Maharashtra News Live : केंद्र सरकारकडून CAA कायदा लागू, अधिसूचना जारी!
Lok Sabha election Seats Sharing Updates : महाराष्ट्रातील सर्व राजकीय, सामाजिक, गुन्हेगारीविषयक घटनांचे ताजे अपडेट्स...
ADVERTISEMENT
Lok Sabha elections 2024 live updates : लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा पेच फसलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात वेगाने घडामोडी घडताहेत... याबद्दलचे लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 06:48 PM • 11 Mar 2024
केंद्र सरकारकडून CAA कायदा लागू, अधिसूचना जारी!
2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी केंद्र सरकारने आज (11 मार्च) देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) लागू करण्याबाबत अधिसूचना जारी केली.
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अंतर्गत, 31 डिसेंबरपूर्वी भारतात स्थायिक झालेल्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ सहन केलेल्या आणि मुस्लिम नसलेल्या स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. हे 2019 मध्ये संसदेने मंजूर केले होते. त्याला राष्ट्रपतींचीही मान्यताही मिळाली.
- 06:03 PM • 11 Mar 2024
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत
प्रसिद्ध कुस्तीपटू, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. चंद्रहार पाटील यांनी 500 गाड्यांच्या ताफ्यासह शक्तीप्रदर्शन करत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे जंगी स्वागत करत सांगली लोकसभेसाठी त्यांची उमेदवारीही जाहीर केली आहे.
- 05:40 PM • 11 Mar 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटमध्ये काय?
मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी मिशन दिव्यस्त्रासाठी आमच्या DRDO शास्त्रज्ञांना अभिमान आहे.
- 05:08 PM • 11 Mar 2024
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मोठी घोषणा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
- 04:10 PM • 11 Mar 2024
तुम्ही राजकारण करा पण आधी आरक्षण द्या- मनोज जरांगे पाटील
'देवेंद्र फडवणीस किती दिवस दडपशाही करतात ते बघूया, मराठ्यांच्या लेकरांसाठी गुलाल उधाळल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आता सर्वात मोठी सभा घेणार असून त्याला परभणीच्या सर्वांनी यायचे',असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी परभणीत आवाहन केले आहे.
- 03:38 PM • 11 Mar 2024
अजित पवारांना रामराम? आमदार निलेश लंके सोडणार साथ?
'मला अनेकांचे फोन आले, लोकसभा निवडणूक लढवावी अशी सहकाऱ्यांची इच्छा आहे. आपण खेळाडू आहे, खेळाडू हा नेहमी ग्राउंडवर असतो. पक्षाने जर जबाबदारी दिली तर मी लढेन. राजकारण कधी कुठे टर्न घेईल हे सांगता येत नाही. महायुती, जागावाटप हा वरिष्ठ स्तरावरील विषय आहे. मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो. शेवटच्या घटकाने इतक्या उच्च स्तरावर चर्चा न केलेली बरी. प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता हा आपआपल्या कार्यकर्त्याच्या नेहमी संपर्कात रहातो. काल माझ्या वाढदिवसानिमित्तही मला दादांचा फोन आला.' असं आमदार निलेश लंके म्हणाले. तसंच, ते अजित पवार गट सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'अजून तरी असं काही ठरलेलं नाही आणि आम्ही काही विचारही केलेला नाही. मी कोणाला भेटलोच नाही अशी विनाकारण चर्चा सुरू आहे.' लंकेंच्या उत्तरानंतर ते शरद पवारांसोबत हात मिळवणार की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.
- 01:00 PM • 11 Mar 2024
आमदार निलेश लंके खासदार अमोल कोल्हेंच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेदरम्यान आमदार निलेश लंके शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
- 11:49 AM • 11 Mar 2024
'कोस्टल रोडला देणार छत्रपती संभाजी महाराजांचं नाव'- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, 'पहिल्यांदाच या ठिकाणी जयंती होते आहे. त्यामुळे त्याचा हा आनंद मोठा आहे. संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती होत असतानाच आजच्या या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे त्याचाही आनंद वेगळा आहे. यावेळी बोलताना त्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.'
- 11:21 AM • 11 Mar 2024
'आम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेत नाही', फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला!
कोस्टल रोडवरून ताशी 80 किमी, तर बोगद्यातून ताशी 60 किमी वेगमर्यादा आहे. तसंच, यावर ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, दुचाकी, तीनचाकी, सायकलला प्रवेशबंदी आहे. 200 एक जागेत विविध झाडे लावण्यात येणार. यावेळी आज कोस्टल रोड उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'कोस्टल रोड आजपासून सुरू, मुंबईकरांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून एक मार्गिका सुरू होत आहे, लवकरच दुसरीही सुरू होईल. आम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेत नाही. ठाकरेंनी प्रेझेन्टेशन दाखवून पालिकेच्या २ निवडणुका घालवल्या.' तसंच फडणवीसांनी आदित्य ठाकरेंचा बाळराजे असा उल्लेख करत टीका केली.
- 10:50 AM • 11 Mar 2024
"ईडीचे अधिकारी भाजपच्या कार्यालयातून बाहेर पडतात की...", शरद पवारांचा गंभीर आरोप
शरद पवार यांनी ईडीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी थेट ईडी भाजपचा सहकारी पक्ष असल्यासारखे वागत आहे, असे म्हटले आहे.
पवार पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले, "आम्ही सगळी माहिती मिळवली त्यावेळी समोर आलं की ईडीने २००५ ते २०२३ या सतरा वर्षांच्या काळात दोन सरकारं होती. एक आमचं सरकार म्हणजे यूपीए सरकार होतं आणि आत्ताचं सरकार आहे."
"५९०६ केसेस नोंदवल्या गेल्या. यापैकी चौकशी करुन निर्णय लागला त्या फक्त २५ केसेस आहेत. असाही आरोप शरद पवार यांनी केला. त्याचप्रमाणे ईडी ही संस्था भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे."
"भाजपाचे नेते आधीच सांगतात की अमुक नेत्यावर कारवाई होणार आहे आणि तशी ती कारवाई घडते. ईडीचे अधिकारी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडतात की भाजपाच्या कार्यालयातून हेच कळत नाही", असे म्हणत पवारांनी ईडीच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.
- 10:01 AM • 11 Mar 2024
शरद पवारांचा अजित पवारांना पहिला धक्का, नगरमध्ये राजकारण फिरणार!
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना शरद पवार पहिला झटका देणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवारांसोबत असलेले आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
निलेश लंके दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा मिळणार आहे. त्यामुळे इथून शरद पवार लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT