पंढरपूर पराभवाच्या दिवशीच सुप्रिया सुळेंनी का घेतली राज्यपालांची भेट?
मुंबई: महाराष्ट्रात बहुचर्चित पंढरपूर पोटनिवडणूक (Pandharpur By-election) नुकतीच पार पडली आणि त्याचा निकाल देखील कालच (2 मे) जाहीर झाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध भाजप (BJP) असा हा सामना होता. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात नेमकं काय घडतं याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना भाजपाच्या समाधान आवताडे यांच्याकडून […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात बहुचर्चित पंढरपूर पोटनिवडणूक (Pandharpur By-election) नुकतीच पार पडली आणि त्याचा निकाल देखील कालच (2 मे) जाहीर झाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध भाजप (BJP) असा हा सामना होता. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात नेमकं काय घडतं याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना भाजपाच्या समाधान आवताडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
ADVERTISEMENT
दुसरीकडे देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील कालच जाहीर झाला. यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष ज्या राज्याकडे लागले होते त्या बंगालमध्ये ममता बँनर्जींनी एकहाती सत्ता राखली. पण या सगळ्या घडामोडी देशात घडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मात्र याच दिवशी म्हणजे काल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat singh Koshyari) यांची ‘सदिच्छा’भेट घेतली. पण त्यांच्या याच सदिच्छा भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
वास्तविक पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती बघता अशा स्वरुपाच्या राजकीय भेटीगाठी या सुरु असतात. पण सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांची निकालाच्या दिवशी भेट घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आता या भेटीचे राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत.
हे वाचलं का?
‘ममतादीदींचा हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक’, शिवसेनेचा खोचक अग्रलेख
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून राज्यपाल आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात वारंवार खटके उडाले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच संबंध फारसे सौहार्दाचे नाहीत. शरद पवारांनी राज्यपाल कोश्यारींवर अनेकदा टीका केली आहे. जानेवारी 2021 मध्ये ‘कंगना राणावत हिला भेटण्यासाठी आपल्या राज्यपालांकडे वेळ आहे, पण आमच्या शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. असे राज्यपाल महाराष्ट्रानं कधीही पाहिले नाहीत,’ अशा शब्दांत शरद पवारांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली होती.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात ज्या 12 आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी रखडवल्या आहेत त्यावरुन सुद्धा पवारांनी राज्यपालांवर टीका केली केली होती.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि भगतसिंग कोश्यारी यांच्यातील संबंध
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यात देखील वारंवार खटके उडत आल्याचे पाहायला मिळालं आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं होतं. ‘तुम्ही सेक्युलर झालात की काय?’ अशी खोचक टिपण्णी त्यांनी आपल्या पत्रात केली होती. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच विमान प्रवास नाकारुन राज्य सरकारने देखील राज्यापालांना काऊंटर करण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, याआधी उध्दव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरच्या नेमणुकीवरुन देखील बरंच राजकारण रंगलं होतं. राज्यपाल विधानपरिषदेच्या निवडणुकांबाबत जाणूनबुजून निर्णय लांबवत असल्याचा आरोप राज्यपालांवर केला गेला होता.
या साऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबध हे गुंतागुंतीचे राहिले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर पहाटे जो शपथविधी पार पडला होता तेव्हापासून महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत कायमच संशयाचे धुकं राहिलं आहे. मध्यंतरी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अहमदाबादला गुप्त भेट झाली असल्याची देखील जोरदार चर्चा रंगली होती. तेव्हा देखील शरद पवारांची नेमकी भूमिका काय? याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
या सगळ्या घडामोडी घडत असतानाच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांची घेतलेली भेट हा आता चर्चेचा विषय तर ठरत आहेच. पण यामुळे अनेक राजकीय सवाल देखील उपस्थित झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं असलं तरी या भेटीचे नेमकं संदर्भ हे येत्या काही दिवसात आपल्यासमोर लख्खपणे येऊ शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT