साताऱ्याची लेक भारतीय नौदलातून करणार देशसेवा, सबलेफ्टनंट पदावर झाली निवड

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला देशसेवेचं मोठं वरदान लाभलेलं आहे. या जिल्ह्यातले अनेक तरुण देशसेवेचं स्वप्न मनाशी बाळगून तयारी करत असतात. कला, क्रीडा, संस्कृती असा ऐतिहासीक वारसा असलेल्या या जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या एका मुलीने गरुडझेप घेत देशसेवेचा वारसा आपल्या खांद्यावर घेण्याचं ठरवलं आहे. वाई तालुक्यातल्या स्नेहांजली ननावरे या तरुणीची भारतीय नौदलात सबलेफ्टनंट पदावर निवड झाली आहे.

ADVERTISEMENT

स्नेहांजली राजेंद्र आणि आरती ननावरे यांची कन्या, ननावरे कुटुंब हे वाईत छोटोसा गृहउद्योग चालवतं. २१० रुपयांपासून सुरु झालेला त्यांचा हा व्यवसाय आता चांगलाच स्थिरावला आहे. आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या चिकाटीच्या गुणाने स्नेहांजलीने ही झेप घेतल्याचं बोललं जातंय.

स्नेहांजली ही स्वतः आर्चरीची खेळाडू आहे. स्नेहांजली चौथीत असताना तिच्या वडीलांनी तिला एका उन्हाळी शिबीरात टाकलं होतं. या शिबीरात स्नेहांजलीला आर्चरीची गोडी लागली, यानंतर दहावीपर्यंत स्नेहांजलीने सातत्याने आर्चरीचं ट्रेनिंग घेत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. आर्चरीचा सराव सुरु असतानाच स्नेहांजलीने १० वीत IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं.

हे वाचलं का?

११ वी आणि १२ वीचं वर्ष पुण्यात आर्चरीच्या ट्रेनिंगसाठी गेल्यानंतर स्नेहांजलीने वाईत येऊन इंग्लिश या विषयात आपलं बी.ए. चं शिक्षण पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना स्नेहांजलीने सर्व परीक्षा उत्तम मार्कांनी पास केल्या. याचदरम्यान तिने इंग्लिश विषयात M.A. ही पूर्ण केलं. स्नेहांजली ही फक्त अभ्यासातच नाही तर कविता, जिमनॅस्टीक, क्रिकेट, अभिनय अशा क्षेत्राचीही आवड ठेवते. भारतीय नौदलात भरतीसाठी जाहीरात निघाल्यानंकतर स्नेहांजलीने या परीक्षेत बाजी मारत आपलं ध्येय साध्य केलं. सब लेफ्टनंद पदासाठी निवडण्यात आलेली ती सातारा जिल्ह्यातली पहिली मुलगी ठरली आहे.

स्नेहांजलीच्या आई-वडिलांनी तिला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. आर्चरीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी किटची आवश्यकता असताना तिच्या आईने आपलं मंगळसूत्र गहाण ठेवत मुलीसाठी बहात्तर हजाराचं किट आणलं. आपल्या आईने आणि वडिलांनी घेतलेल्या प्रत्येक कष्टाचं स्नेहांजलीने सोनं करुन दाखवलं आहे. नौदलात झालेल्या निवडीनंतर ननावरे कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. आपल्या मुलीचं होणारं कौतुक पाहून स्नेहांजलीच्या आई-बाबांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. सध्या स्नेहांजली आपल्या पुढील प्रशिक्षणासाठी केरळ येथे रुजु झाल्या आहेत. हे ट्रेनिंग पार पडल्यानंतर पुढे प्रत्येक पातळीवर स्नेहांजली आपल्या आई-वडिलांचं आणि सातारा जिल्ह्याचं नाव मोठं करेल अशी सर्वांना आशा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT