Valentines Day : ‘प्रिय राजीवजी, माझं आजही तुमच्यावर प्रेम..’ प्रज्ञा सातव यांची भावूक पोस्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या साथीदारासोबत घालवतात आणि प्रेम व्यक्त करतात. याच व्हॅलेंटाईन डे निमित्त काँग्रेसच्या खासदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस खासदार डॉ. राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. गेल्यावर्षी करोनामुळे १६ मे रोजी पुण्यात राजीव सातव यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच व्हॅलेंटाईन डे असून प्रज्ञा सातव यांनी राजीव सातव यांच्याबद्दलचं प्रेम त्यांच्या ट्विटमधून व्यक्त केलंय.

ADVERTISEMENT

काय आहे प्रज्ञा सातव यांची पोस्ट?

प्रज्ञा सातव यांनी लिहिलंय की, ‘प्रिय राजीव जी, या व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही जिथे कुठेही असाल तरी मला तुम्हाला सांगायचे आहे की, मी कालही तुमच्यावर प्रेम करत होते. आजही मी तुमच्यावर प्रेम करते आणि मी उद्याही तुमच्यावर प्रेम करेन. मी कायम तुमच्यावर प्रेम करत राहीन.’ यासोबत त्यांनी तीन रेड हार्ट इमोजी टाकले आहेत.

हे वाचलं का?

या ट्विटमध्ये प्रज्ञा सातव यांनी पती राजीव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान, राजीव आणि प्रज्ञा यांचं 2002 मध्ये लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं देखील आहेत. 19 वर्षांच्या संसारानंतर गेल्यावर्षी राजीव सातव यांचं करोनाने निधन झालं आणि या दोघांची ताटातूट झाली. आज प्रेमाच्या दिवशी प्रज्ञा सातव यांनी आपल्या पतीबद्दल प्रेम व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं 16 मे रोजी कोरोनामुळे निधन झालं. कोरोना संसर्गानंतर राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र 16 मे 2021 ला पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

ADVERTISEMENT

राजीव सातव यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे मिळाले होते. त्यांच्या आई रजनीताई सातव या स्वत: राज्य मंत्रिमंडळात मंत्री होत्या. दरम्यान, 1999 साली राजीव सातव हे आपली आई रजनीताई सातव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होते. मात्र, नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आपलं एक स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत हिंगोली मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे अशी राजीव सातव यांची काँग्रेसमध्ये ओळख होती. 2014 साली हिंगोलीचे खासदार म्हणून राजीव सातव हे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. आता आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी भावनिक पोस्ट केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT