‘शिंदेंबरोबर 7-8 आमदार गेले, बाकीच्यांना फडणवीसांनी..’ -उद्धव ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत,’ हे विधान केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी. बावनकुळेंच्या याच विधानाने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखात फेब्रुवारीपर्यंत बरंच काही घडेल म्हणत राजकीय भूकंपाचं भाकित व्यक्त केलंय.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामना अग्रलेखातून चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर भाष्य करण्यात आलंय. इतकंच नाही, तर मिंधे सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढली जात आहे, असं म्हणत मोठ्या राजकीय बदलाचे संकेत दिलेत.

सामना अग्रलेखात म्हटलंय की, ‘बावनकुळे हे फडणवीस पुरस्कृत पक्षाध्यक्ष आहेत. दुसरं असं की, इतकं मोठं विधान बावनकुळे स्वतःच्या मनमर्जीनं करणार नाहीत. त्यामुळे फडणवीस यांच्या मनातली इच्छा बावनकुळेंच्या मुखातून बाहेर पडली असं मानायला जागा आहे.’

हे वाचलं का?

‘चंद्रकांत पाटील यांनीही चार महिन्यांपूर्वी वेगळं काय सांगितलं होतं? ‘शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं.’ हे पाटील यांचं विधान व आताचं बावनकुळ्यांचं बोलणं लक्षवेधी आहे. भाजपच्या मनावरील दगड बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं दिसतं व फडणवीस त्या कामी कामाला लागले आहेत. हा दगड छाताडावर ठेवून किती काळ काम करायचं? हा प्रश्न भाजप परिवारासही पडलाच आहे,’ असं शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं होतं? शिवसेनेनं (उबाठा) काय म्हटलंय?

सामना अग्रलेखात पुढे म्हटलंय की, ‘फडणवीसांनी शिंदे गटाच्या हाताखाली काम करणं म्हणजे सिंहानं कोल्ह्यांच्या झुंडीचं राज्यपद मान्य करण्यासारखं आहे. याची टोचणी फडणवीस यांच्या मनास असणारच. दुसरं असं की, शिंद्यांबरोबर 50 लोक गेले हा भ्रम आहे. त्यांच्याबरोबर फार तर सात-आठच आमदार गेले. बाकीच्यांना फडणवीस यांनीच फितवून, धमकावून पाठवलं असं म्हणतात. त्या कामी केंद्रीय तपास यंत्रणा, प्रलोभनं, खोके वगैरेंचा वापर झाला. फडणवीस यांनी घोडा सजवला स्वतःसाठी, पण घोड्यावर टपकन जाऊन बसले दुसरेच कोणी! असे काही घडेल हे फडणवीस यांच्या ध्यानीमनीही नसावं.’

ADVERTISEMENT

‘फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हायकमांडच्या आदेशानं माघार घेतली हे खरे, पण अपमानाच्या जखमा भळाभळा वाहत आहेत हीदेखील वस्तुस्थितीच आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यानं ते स्पष्टच झालं. सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे व सर्व काही संविधान, कायद्यानं घडलं तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. स्वतः मुख्यमंत्रीच आमदार म्हणून अपात्र ठरतील, पण केंद्रीय यंत्रणांचा वापर मनमर्जीनं करून बेइमानांना वाचवलं जात आहे. तरीही बेइमानी फार काळ टिकेल असं दिसत नाही,’ असं शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

शिंदे गट बावनकुळेंच्या विधानावर काय भूमिका घेणार? ठाकरेंनी सामनातून केला सवाल

‘फडणवीस यांनी घडवलेला व बिघडवलेला मोठा कंपू भाजपात आहे. त्या सगळ्यांच्या वतीनं बावनकुळे यांनी पुन्हा फडणवीस! अशी गर्जना केली. आता ‘मिंधे’ गटाचे आमदार व प्रवक्ते बावनकुळे यांच्या गर्जनेवर काय भूमिका घेणार? नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडावर बावनकुळे यांनी सांगितलं की, ‘आमचे पुढील मुख्यमंत्री तुम्हीच’. याचा अर्थ स्पष्टच की, मिंधे सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढली जात आहे व फडणवीस वगैरे लोक सरकार व शिंद्यांच्या बाजूने लढत असल्याचा नुसता आव आणीत आहेत,’ असं भाष्य सामनातून करण्यात आलंय.

फेब्रुवारीपर्यंत बरंच काही घडेल; सामनातून राजकीय भूकंपाचे संकेत

‘बावनकुळे हे शंभर टक्के फडणवीसनिष्ठ आहेत व फडणवीस यांना हवी तीच भूमिका ते घेतात. मग इतकं मोठं विधान फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय ते करतील काय? हाच प्रश्न आहे. नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका बसला आहे. फेब्रुवारीपर्यंत बरेच काही घडेल. महाराष्ट्रातील औटघटकेची व्यवस्था डामाडौल आहे. बावनकुळे यांनी तसा फटाकाच फोडला आहे. भाजपच्या मनावरील दगड दूर करण्याचे काम सुरू झालं आहे,’ असं म्हणत पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू झाल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT