पुणे : बिबट्याचा हल्ला की,…; १९ वर्षीय तरुणीचा विहिरीत मृतदेह सापडल्याने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील गणेशवाडी शिवारातील विहिरीमध्ये शुभांगी संजय भालेराव या तरुणीचा मृतदेह सोमवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी आढळून आला. शुभांगी कृषीपंप बंद करण्यासाठी विहिरीवर गेली होती. तिच्या मृत्यूच्या कारणांवरून वेगवेगळी चर्चा सुरु आहे.

ADVERTISEMENT

गणेशवाडी येथील शेतकरी संजय खंडू भालेराव यांची पत्नी नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी सोमवारी सकाळी निरगुडसर येथे गेली होती. मुलगी शुभांगी ही बबन कोंडाजी भालेराव यांच्या सार्वजनिक हिस्सा असलेल्या विहिरीतून पंपाद्वारे चालू असलेलं पाणी बंद करण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता गेली होती.

त्यानंतर गणेश वाडी येथे वडील संजय भालेराव हे काही कामानिमित्त निघून गेले. साडेअकरा वाजले तरी शुभांगी घरी न आल्यानं ती मंचर येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीसाठी गेली असावी, असं कुटुंबियांना वाटलं.

हे वाचलं का?

दरम्यान, गावातील स्वप्निल खंडागळे याला तिचा भाऊ शुभमने फोन करून शुभांगी अकॅडमीला आलेली आहे का? याबद्दल चौकशी केली. शुभांगी आलेली नसल्याचं स्वप्नीलने सांगितलं. त्यानंतर शेजारी वहिनीकडे गेली असावी असं समजून कुटुंबियांनी तिच्या परतण्याची वाट बघतली. बराच वेळ गेल्यानंतरही ती घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला.

शोध घेत असताना स्वप्निल खंडागळे, शेजारी नातेवाईक आणि शुभांगीचा धाकटाभाऊ शुभम यांनी विहिरीकडे जाऊन पाहिलं असता विहिरीला पाणी भरपूर असल्याने अंदाज येत नव्हता.

ADVERTISEMENT

नंतर गळ टाकून शोध घेतला असता गळाला जड वस्तू लागली. यात शुभांगीचे कपडे गळाला लागली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी शुभांगीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तिच्या चेहऱ्यावर, कानाच्या मागे, मानेजवळ आणि हाताच्या दंडाचे लचके तोडलेल्याच्या खुणा दिसून आल्याचं ग्रामस्थांनी सांगितले.

ADVERTISEMENT

कृषीपंप बंद करण्यासाठी विहिरीजवळ गेलेली असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला जखमी केलं असावं आणि ती विहिरीत पडली असावी किंवा विजेचा शॉक लागून ती विहिरीत पडली असावी असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर शुभांगीचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सायंकाळी सहा वाजता पाठविण्यात आला.

शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल; तोपर्यंत नेमकी घटना कशी झाली, घटनेमागील कारणांचा अंदाज लावणे कठीण आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT