भांडूपमधील चार बालकांच्या मृत्यूंप्रकरणी शिवसेना नेत्या राजुल पटेल यांचं वादग्रस्त वक्तव्य, मग माफी

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या भांडूप या ठिकाणी असलेल्या सावित्रीबाई फुले रूग्णालयात NICU मध्ये उपचार घेत असलेल्या चार लहान बाळांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या ठिकाणी मुंबई महापालिका आरोग्य समितीच्या अध्यक्षा आणि शिवसेना नगरसेविका राजुल पटेल आल्या होत्या. चार नवजात बालकांच्या मृत्यूबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

चार बालकांचा मृत्यू झाल्यानंतर या मुलांचे पालक आंदोलन करत होते. राजुल पटेल घटनेची पाहणी करण्यासाठी आल्या तेव्हा या पालकांमध्ये आणि राजुल पटेल यांच्यात वाद झाला. या मृत्यूंची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे असं हे पालक राजुल पटेल यांना म्हणाले. तेव्हा राजुल पटेल संतापल्या आणि म्हणाल्या, ‘तुमच्या बाळांना या रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी तुम्ही आम्हाला विचारलं होतं का? नाही ना? मग आम्ही जबाबदारी कशी घ्यायची? एक तर रूग्णालयाला बाल रोग तज्ज्ञ मिळत नाहीये. त्यातून काही अडचणीही समोर येत आहेत. मग आम्ही जबाबदारी कशी घेणार?’ असा प्रश्न त्यांनी पालकांना विचारला आणि त्यांच्याशी वाद घातला. या प्रकरणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर राजुल पटेल यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

भांडूपमधील महापालिका रुग्णालयात चार बालकांचा मृत्यू, BMC कडून चौकशी समितीची स्थापना

या संपूर्ण प्रकरणाबाबत राजुल पटेल यांनी गुरुवारी संध्याकाळी एक व्हिडिओ जारी करून त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागितली. पटेल कुटुंबीयांशी संवाद साधत होत्या, त्यावेळी कुटुंबीयांनी या घटनेची जबाबदारी तुम्ही घ्या, असे सांगितले. “कोणती जबाबदारी? तुमच्या बाळांना या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तुम्ही आम्हाला विचारले होते? मग आम्ही कसे जबाबदार?” व्हिडीओमध्ये पटेल कुटुंबांना समजावून सांगतानाही ऐकू येत आहेत की बीएमसीला बालरोग डॉक्टर मिळत नाही.

ADVERTISEMENT

पटेल यांनी दिलगिरी व्यक्त करताना सांगितले की, ‘आरोग्य समितीची अध्यक्ष म्हणून मी परिस्थिती समजून घेण्यासाठी तिथे गेले होते. चार अर्भकांचा मृत्यू झाल्याने मी देखील अस्वस्थ झाले होते. त्या अवस्थेत माझा रक्तदाब वाढला. कुटुंबीयांशी बोलताना मी जे बोलले त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल मी माफी मागते. माझा जबाबदारी झटकण्याचा हेतू अजिबात नव्हता.’

ADVERTISEMENT

राजुल पटेल यांचा हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेवर विरोधकांनी कडाडून टीका केली. चार बाळांचा मृत्यू होतो तरीही नगरसेविका राजुल पटेल अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील वक्तव्य करतात. शिवसेनाचा हा खरा चेहरा आहे. मुंबई महापालिकेतली सत्तेची मस्ती यातून दिसून येते. ज्या बाळांनी जीव गमावला त्यांचे पालक दाद मागत होते अशावेळी त्यांचं सांत्वन करायचं सोडून त्यांच्याशी राजुल पटेल वाद घालत बसल्या जे हीन वृत्तीचे दर्शन आहे असं भाजपने म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन रुग्णालयाच्या NICU विभागाचे प्रमुख या प्रकरणाची चौकशी करुन सात दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करतील. विरोधी पक्षातील भाजपने या मुद्द्यावरुन शिवसेनेला कोंडीत पकडून हे मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला आहे. बालकांच्या नातेवाईंनी रुग्णालयाच्या आवारात बसून निदर्शनंही केली.

भाजप खासदार मनोज कोटक यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा अंदाज घेतला. या घटनेविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचंही कोटक यांनी सांगितलं. स्थानिक भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनीही या घटनेनंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT