तुरुंगातील कैद्यांना मिळणार कर्ज, येरवडा कारागृहात होणार सुरूवात; ठाकरे सरकारचा निर्णय
राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आता कर्ज घेता येणार आहे. तुरुंगातील कामांसाठी मिळणाऱ्या बंदीवेतनाच्या आधारावर राज्याची शिखर बँक असलेली महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक कैद्यांना कर्जपुरवठा करणार असून, राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगातून याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली. कारागृहात शिक्षा […]
ADVERTISEMENT

राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आता कर्ज घेता येणार आहे. तुरुंगातील कामांसाठी मिळणाऱ्या बंदीवेतनाच्या आधारावर राज्याची शिखर बँक असलेली महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक कैद्यांना कर्जपुरवठा करणार असून, राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगातून याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली.
कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार असून, ७ टक्के व्याज दराने हे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेची सुरुवात प्रथम पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मंगळवारी (२९ मार्च) सह्याद्री अतिथीगृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील आदेशही काढण्यात आला आहे.
कारागृहातील कैद्यांच्या जीवनमानात सुधारणा, त्यांच्या पुनर्वसनाच्या आणि त्यांना कुटुंबीयांसाठी कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.