लतादीदींसाठी दुवा मागितल्यावर शाहरुख खान थुंकला की फुंकला? काय आहे व्हायरल व्हीडिओमागचं सत्य?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे अवघा देश शोकाकुल झाला. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत अनेक दिग्गज आले होते. तसंच सिनेसृष्टीतील शाहरुख खान, आमिर खान, जावेद अख्तर यांच्यासह इतर मान्यवरही आले होते. शाहरुख खान लतादीदींच्या पार्थिवाला अभिवादन करत होता तेव्हा तो त्यांच्यासाठी दुवा मागत होता. त्याच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददालानी होती ती नमस्कार करत होती. या दोघांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. मात्र त्यानंतर आणखी एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत शाहरुख खान मास्क काढून काहीतरी करताना दिसतो आहे.

ADVERTISEMENT

भाजपचे हरयाणाचे नेते अरूण यादव यांनी हा व्हीडिओ क्या इसने थुका है? म्हणत ट्विट केला आणि त्यानंतर सुरू झाली ती चर्चा. व्हीडिओ तुफान व्हायरल झाला. शाहरुख खान हा दुवा मागताना थुंकला की फुंकला यावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

अनेकांनी शाहरुख खान पार्थिवावर थुंकला आहे असा आरोपही करून टाकला आहे. तर अनेकांनी शाहरुख खान हा थुंकला नाही तर त्याने फुंकर घातली असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर हे विविध दावे करण्यात येत आहेत. आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत की त्या व्हायरल व्हीडिओमागचं सत्य नेमकं काय आहे?

हे वाचलं का?

मुंबई तकने शाहरुख खानच्या कृतीबाबत ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल कादर मुकादम यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे सांगितलं की, ‘लता मंगेशकर यांच्या पार्थिवाजवळ शाहरुख गेला. त्याने दुवा मागितली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळूदे म्हणून ही दुवा त्याने मागितली. त्याचप्रमाणे त्याने या कृतीनंतर फुंकर घातली. दुवा ही नमाजच्या नंतर मागितली जाते. ती स्वतःसाठी नसते तर आपल्याला जे प्रिय आणि जवळचे असतात त्यांच्यासाठी ही दुवा मागितली जाते. लता मंगेशकर या सगळ्यांनाच प्रिय होत्या. शाहरुख खानने त्यांच्यासाठी दुवा मागितली हे खूप चांगलंच केलं.

ADVERTISEMENT

त्यानंतर त्याने केलेली कृतीही महत्त्वाची आहे. मृत्यू हा अटळ असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मृत्यू येतो. आपणही त्याच वाटेने जाणार आहोत याचा संकेत म्हणून शाहरुखने हातावर फुंकर घातली. मुस्लिम धर्मात आपल्या प्रियजनांसाठी असं करण्याचा रिवाज आहे.’ त्यामुळे शाहरुख खानने काहीही चुकीचं केलेलं नाही असं अब्दुल कादर मुकादम यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

एकीकडे या व्हायरल व्हीडिओवरून शाहरुख खानला ट्रोल केलं जातं आहे. सोशल मीडियावर वाद निर्माण केला जातो आहे. अशात आम्ही यामागची खरी बाजू मुंबई तकच्या वाचकांसमोर आणली आहे. अब्दुल कादिर मुकादम यांच्यासह इस्लाम धर्माचा अभ्यास असलेल्या अनेकांनीही हा दुवा मागण्याचाच एक प्रकार आहे. शाहरुख खान थुंकला नाही तर फुंकला आहे. त्याने फुंकर घालून आपणही त्याच वाटेने जाणार आहोत हे वास्तव मान्य केलं आहे.

‘हाच भारत आहे अन् असाच राहू द्या’; शाहरूख खानने जिंकली मनं

दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही ट्विटरवरुन शाहरुखचा दुवा वाचताना फोटो ट्विट करत, ‘फिरंगी लोक शाहरुखवर सध्या खोटे आरोप करत तो लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीदरम्यान थुंकल्याचा दावा करतायत. अशा लोकांना लाज वाटली पाहिजे. त्याने प्रार्थना करुन पार्थिवावर फुंकर मारली. असं केल्याने पार्थिव सुरक्षित रहावं आणि पुढील प्रवासासाठी त्याच्यासोबत सकारात्मक ऊर्जा राहते, असं मानलं जातं. आपल्या देशामध्ये अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वृत्तीला अजिबात स्थान नाही.’ असं म्हटलं आहे.

शाहरुखचं दुवा मागितली म्हणून कौतुकही होतं आहे

एकीकडे हा वाद सुरू असताना बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकली. शिवाजी पार्कवर जाऊन शाहरूख खानने लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळचा शाहरुख खानचा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी शाहरुख खानचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं. काही जणांनी लता मंगेशकरांसोबतचे जुने फोटोही सोशल मीडियावर शेअर करत हेच भारताचं वैशिष्ट्य असल्याचं म्हटलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनीही शाहरुखला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले खडे बोल

शाहरुखला या प्रकारावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधानांकडून काहीतरी शिकायला हवे होते, असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. याला थुंकणे म्हणतात का? असे ट्विट करत एका युजरने शाहरुखचा फोटो पोस्ट केला आहे. त्याला उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर दिले आहे.

याला थुंकणे नाही, फुंकणे म्हणतात. या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात. पंतप्रधानांचा फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे होते. भारत मातेच्या मुलीचे गाणे ऐका ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान.’ आजचा दिवस तरी सोडायचा होता असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी शाहरुखला ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT