
IAS Tina Dabi Marriage: IAS टॉपर टीना डाबी ही पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार आहे. टीना ही राजस्थान केडरचे अधिकारी आणि 2013 च्या बॅचचे IAS प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न करणार आहे. टीनाने इंस्टाग्रामवर प्रदीप यांच्या सोबतचा स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतलेला आहे. टीनाचे पहिले लग्न 2018 साली IAS अतहर खानसोबत झाले होते आणि 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.
टीना डाबी मूळची मध्यप्रदेशची असून 2015 च्या यूपीएससी परीक्षेत ती देशात प्रथम आली होती. तर काश्मीरचा रहिवासी अतहर आमिर खान याने याच वेळी परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला होता. काही काळासाठी, दोघेही राजस्थान केडरचे अधिकार होते. परंतु टीनापासून घटस्फोट घेतल्यानंतर अतहर जम्मू -काश्मीर केडर घेऊन आपल्या राज्यात परतला आहे.
सध्या टीना ही राजस्थानमध्ये वित्त सहसचिव म्हणून कार्यरत आहे. तर अतहर श्रीनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
अतहर आणि टीनाची भेट कशी झालेली?
टीना आणि अतहरची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे. आयएएस प्रशिक्षणादरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले. अतहर भलेही यूपीएससीच्या शर्यतीत टीनापेक्षा मागे पडला असेल, पण त्याने टीनाच्या हृदयात आपली जागा पक्की केली होती.
टीनासोबत अतहरची पहिली भेट 2016 साली लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी फॉर अॅडमिनिस्ट्रेशन मसुरी येथे एका सन्मान सोहळ्यादरम्यान झाली होती. यादरम्यान दोघांचे प्रशिक्षण सुरू होते. सकाळी दोघे भेटले आणि संध्याकाळी अतहर पुन्हा भेटायला आला आणि इथून दोघांच्या भेटीची प्रक्रिया सुरू झाली. एका मुलाखतीत टीनाने सांगितले होते की, ती अतहरच्या बुद्धिमत्तेने आणि व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाली होती आणि पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडली होती.
काही महिन्यांनी टीनाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे अतहरसोबतचे तिचे नाते सार्वजनिक केले. दोघांना घरच्यांचा पाठिंबा मिळाला असला तरी वेगवेगळ्या धर्मामुळे त्यांना खूप टीकेलाही सामोरे जावे लागले. अखिल भारतीय हिंदू महासभेने त्यांच्या नात्याला विरोध करत याला 'लव्ह जिहाद' म्हटले होते. मात्र, याचा दोघांच्या नात्यावर काहीही परिणाम झाला नव्हता.
एका मुलाखतीत टीना डाबी म्हणाली होती की, 'केवळ पाच टक्के लोक त्यांच्या नात्याच्या विरोधात होते. पण बहुतेक लोक आनंदी होते. सोशल मीडियावर लोक त्यांचे अभिनंदन करत होते. लोकांचे प्रेम आणि पाठिंबा पाहून मलाही खूप आनंद झाला.' अखेर 7 एप्रिल 2018 रोजी दोघांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये लग्न केले होते. हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होते. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि बड्या व्यक्तींनी यावेळी हजेरी लावली होती. लग्नाच्या वेळी दोघेही जयपूरमध्ये तैनात होते.
कधी झाला घटस्फोट?
टीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या नावामध्ये असलेलं 'खान' हे आडनाव काढून टाकल्यानंतर त्यांच्या नात्यात दरी निर्माण झालं असल्याचं पहिल्यांदा लक्षात आलं होतं. यानंतर अतहरनेही देखील टीनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते. याआधी दोघे जिथे-जिथे एकत्र फिरण्यासाठी जात होते तिथले फोटो शेअर करायचे.
पण नात्यात दुरावा निर्माण झाल्याने टीनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अतहरसोबतचे तिचे सर्व फोटो काढून टाकले होते. अखेरीस, या जोडप्याने नोव्हेंबर 2020 मध्ये परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 10 ऑगस्ट 2021 रोजी दोघांचा घटस्फोट झाला.