"...तर भाजपा त्यांना 'पीएम केअर फंडा'तून आजन्म पगार देणार आहेत का?"

"हे दहशत, ब्लॅकमेल व वैफल्याचे हे राजकारण" : एसटी कामगारांच्या संपावरुन शिवसेनेचा भाजपावर हल्ला
"...तर भाजपा त्यांना 'पीएम केअर फंडा'तून आजन्म पगार देणार आहेत का?"
आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर.Gopichand Padalkar/twitter

राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार आणि सरकारमध्ये चर्चा सुरू असून, अद्यापही त्यावर तोडगा निघालेला आहे. त्यातच भाजपाकडून ठाकरे सरकार टीकेचे बाण डागले जात असून, आता शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपाला लक्ष्य केलं आहे. "12 आमदारांच्या मंजुरीची फाईल ज्या प्रकारे भाजपने तुंबवून ठेवली त्याच पद्धतीने एस.टी. कर्मचाऱ्यांचा संपही अडकवून ठेवला आहे. दहशत, ब्लॅकमेल व वैफल्याचे हे राजकारण आहे", अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

शिवसेनेनं अग्रलेखात काय म्हटलंय?

"एस.टी. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर चर्चा वगैरे होऊन इतरही प्रश्न भविष्यात मार्गी लागतील. तरीही भारतीय जनता पक्षातले लोक संपास चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. साताऱ्यात एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. सातारा आगारातून एस.टी. बस बाहेर काढणाऱ्या चालकांना भाजपा समर्थकांनी हाणामारी केली. अशा घटना आता अन्य ठिकाणी घडू लागल्या आहेत. हे भाजपचे वैफल्य म्हणायला हवे", अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

"मुंबईतील आझाद मैदानावर एस.टी. कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या ठिय्या आंदोलनात भाजपाचे नेते घुसतात व शेवटपर्यंत लढण्याच्या गर्जना करून आपापल्या घरी आरामात झोपतात. कर्मचारी मात्र तेथे मच्छर, दगडधोंड्यांच्या सहवासात बसून आहेत. त्या ठिय्या आंदोलनात भाजपानेही सात-आठ दिवस पथारी पसरलीय असे दिसत नाही. म्हणजे 'लड़ने को तुम और भाषण को हम' असेच त्यांचे चालले आहे", अशा शब्दात शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे.

"एस.टी. महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही, असे सरकार सांगत आहे तेव्हा त्यास कायदेशीर आधार आहे. भारतीय जनता पक्ष या विषयावर कामगारांची डोकी भडकवून काय साध्य करणार आहे? कामगारांचा संप मोडावा किंवा फुटावा असे सरकारचे धोरण दिसत नाही, पण चर्चेतून मार्ग निघावा हेच सगळ्यांचं म्हणणं आहे. अशा आडमुठ्या धोरणांमुळे मुंबईतील अडीच लाख गिरणी कामगार देशोधडीस लागला हे वास्तव आहे. सध्याच्या कठीण काळात नोकरी टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे आहे", असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

"कामगार उद्ध्वस्त झाला तरी चालेल, त्यांच्या चुली कायमच्या विझल्या तरी चालतील, पण आमचे पुढारीपण टिकले पाहिजे. एसटीतील संपकरी कामगारांच्या खांद्यावर बंदुका ठेवून सरकारवर गोळीबार करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी भाजपाला त्याचा लाभ मिळणार नाही. एसटीतील रोजंदारीवरील 2,296 कर्मचाऱ्यांना प्रशासनाने 'कारणे दाखवा' नोटिसा पाठवल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या तर भाजपा 'पीएम केअर फंडा'तून त्यांना आजन्म पगार देणार आहे काय?", असं म्हणत शिवसेनेनं टीकेचा बाण डागला.

"एसटीत 93 हजार कर्मचारी आहेत. 15 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. ही संख्या हळूहळू वाढत जाईल. काही कामगारांनी यादरम्यान मरणास कवटाळले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कामगार मृत्यूप्रकरणी राज्याच्या परिवहन मंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 'सरकार किती निष्पाप एस.टी. कर्मचाऱ्यांचे बळी घेणार?' असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी विचारला आहे. हाच 'समान नियम किंवा कायदा' मानायचे ठरवले तर दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्यात वर्षभरात पाचशेहून जास्त शेतकऱ्यांनी बलिदान केले. त्याबद्दल नक्की कोणाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हेसुद्धा आता जनतेला कळू द्या", असा सवाल शिवसेनेनं भाजपाला केला आहे.

"एस.टी. कामगार हे शेतकऱ्यांचीच मुले आहेत व त्यांची चिंता ठाकरे सरकारला आहे. एस.टी. कामगारांच्या आंदोलनावर तोडगा काढायचा म्हणजे नक्की काय करायचे? भाजपापुरस्कृत एक शिष्टमंडळ याप्रश्नी महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटले. एस.टी. कामगारांच्या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याची तक्रार केली. अशा तक्रारी करण्यापेक्षा विरोधी पक्षाने कर्मचाऱ्यांचे हित कशात आहे ते पाहायला हवे. कर्मचाऱ्यांची कुंटुंबे, त्यांची मुले, त्यांचे संसार याची फिकीर करावी. सरकार एस. टी. कर्मचाऱ्यांची फिकीर करीत असल्याने आतापर्यंत संयमाने पावले टाकण्यात आली. एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणे तूर्तास शक्य नाही हे विरोधी पक्षालाही पक्के माहीत आहे. कामगारांनीही हे सत्य स्वीकारले आहे, पण भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी झाली. 12 आमदारांच्या मंजुरीची फाईल ज्या प्रकारे भाजपने तुंबवून ठेवली त्याच पद्धतीने एस.टी. कर्मचाऱ्यांचा संपही अडकवून ठेवला आहे. दहशत, ब्लॅकमेल व वैफल्याचे हे राजकारण आहे. त्यात एस.टी. कर्मचाऱ्यांनी स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, एवढीच अपेक्षा!", असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in