Lockdown ची घोषणा, 20 लाख कोटींचं पॅकेज; दीड वर्षात नरेंद्र मोदींनी किती वेळा देशाला केलं संबोधित?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. आपल्या भाषणातून ते काय संदेश देणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या भाषणाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र याआधी म्हणजेच 2020 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा देशाला संबोधित केलं आहे. आपण आता या बातमीद्वारे हे जाणून घेणार आहोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. आपल्या भाषणातून ते काय संदेश देणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्या भाषणाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र याआधी म्हणजेच 2020 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा देशाला संबोधित केलं आहे. आपण आता या बातमीद्वारे हे जाणून घेणार आहोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कोरोना काळात कितीवेळा संबोधित केलं आणि काय काय दिवस होते.
ADVERTISEMENT
…आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात आले अश्रू
19 मार्च 2020
हे वाचलं का?
19 मार्च 2020 या दिवशी कोरोना काळात पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अपील केलं होतं की 22 मार्च 2020 ला सगळ्या जनतेने एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळायचा आहे. सकाळी 7 ते रात्री 9 या काळात हा कर्फ्यू पाळला जाईल. या काळात लोकांनी घराबाहेर पडू नये. बाजार, वाहनं, कोणतंही सार्वजनिक वाहन, ऑफिस, शाळा, महाविद्यालयं सारं सारं काही बंद असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे आवाहन जनतेने ऐकलं आणि एक दिवसाचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळला. कोरोनाची दहशत देशात पोहचली होती. कारण भारतात 30 जानेवारीला कोरोनाचं पहिला रूग्ण आढळला होता.
22 तारखेच्या दिवशी म्हणजेच जनता कर्फ्यूच्या दिवशी सगळ्या जनतेने आपल्या घरातून संध्याकाळी 5.5 मिनिटांनी थाळ्या किंवा टाळ्या वाजवाव्यात असं आवाहनही मोदींनी केलं होतं ज्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
ADVERTISEMENT
24 मार्च 2020
ADVERTISEMENT
22 मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर दोन दिवसांनी म्हणजेच 24 मार्च 2020 ला मोदींनी पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं आणि त्यावेळी त्यांनी देशातल्या कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. 21 दिवसांसाठी संपूर्ण देश बंद असेल अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. मोदींच्या या घोषणेनंतर राज्याराज्यांमध्ये लॉकडाऊन सुरू झाला. जनता कर्फ्यूच्या वेळी भारतात कोरोनाचे 330 रूग्ण होते. मात्र त्यानंतर कोरोनाचा कहर झाला. पहिली लाट आणि त्यापाठोपाठ आलेली दुसरी लाट ही कहर माजवणारी ठरली.
3 एप्रिल 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 एप्रिल 2020 लाही भारतीयांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशातल्या कोरोना वॉरियर्सचा सन्मान करा आणि रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी एक दिवा त्यांच्यासाठी लावा असंही आवाहन केलं होतं. ज्यानंतर देशातल्या सर्व राज्यांमध्ये मोदींच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद देण्यात आला होता.
14 एप्रिल 2020
14 एप्रिल 2020 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. सकाळी दहा वाजता त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. 14 एप्रिलला 21 दिवसांचा लॉकडाऊन संपत होता. जो लॉकडाऊन पुढे 3 मे 2020 पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर 15 एप्रिल 2020 ला केंद्र सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या. तसंच सात गोष्टींवर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.
आपल्या घरातल्या वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या त्यांना जपा
लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळा
घरातही मास्कचा वापर जरूर करा
आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचना पाळून आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासंबंधीची काळजी घ्या
आरोग्य सेतू मोबाईल एॅप डाऊनलोड करा
गरीब कुटुंबांची जमेल तशी काळजी घ्या, त्यांना अन्नदान करा
मोठ्या संस्थांनी किंवा कंपन्यांनी नोकरीवरून कुणालाही कमी करू नये
देशातल्या कोरोना योद्ध्यांचा म्हणजेच डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचा आदर करा
12 मे 2020
12 मे 2020 या दिवशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या योजनेची घोषणा केली. भारताचा मूलभूत आधार हा वसुधैव कुटुंबकम आहे. भारत जेव्हा आत्मनिर्भरता ही बाब उच्चारतो तेव्हा तो आत्मकेंद्री नसतो असं मोदी यांनी म्हटलं होतं. तसंच याच दिवशी त्यांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजचीही घोषणा केली होती. कोरोना प्रादुर्भाव झाला असला तरीही आर्थिक वाटचाल थांबू शकत नाही. कोरोनाशी युद्ध सुरूच राहणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जगभरातील वेगवेगळ्या देशांनी जारी केलेल्या पॅकेजपैकी हे एक मोठे पॅकेज मानले जात आहे. हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या १० टक्के असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
भारताने कोरोनाच्या संकटाचे संधीत रुपांतर करायला पाहिजे. तरच २१ व्या शतकावर वर्चस्व ठेवण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यासाठी भारताला स्वयंपूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे भारताने एखादी गोष्ट ठरवली तर काहीच अवघड नाही. आगामी काळात आपल्याला अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, सक्षम व्यवस्था, वैविध्यपूर्ण लोकसंख्याशास्त्र (डेमोग्राफी) आणि मागणी पुरवठ्याच्या चक्राचे सुयोग्य नियोजन या पाच प्रमुख घटकांच्या पायावर देशाची भक्कम इमारत उभारावी लागेल, असे मोदींनी यावेळी सांगितले. त्यासाठी देशातील जनतेने आपला मोर्चा ‘ग्लोबल’कडून लोकल उत्पादनांकडे वळवाला. स्थानिक उत्पादनांची केवळ खरेदीच नव्हे तर त्यांचा प्रचारही करा. जेणेकरून स्थानिक उत्पादनांना सुगीचे दिवस येतील असंही मोदींनी म्हटलं होतं.
30 जून 2020
30 जून 2020 या दिवशी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मास्क लावण्याचं महत्त्व समजावून सांगितलं तसंच एका देशाच्या पंतप्रधानाला मास्क न लावल्याबद्दल 13 हजारांचा दंड कसा भरावा लागला हेदेखील स्पष्ट केलं. या दिवशीच्या भाषणात त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली ती म्हणजे 80 कोटी पेक्षा जास्त जनतेला दिवाळीपर्यंत म्हणजेच चार महिने मोफत धान्य दिलं जाईल. तसंच प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत गरीबांसाठी पावणेदोन लाख कोटी रूपयांच्या पॅकेजचीही घोषणा करण्यात आली.
15 ऑगस्ट 2020
15 ऑगस्ट 2020 या दिवशीही म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यदिनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं होतं. आत्मनिर्भऱ भारत, कोरोना काळ, दहशतवाद, चीन प्रश्न या सगळ्यावर भाष्य केलं. तसंच लोकलसाठी व्होकल व्हा असं महत्त्वाचं आवाहनही केलं. कोरोना महामारी एवढी मोठी नाही की आपला आत्मनिर्भर भारत त्यासमोर हरून जाईल असंही वक्तव्य त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.
20 ऑक्टोबर 2020
20 ऑक्टोबर 2020 या दिवशीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी निष्काळजीपणा करू नका असं आवाहन केलं होतं. तसंच या महिन्यापर्यंत लॉकडाऊनकडून आपल्या देशाचा प्रवास हा अनलॉकच्या दिशेने झाला होता. त्यामुळे लॉकडाऊन संपला असला तरीही कोरोना संपलेला नाही हे लक्षात ठेवा. हात धुवा, मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा हे महत्त्वाचं आवाहन त्यांनी केलं होतं. तसंच कोरोनावरची लस लवकरच भारतात उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं होतं.
20 एप्रिल 2021
Lockdown या शेवटचा पर्याय म्हणून अवलंबवावा असं कळकळीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केलं आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत करा. अर्थचक्र कसं सुरू राहिल यावर लक्ष केंद्रीत करा. लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल हेच बघा. आज निर्माण झालेली परिस्थिती ही सगळ्या देशात झाली आहे. त्यातून आपण बाहेर पडू हा मला विश्वास आहे त्यामुळे आता लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवा, लॉकडाऊन लावण्याची वेळ यायलाच नको अशी व्यवस्था करा असंही आवाहन त्यांनी केलं. आता आज म्हणजेच 7 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाशी संवाद साधणार आहेत. ते काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT