PM Modi Nagpur Visit : नागपुरकरांना मोठी भेट, मोदी करणार समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गांचं पहिल्या टप्प्यात उद्घाटन होत आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. पंतप्रधान मोदी नागपुर दौऱ्यात समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाबरोबरच इतरही प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9.30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील. तिथे ते ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करणार आहेत. तिथे पंतप्रधान ‘नागपूर मेट्रो टप्पा I’चे लोकार्पण करणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -II’ ची पायाभरणीही करणार आहेत. सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करणार आहेत. सकाळी 11.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते ‘एम्स नागपूर’चे राष्ट्रार्पण होणार आहे.

हे वाचलं का?

नागपुरातील एका जाहीर कार्यक्रमात सकाळी 11:30 वाजता 1500 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी ते राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्थेचं उद्घाटन करणार आहेत. त्याचबरोबर ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र, चंद्रपूर’चे लोकार्पण करणार आहेत.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग : नागपूर ते शिर्डी

नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग प्रकल्प हा देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांसंदर्भाने महत्वाचा आहे. सुमारे 55,000 कोटी रुपये खर्च करून बांधला जात असलेला 701 किमीचा हा द्रुतगती मार्ग हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रांमधून जातो. या द्रुतगती मार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांची संपर्क सुविधा सुधारण्यास मदत होणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी हा महामार्ग साहाय्यकारी ठरणार आहे.

ADVERTISEMENT

नागपूर मेट्रो

नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणणारे आणखी एक पाऊल असलेला ‘नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा’पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत. खापरी मेट्रो स्थानकावरून पंतप्रधान खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर (ऑरेंज लाइन) आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर (एक्वा लाइन) या दोन मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा 8650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. 6700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो टप्पा -2 ची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

ADVERTISEMENT

एम्स नागपूर

एम्स नागपूरच्या राष्ट्रार्पणाच्या माध्यमातून देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठीची पंतप्रधानांची वचनबद्धता मजबूत केली जाईल. जुलै 2017 मध्ये पंतप्रधानांनीच या रुग्णालयाची पायाभरणी केली होती, या रुग्णालयाची स्थापना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना या केंद्रीय क्षेत्रातील योजने अंतर्गत करण्यात आली आहे.

एम्स नागपूर हे 1575 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केले जाणारे, बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, निदान सेवा, शस्त्रक्रिया विभाग आणि वैद्यकशास्त्रातील सर्व प्रमुख विशेष आणि सुपरस्पेशालिटी विषयांचा समावेश असलेले 38 विभागांचे अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय आहे. हे रुग्णालय महाराष्ट्रातील विदर्भात आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देईल आणि गडचिरोली, गोंदिया आणि मेळघाटच्या आसपासच्या आदिवासी भागांसाठी वरदान ठरणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

नागपूर रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नागपूर येथील सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नागपूर तसेच अजनी या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी करतील. या दोन स्थानकांच्या कामासाठी अनुक्रमे 590 कोटी आणि 360 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या वेळी, अजनी (नागपूर)येथील सरकारी देखभाल डेपो तसेच नागपूर-इटारसी मार्गाच्या तिसऱ्या लाईनवरील कोहली-नारखेड टप्प्याच्या प्रकल्पांचे राष्ट्रार्पण देखील करण्यात येईल. या प्रकल्पांसाठी अनुक्रमे 110 कोटी आणि 450 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

वन हेल्थ राष्ट्रीय संस्था, नागपूर

नागपूरमधील एनआयओ अर्थात वन हेल्थ राष्ट्रीय संस्था उभारणीचा पंतप्रधानांच्या हस्ते होणारा पायाभरणी समारंभ म्हणजे ‘वन हेल्थ’ धोरणाअंतर्गत देशात क्षमता तसेच पायाभूत सुविधा निर्मिती उभारण्याच्या दिशेने पुढचे पाऊल मानले जात आहे. ‘वन हेल्थ’ दृष्टीकोनानुसार, असे मानले जाते की, मानवाचे आरोग्य त्याच्या आजूबाजूचे प्राणी तसेच वातावरण यांच्या आरोग्याशी निगडित आहे.

माणसाला होणारे बहुतांश संसर्गजन्य आजार प्राणीजन्य प्रकारचे म्हणजे प्राण्यांकडून माणसांमध्ये संक्रमित होणारे असतात या प्रमेयाला या दृष्टीकोनात मान्यता देण्यात आली आहे. आगामी काळात 110 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य विषयाशी संबंधित सर्व भागधारकांमध्ये सहकारी संबंध आणि समन्वय प्रस्थापित केला जाईल. तसेच देशभरात ‘वन हेल्थ’ संकल्पनेद्वारे संशोधन तसेच क्षमता निर्माणाचे कार्य सुधारण्यासाठी उत्प्रेरक म्हणून देखील हा उपक्रम उपयुक्त ठरेल.

इतर प्रकल्प

या नागपूर भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी नाग नदीतील प्रदूषण कमी करण्यासंदर्भातील प्रकल्पाची पायाभरणी करतील. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत 1925 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. विदर्भात, विशेषतः जेथे आदिवासी समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा भागात सिकल सेल आजाराचे प्राबल्य जाणवते. थॅलेसेमिया आणि एचबीई इत्यादी हिमोग्लोबिनशी संबंधित प्रवृत्तींसह सिकल सेल सारख्या आजारांमुळे देशावर मोठा ताण पडतो.

ही समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये ‘हिमोग्लोबिनशी संबंधित आजारांवर संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण यासाठीचे केंद्र’उभारण्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. हे काम पूर्ण झाले असून आता पंतप्रधान हे केंद्र देशाला अर्पण करतील. देशात संबंधित क्षेत्रातील अभिनव संशोधन, तंत्रज्ञान विकास, मनुष्यबळ विकास यासाठी हे केंद्र उत्कृष्टता केंद्राच्या रुपात नावारूपाला येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सीआयपीईटी अर्थात केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पॉलिमर आणि संबंधित उद्योगांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करणे हा या संस्थेच्या उभारणीमागील उद्देश आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT