Special Report : जेव्हा शाळकरी मुलांच्या कविता आणि पाढ्यांसाठी वाजला होता मंदिरावरचा भोंगा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मशिदीवर वाजणारे भोंगे आणि त्याला उत्तर म्हणून लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे दिलेले आदेश हा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गाजतो आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत बोलत असताना मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्दा नव्याने वर काढला होता. या मुद्द्यानंतर राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आणि सुधारणावादी विचारांचा प्रदेश मानला जातो. सध्याचं वातावरण हे भोंग्याच्या मुद्द्यावरुन काही प्रमाणात गढूळ झालेलं असलं तरीही काही वर्षांपूर्वी लॉकडाऊनमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये एका शिक्षकाने मंदिरावरील भोंग्यांचा वापर करत मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घेतली होती.

सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावात के.पी.गायकवाड शाळेत मयुर दंकताळे हे शिक्षक कार्यरत आहेत. लॉकडाउनच्या काळात शाळा बंद होऊन ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. भारत डिजीटल इंडियाकडे वाटचाल करत असला तरीही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सोय नसल्यामुळे चांगलेच हाल झाले. अशावेळी प्रयोगशील शिक्षक मयुर यांना मुलांच्या अभ्यासात खंड पडू द्यायचा नव्हता. मुलांना मोबाईल आणि इंटरनेटची सोय करुन देणं त्यांना शक्य नव्हतं, परंतू म्हणून हार न मानता त्यांनी यावर उपाय शोधला. गावातील मंदिरांवर असलेल्या भोंग्यांचा वापर त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी करायचा ठरवला.

हे वाचलं का?

ही कल्पना जेव्हा त्यांनी गावातील मंदिरांतील लोकांना सांगितली तेव्हा त्यांनीही याला लगेच मान्यता दिली. शंकेला वाव नको म्हणून मयुर यांनी मंदिरावरील भोंग्याचा वापर हा फक्त मुलांच्या कविता आणि पाढे ऐकवण्यासाठी केला जाईल असं मुख्याध्यापकांचं पत्र दिलं. मंदिर प्रशासनाचा होकार मिळाल्यानंतर मयुर यांनी बालभारतीच्या सर्व कविता आणि पाढे आपल्या मित्राकडून MP3 फॉर्ममध्ये कन्वर्ट करुन घेतल्या…आणि यानंतर दररोज सकाळच्या वेळात गावातील मंदिरांवरील भोंग्यावरुन मुलांना कविता आणि पाढे वाजायला लागले.

2020 सालात मयुर दंतकाळे यांनी केलेल्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक माध्यमांनी मयुर यांचं कौतुक केलं. कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमात मयुर यांच्या उपक्रमाचा एक प्रोमोही चालवण्यात आला. या प्रयोगाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सध्याच्या वातावरणावरुन ‘मुंबई तक’ ने मयुर दंतकाळे यांच्याशी संवाद साधला.

ADVERTISEMENT

भोंग्यावरुन शाळा हा प्रयोग यशस्वी झाला असं मी थेट म्हणणार नाही. कारण हा त्या वेळेला सुचलेला एक उपाय होता. ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांकडे फोन नाहीत आणि इंटरनेट नाही म्हणून त्यांचं शिक्षण थांबवणं मला योग्य वाटलं नाही. गरीब घरातले विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहात कायम रहावे असं मला तेव्हा वाटलं, म्हणून मी त्यावेळी तो प्रयत्न केला. मुलांना ऑनलाईन अभ्यास करता आला नाही तरी चालेल पण त्यांचा अभ्यासक्रम त्यांच्या कानावर पडत राहीला तरी अनेक गोष्टी सुरुळीत होऊ शकतात असं मला वाटलं आणि त्यातून मी हा भोंग्यावरुन शाळेचा प्रयोग केला.

मयुर दंतकाळे – प्रयोगशील शिक्षक

ADVERTISEMENT

या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा असा झाला की एकाही विद्यार्थ्याच्या किंवा पालकाच्या मनात शाळा किंवा शिक्षण सोडण्याचा विचार आला नाही. भोंग्यांवरुन कविता आणि पाढे ऐकून अभ्यास करत राहिल्यामुळे जेव्हा शाळा सुरु झाल्या तेव्हा सर्व मुलं त्याच जोमाने शाळेत पुन्हा हजर झाली. या मुलांना त्या प्रवाहात कायम राखता आलं हे या उपक्रमाचं एक यश म्हणता येईल, अशी माहिती दंतकाळे यांनी मुंबई तक शी बोलताना दिली.

भोंग्यांवरुन सुरु असलेल्या राजकारणाबद्दल विचारलं असता मयुर दंतकाळे म्हणाले, “विद्यार्थ्यांपर्यंत मी कधीच राजकारण घेऊन जात नाही. राजकारणावर बोलायचं किंवा त्याचा विचार करायचं हे त्यांचं वय नाही. भोंग्यावरुन शाळा ही तात्पुरती होती. जेव्हा सगळे मार्ग बंद झाले होते तेव्हा आम्हाला हा पर्याय सुचला आणि आम्ही तो राबवला. परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही हा उपक्रम थांबवला आणि मुलं आता शाळेत यायला लागली आहेत. परंतू अडचणीच्या काळात एखादी समाजपयोगी गोष्ट करायची असेल तर तुमच्यासमोर संधी निर्माण होतात आणि तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर करता इतकच सांगता येईल.”

राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाचे आणि भोंग्याच्या राजकारणाचे राज्यात अनेक पडसाद उमटत आहेत. राज यांच्या आदेशानंतर राज्यात काही ठिकाणी तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं. परंतू या निमित्ताने पुन्हा एकदा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे की राजकीय नेत्यांच्या आदेशावरुन आपण त्यामागे फरफटत जायचं की मयुर दंतकाळेसारख्या शिक्षकाने केलेल्या उपक्रमाचा आदर्श ठेवून पुढे जायचं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT