काँग्रेसला डोस, फडणवीसांना उलट सवाल; सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरेंचं ‘सामना’तून टीकास्त्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘काँग्रेस’चे राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. राहुल गांधींच्या विधानावर बोट ठेवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची कोंडी केली. फडणवीसांनी थेट ठाकरेंना सवाल फडणवीसांनी केला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी ‘सामना’तून प्रत्युत्तर दिलंय. ठाकरेंनी केंद्रातल्या मोदी सरकारकडे बोट दाखवत फडणवीसांना उलट सवाल केलाय.

ADVERTISEMENT

राहुल गांधींच्या विधानानंतर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सवाल करत खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंनी आता सामना अग्रलेखातून उत्तर दिलंय.

“काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे केले आहे. काँग्रेस सावरकरांचा अपमान करीत असते व त्या अपमानाबद्दल भाजपवाले जाब वगैरे विचारत असतात. आताही महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांच्या राहुल गांधीकृत अपमानावर संताप व्यक्त केला. सावरकरांच्या अपमानाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करणे समजण्यासारखे आहे. आम्हीही यासंदर्भातील आमची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे, पण फडणवीसांच्या संतप्त भावना खऱ्या आहेत काय?”, असा सवाल करत सामनातून फडणवीसांच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केलीये.

हे वाचलं का?

राहुल गांधींची सावरकरांवर टीका, पण अडकले उद्धव ठाकरे; देवेंद्र फडणवीसांनी गाठलं खिंडीत

सामना अग्रलेखातून काँग्रेसला डोस, फडणवीसांवर निशाणा

सामना अग्रलेखात म्हटलंय की, “अंदमानातील प्रदीर्घ काळ्या पाण्याच्या कारावासानंतर वीर सावरकर हे इंग्रजांची माफी मागून सुटले, असा ‘खुळखुळा’ काँग्रेसवाले अनेक वर्षे वाजवीत आहेत. काँग्रेसवाल्यांची स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांसंदर्भात वेगळी भूमिका असू शकते, पण सशस्त्र क्रांतीचा उठाव वीर सावरकरांसारख्या अनेक योद्ध्यांनी केल्यानं इंग्रजांच्या पायाखालची वाळू सरकली. फक्त अहिंसेचा पुरस्कार करून स्वातंत्र्य मिळाले नाही हा इतिहास काँग्रेसमधील नव्या पिढीने समजून घेतला पाहिजे”, असं म्हणत सामनातून राहुल गांधींना खडेबोल सुनावण्यात आलेत.

ADVERTISEMENT

दुसरीकडे फडणवीसांनाही सामनातून ठाकरेंनी प्रश्न विचारलाय. “फडणवीस म्हणतात, राहुल गांधी यांना इतिहास माहीत नाही. फडणवीसांचे म्हणणे वादासाठी खरे मानू या, पण भाजपला तरी स्वातंत्र्य लढ्यातील वीर सावरकर किती कळले आहेत? ते कळले असते तर सावरकरांचा सन्मान व्हावा यासाठी त्यांनी नक्कीच पावले उचलली असती. सावरकरांचा मानसन्मान राहावा यासाठी दिल्लीतील मोदी सरकारने काय केले?”, असं म्हणत फडणवीसांच्या प्रश्नाला ठाकरेंनी उत्तर दिलंय.

ADVERTISEMENT

मोदी सरकारचे निर्णय, फडणवीसांना सवाल; ठाकरेंनी काय म्हटलंय?

“मोदी सरकारने दिल्लीचे रूपडे पालटायचा चंग बांधला आहे. आताच राजपथाचे नामांतर ‘कर्तव्यपथ’ केले व त्याचा भव्य सोहळा पार पडला. त्याऐवजी ‘वीर सावरकर कर्तव्यपथ’ असे नाव देऊन आम्ही सावरकरांच्या मार्गाने कर्तव्यपथावरून पुढे जात आहोत हे जगाला दाखवता आले असते, पण नेहमीप्रमाणेच सावरकरांचा विसर पडला. कर्तव्यपथावर नेताजींचा भव्य पुतळा उभारला तसा वीर सावरकरांचा पुतळा उभारायलाही हरकत नव्हती. आम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी नितांत आदर आहे. सरदार हे खरेखुरे लोहपुरुष होते. त्यांच्यामुळेच निजामशाहीचा अंत झाला, पण सावरकरांच्या कार्याची, क्रांतीची, त्यागाची उंचीही कमी नाही. या ‘क्रांती’ची यादगार आठवण म्हणून नेताजी बोस, सरदार पटेलांच्या तोडीस तोड उंचीचा सावरकरांचा पुतळा का उभारला नाही?”, असं म्हणत फडणवीसांची कोंडी सामना अग्रलेखातून करण्यात आलीये.

“सावरकरांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगून जे सत्तेवर आले त्यांनी तरी या दीपस्तंभाचा काय सन्मान केला? फक्त राहुल गांधींना दोष देऊन काय फायदा? घरभेद्यांनीच सावरकरांचा सगळ्यात जास्त अपमान केला”, असं म्हणत सामनातून फडणवीसांवर टीकास्त्र डागण्यात आलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT