दाढीचा वस्तरा सापडला, तरी राजकारण सोडेन; आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीपातीच्या राजकारणाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. गुढीपाडव्या निमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज यांनी विविध मुद्द्यांवरून शरद पवार-उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून, त्यांच्या भाषणावर गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या भाषणातील विविध मुद्द्यांना ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. यावरून त्यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. राज यांच्या आरोपाला आव्हाडांनी मनसेचा जुना झेंडा ट्विट करत उत्तर दिलं आहे. “जातीपातीचे राजकारण आपण कधी बंद करणार आहेत -राज ठाकरे. झेंडा पाहून घ्या एकदा… विषय संपला… नीळा… भगवा… हिरवा”, असं म्हणत आव्हाडांनी राज यांच्यावर पलटवार केला आहे.

Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांचं पाडवा मेळाव्यातील भाषण जसंच्या तसं

हे वाचलं का?

त्यानंतर दुसऱ्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले, “प्रबोधनकारांची पुस्तकं वाचली, तर जातपात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील. शरद पवार साहेबांचं नाव घेतलं की महाराष्ट्रात चर्चा होतेच… हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा,” अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

राज ठाकरेंनी मदरशांमधील घडामोडींबद्दल प्रश्न उपस्थित केले. मदरशांमध्ये धाडी टाकाव्यात अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. या मुद्द्यावरून आव्हाडांनी राज ठाकरेंना खुलं आव्हान दिलं. “राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केलं.माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावं. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन. मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमानी राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका.”

ADVERTISEMENT

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जाती-जातीत द्वेष, शरद पवारांना पण तेच हवंय’, राज ठाकरेंची जहरी टीका

ADVERTISEMENT

“कळवा-मुंब्रा या मतदारसंघात ६७ टक्के हिंदू आहेत आणि ३३ टक्के मुसलमान. त्यात मी ७५ हजार मतांनी विजयी झालो. कळव्यातून ३०,००० ची आघाडी आणि मुंब्र्यातून ४५,००० मतांची आघाडी. लोक कामावर मतं देतात, जातीपातीवर नाही. १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे लागते,” अशी टीका आव्हाडांनी राज ठाकरेंवर केली.

राज ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं आवाहन केलं. त्यावरूनही आव्हाडांनी उपहात्मक व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे. “६ डिसेंबरला चैत्यभूमीला भेट देणाऱ्या बंधू-भगिनींबद्दल आपण काय बोललात हे कुणी विसरलेलं नाही. नुसत्या मिरवणुका काय काढायला सांगता, संविधानाचा सन्मान राखीन अशी शप्पथ घ्या. तुमचं भाषणच संविधान विरोधी होतं, आणि हो भाषणाच्या शेवटी जयभीम ही म्हणा. निवडणुकीसाठी वाट्टेल ते”, अशी टीका आव्हाडांनी ठाकरेंवर केली आहे.

मशिदीवरील भोंग्यावरुन राज ठाकरे काय म्हणाले?

“माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना… आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान? उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता-आवरता नाकीनऊ येतील, इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत.”

“अनेक मदरसे असे आहेत की जिथे काय घडतंय, तेच समजत नाही. ही सगळी पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली ही लोकं आहेत. नगरसेवक, आमदार, खासदारांना याच्याशी काही घेणंदेणं नाही. ते कशात लागले, आधार-रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच. एक दिवस असा येईल की त्यावेळी सगळ्यांचे डोळे उघडतील. काय करून ठेवलं म्हणून. एकदा पोलिसांशी बोलून बघा. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. आमचं कुणाचं लक्ष नाही.”

“मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज आणि आता सांगतोय, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. आमचा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्याप्रकारे स्पीकरचा सकाळ पाच वाजल्यापासून त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊड स्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. कुठेही लाऊडस्पीकर दिसणार नाही. प्रार्थना घरात करा. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडं मंदिर आहेत. टाका धाडी. काय मिळणार घंटा. आमच्याकडे काहीच नाही.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT