अक्कलदाढ इतकी उशिरा कशी येते ते बघावं लागेल; राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुढीपाडव्या निमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लक्ष्य केलं. युतीतून बाहेर पडल्यावरून राज यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं, तर शरद पवारांना जातीचं राजकारण हवंय, असा आरोप केला. कालच्या भाषणाला उत्तर देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंना अक्कलदाढेवरून डिवचण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “२०१९ च्या निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाची टूम काढली, अशी टीका राज ठाकरेंनी केली. त्यावरून राऊतांनी उलट सवाल केला. “हे तुम्हाला इतक्या दिवसांनी कसं आठवलं. थोडंस आता आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते. ते बघावं लागेल. अडीच वर्षानंतर बोलत आहे. भाजप-शिवसेनेत काय झालं, ते आमचं आम्ही बघून घेऊ तिसऱ्याची गरज नाही. तुम्ही तुमचं बघा”, असं राऊत म्हणाले.

“भाजपचा लाऊडस्पीकर काल शिवाजी पार्कमध्ये वाजत होता. त्यांचीच (भाजप) स्क्रिप्ट होती. लोकांनाही असंच वाटतंय. त्यांचीच स्क्रिप्ट. त्यांचाच लाऊडस्पीकर. त्यांच्यांच टाळ्या. घोषणाही त्यांच्याच होत्या. काल उद्धव ठाकरेंच्या हस्ते मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं. मेट्रोचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री काम करत आहेत. नेतृत्व करत आहे. त्यावर बोला. भोंग्यांचं काय करायचं. तुमच्या भोंग्यांचं काय करायचं, यासाठी सरकार समर्थ आहे”, असं उलट उत्तर राऊतांनी दिलं.

हे वाचलं का?

“शरद पवारांनी जातीयवाद पसरवला. त्या शरद पवारांच्या चरणाशी आपणही सल्ला मसलत करायला जात जात होतात. कशा करता टोलेजंग माणसांवर बोलायचं. तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळतात. त्या टाळ्याही प्रोयोजित आहेत. शिवतीर्थावरचा भोंगा हा भाजपचा होता. कालच महाराष्ट्राला एकच दिसलं की, अक्कलदाढ उशिरा येते”, असा टोला त्यांनी यावेळी राज ठाकरेंना लगावला.

“मतदारांनी युतीला मतदान केलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “असं या देशात अनेकदा झालेलं आहे. शेवटी बहुमत निर्माण होतं, तेव्हाच सरकार बनतं. युतीचं बहुमत निर्माण झालं नाही, आघाडीचं बहुमत निर्माण झालं. राज्याच्या स्थैर्यासाठी आणि खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनलेलं आहे. त्यांनाही हे माहिती आहे.”

ADVERTISEMENT

“महाराष्ट्राच्या प्रश्नावर… मराठी भाषा भवनाचं स्वागत करायला हवं होतं. त्याच्याविषयी कुणी काही बोललं नाही. टीका करायची. त्याने काय मिळतं. आहे तेही गमावून बसाल तुम्ही. भाजप त्यांची मळमळ दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढतंय, हे स्पष्ट दिसतंय. आम्ही यावर चर्चा करणार नाही. आमचा दृष्टीकोण विकासाचा आहे. राज्यात संकट येताहेत त्याच्याशी लढा द्यायचा. या राज्यात केंद्रीय यंत्रणांची घुसखोरी सुरू आहे. त्याच्याशी लढा द्यायचा आहे. हे करत असताना शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रावर फडकवायचा आहे”, असं राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

“किती भाजप शासित राज्यांमध्ये मशिदींवरील भोंगे हटवले गेले आहेत. अजान बंद केली गेलीये. हे आधी बघा. राज्यात कायद्याचं राज्य चालतं. जे करायचं ते कायदानुसार गृहमंत्री करतील. मदरशांमध्ये धाडी टाका हे टाळी घेणार वाक्य आहे. अशी वाक्ये आम्ही खूप ऐकली आहेत.”

“शरद पवार, बाळासाहेब ठाकरे या राज्याचे आणि देशाचे मोठे नेते आहेत आणि राहतील. तुम्ही कशाला त्यांच्याबद्दल बोलत आहात. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला त्यांची भूमिका मांडली आहे. आता पुढच्या वर्षी भेटू.” उत्तर प्रदेशातील विकासाच्या मुद्द्यावरूनही राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला. “त्यांना काल मराठी भाषा भवन दिसलं नाही. त्यांना मेट्रो सुरू झाल्याचं दिसलं नाही. त्यांना सरकारकडून केली जाणारी कामं दिसली नाही. उत्तर प्रदेश असो वा बिहार… सगळ्यांचा विकास व्हायला हवा. तुमच्या डोळ्यासमोर जे होतंय ते आधी बघा आणि नंतर दिव्य दृष्टीने इतर राज्यांमध्ये बघा”, अशा शब्दात राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT