राज्यभरात या घटनेविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आलं.

पुणे जिल्ह्यातील खेडचे राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहीते-पाटील यांनी मतदारसंघात आंदोलनादरम्यान बोलत असताना, एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून हल्ला करायचा होता तर मातोश्रीवर करायचा असं वक्तव्य केलं आहे.

"हा प्रश्न राज्याचा होता. तुम्हाला मोर्चा काढायचा होता-हल्ला करायचा होता तर मातोश्रीवर करायचा होता. मग तुम्हाला कळलं असतं की त्याची काय किंमत भोगावी लागते ते. आतापर्यंत राज्यात जेवढी आंदोलन झाली त्याचा शेवट बारामतीत किंवा मग पवार साहेब जिथे कुठे असतील तिकडे व्हायचा. राज्याचं परिवहन खातं अनिल परबांकडे आहे. जे काही करायचं होतं ते त्या संबंधित व्यक्तीपाशी करायचं होतं. या विषयाचा पवार साहेबांशी तसा काहीही संबंध नाही. त्यामुळे या आंदोलनामागे एक विशिष्ठ हेतू असल्याचं वाटतंय".

हे सरकार चालवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करण्याची भूमिका घेतली जात आहे. सुडबुद्धीने कारवाई केली जातेय. राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. मंत्रीमंडळात काहीही निर्णय झाला तरीही मुख्यमंत्र्यांना तो बदलण्याचा अधिकार आहे. त्यांनी जर एसटी कर्मचाऱ्यांबद्दल काही निर्णय घेतला असता तर आम्हाला काहीही प्रॉब्लेम नव्हता. परंतू जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्यासाठी हे प्रकार केले जात असल्याचं दिलीप मोहीते पाटलांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in