बीड : कोरोनामुळे ८० वर्षांची परंपरा खंडीत, जावयाची गाढवावरुन निघणारी मिरवणूक यंदा रद्द

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये विविध परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहेत. अशीच एक परंपरा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात गेल्या ८० वर्षांपासून सुरु होती. गेल्या ८० वर्षांपासून धुळवडीच्या दिवशी जायवाची गाढवावर बसवून गळ्याच चप्पलांचा हार घालून वाजत-गाजत मिरवणूक काढली जायची. मात्र यंदा कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मिरवणूक काढल्यानंतर जावयाला आहेर म्हणून पेहराव आणि सोन्याची अंगठी मिळते, मात्र यंदा जावयांना याला मुकावं लागणार आहे.

विडा गावातली ही परंपरा पारतंत्र काळापासून सुरु आहे. तत्कालीन ठाकूर आनंद देशमुख यांचे जावयाला गावकऱ्यांथी थट्टा मस्करीत गाढवावर बसवलं होतं, यानंतर सुरु झालेली ही परंपरा आजतागायत सुरु होती. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावाने ही परंपरा खंडीत झाली आहे. गाठवावर बसून जावयाची मिरवणूक काढताना पाहण्यासाठी या गावात मराठवाड्यातील अनेक लोकं यायचे. महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा गाढवावर बसून मिरवणुकीचा मान मिळालेल्या जावयाला पुन्हा हा मान मिळत नाही. जावई कोणत्याही जाती-धर्माचा असो त्याबाबतीत गावकरी भेदभाव करत नाहीत.

हे वाचलं का?

प्रत्येक वर्षी जावयाचा शोध घेण्यासाठी दहा जणांची टीम तयार केली जाते. धुळवडीच्या दोन-तीन दिवस आधी गाढवावर कोण बसणार हे ठरवलं जातं. अनेकदा गावकऱ्यांना जावई मिळतही नाही अशावेळी लोकवर्गणीमधून गाडी करुन शेजारच्या गावात जावयाचा शोध घेतला जातो. आतापर्यंत अहमदनगर, माजलगाव, आंबाजोगाई, दिंद्रुड, सिरसाळा अशा ठिकाणांवरुन जावई शोधून आणत त्यांना गाठवावर बसवून मिरवणूकीचा मान देण्यात आल्याचं सरपंच सुरज पटाईत यांनी सांगितलं.

धुळवडीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसवून गाढवाच्या गळ्यात चप्पल बुटांचा हार घालून त्यावरून जावयाला गावभर मिरवले जाते. गाढवाची मिरवणूक गावातील मंदिराच्या पारावर येऊन थांबवल्यानंतर तेथे जावयाला मनपसंत कपड्यांचा आहेर आणि सासऱ्याकडून सोन्याची अंगठी दिली जाते. जर एखादा सासरा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर काही वाटा ग्रामपंचायत लोकसहभागातून उचलते. चप्पलांचा हार आणि गाढव मिरवणूक असल्याने कधी कधी जावयाचा विरोधही होतो अश्या वेळी गावकरी संयम बाळगून लगेच दुसरा जावई शोधतात. मात्र यावर्षी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे विडा गावातील सर्वच सार्वजनिक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे त्यामुळे धुळवडीच्या दिवशी होणारा हा कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला आहे. ही ८० वर्षांतील पहिलीच वेळ आहे. यामुळे यावर्षी हौशी जावायाला आहेर आणि सोन्याच्या अंगठीला मुकावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT