अहमदनगर : छिंदम बंधूंना अटक, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे चर्चेत आलेल्या अहमदनगरचे माजी उप-महापौर श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन महिन्यांपूर्वी टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ गेल्याप्रकरणी श्रीपाद आणि श्रीकांत छिंदम यांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

छिंदम बंधूंवर टपरी चालकाची टपरी जेसीबीने पाडून त्याची जागा बळकावल्याचा आरोप आहे. हा गुन्हा घडल्यापासून जामीन मिळावा या प्रयत्नात ते फरार होते. अखेरीस तोफखाना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे. काल रात्री छिंदम बंधू नगर शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्या इतर साथीदारांना शोध सुरु असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.

पूर्वी शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने श्रीपाद छिंदम वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. या गुन्ह्यात त्याला अटक झाली, त्याचे नगरसेवक पद गेले. तो दुसऱ्यांदा निवडून आला, तेही पद रद्द करण्यात आले आहे. त्याच्या मूळ गुन्ह्याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.

हे वाचलं का?

त्यानंतर जुलै २०२१ महिन्यात त्याच्याविरूद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला. श्रीपाद छिंदमचा भाऊ आणि इतर तीस ते चाळीस जणांविरुद्ध दिल्लीगेट येथील येथे ज्युसचे दुकान चालविणारे भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीपाद शंकर छिंदम, श्रीकांत शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे (सर्व रा. तोफखाना) व इतर ३० ते ४० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९ जुलै रोजी दुपारी हे सर्व आरोपी दिल्लीगेट येथे आले. भागीरथ बोडखे त्यांच्या ज्यूस सेंटरमध्ये काम करत होते. श्रीकांत व श्रीपाद छिंदम यांच्यासह जमावाने जेसीबी व क्रेन घेऊन तेथे आले होते. त्यांनी बोडखे यांना शिवीगाळ केली. ज्यूस सेंटरमधील सामानांची फेकाफेक केली. श्रीपाद याने ही जागा आपण घेतली असून ती माझ्या ताब्यात दे, असे म्हणून सामानाची फेकाफेक सुरू केली. धमकी दिली आणि जातीवाचक शिवीगाळही केली. टपरीमधील सामान फेकून देत गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. आरोपींनी बोडखे यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून बाजूला केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. आता या गुन्ह्यात दोघा छिंदम बंधुंना अटक झाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT