Mumbai Water Supply : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, 24 तास पाणीपुरवठा बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai Water Supply Latest Update : महिन्याअखेरीस मुंबईकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. मुंबईतील (Mumbai) काही भागात तब्बल 24 तास पाणीपुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे. भांडुप संकुलाशी (Bhandup) संबंधित जलवाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसविणं, नवीन जलवाहिन्यांची जोडणी आणि दोन ठिकाणी गळती दुरुस्तीची कामं केली जाणार असल्यामुळे पाणीपुरवठा 30 जानेवारी आणि 31 जानेवारी रोजी बंद ठेवला जाणार आहे.

ADVERTISEMENT

जलवाहिन्यांवर झडपा बसवणं, नवीन जलजोडण्या, गळती रोखणं आणि दुरुस्तीची कामं करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून 24 तासांसाठी काही विभागातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. मुंबईतील 24 पैकी 12 वॉर्डांमध्ये 30 आणि 31 जानेवारी रोजी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

काम होणाऱ्या नऊ विभागांत पूर्णपणे, तर तीन विभागांत 25 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. आणखी एक बाब म्हणजे 4 फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी पुरेसं पाणी साठवून ठेवावं आणि जपून वापरावं, असं आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

मुंबईतील पाणीपुरवठा बंद राहणार

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात अतिरिक्त 4000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडली जाणार आहे. तसेच संकुल संबंधित विविध जलवाहिन्यांवर 2 ठिकाणी झडपा बसविणं, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणं आणि 2 ठिकाणची गळती दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत महापालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. 2 विभागांत पाणीपुरवठ्यात 25 टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.

ADVERTISEMENT

या विभागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

पश्चिम उपनगर : के पूर्व – के पश्चिम अंधेरी, पी दक्षिण गोरेगाव, पी उत्तर मालाड मालवणी, आर दक्षिण कांदिवली, आर मध्य बोरिवली, आर उत्तर दहिसर, एच पूर्व आणि एच पश्चिम वांद्रे या 9 विभागांमधील अनेक परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व उपनगरातील एस विभाग भांडुप, एन विभाग घाटकोपर आणि एल विभाग कुर्ल्यातील अनेक भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Water supply : दादर आणि वरळीमध्ये 25 टक्के पाणीकपात

जी उत्तर आणि जी दक्षिण या 2 विभागांतील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात 30 व 31 जानेवारी रोजी 25 टक्के कपात करण्यात येणार आहे. धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी 4 ते सायंकाळी 9 या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात 30 जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT